Hasan Mushrif-Samarjeet Ghatge-Sanjay Ghatge-Sanjay Mandlik Sarkarnama
विश्लेषण

Kolhapur Lok Sabha Constituency : कोल्हापूर लोकसभेला कागल बाहुबलीच्या भूमिकेत; विधानसभेतील काटे दूर करण्याचा शह-कटशह...

Rahul Gadkar

Kolhapur, 21 March : खासदार धनंजय महाडिक वगळता 1990 नंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर कागल तालुक्याचे वर्चस्व राहिले आहे. कागल विधानसभा मतदारसंघाला राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे बलस्थान असलेल्या कागलमध्ये अलीकडच्या काळात समरजितसिंह घाटगे यांच्या रूपाने भाजपने कमळ फुलविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

खासदार संजय मंडलिक यांचा गट आजही तेवढाच भक्कम आहे. मात्र, राज्यातील सत्तानाट्यानंतर हे तिघेही एकत्र येत महायुतीला (Mahayuti) एक बाहुबली मतदारसंघ दिला आहे. महाविकास आघाडीकडे केवळ शिवसेना ठाकरे गटाचे संजय घाटगे हेच शिलेदार आहेत. मात्र मुश्रीफ आणि घाटगे यांची मैत्री महाविकास आघाडीच्या आड येऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन समरजितसिंह घाटगे यांना मैदानात उतरवण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या उमेदवारीसाठी दावा करत मोठा दबाव गट तयार केला आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवाराचा केंद्रबिंदू कागलच आहे.

भाजपकडून (BJP) लोकसभेसाठी समरजितसिंह घाटगे यांच्या नावाची चर्चा आहे, तर खासदार संजय मंडलिक हे आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचे जाहीरपणे सांगून त्यांनी प्रचार दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे उमेदवाराचा तिढा सुटेपर्यंत कागल (Kagal) तालुक्यात संभ्रमावस्था असणार आहे. घाटगे यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची भूमिका काय असणार? ते बंडखोरी करणार का? यावर सर्व गणित अवलंबून आहे. त्यांची मनधरणी केली तर त्यांना काय दिले जाणार? यावर सर्वकाही अवलंबून आहे.

महायुतीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे एकत्र असल्याने सद्यस्थितीला कागल तालुक्यात महायुतीचे पारडे भक्कम आहे. मात्र, समरजितसिंह घाटगे यांची भूमिका काय? हे त्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा प्रश्न उद्भवत नाही. शिवाय मंडलिक यांच्यासाठी ते जोशाने काम करतील.

विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री मुश्रीफ यांच्याविरोधात दावेदार म्हणून समरजितसिंह घाटगे यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र, समरजितसिंह घाटगे यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवून आपल्या विधानसभेतील मोठा अडसर दूर करण्याची खेळी मंत्री मुश्रीफ यांच्याकडून खेळली जात असल्याची चर्चा आहे. मात्र, महायुतीच्या उमेदवारासोबत ठाम राहणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत विधानसभेची गणिते असल्यामुळे लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या घडामोडीत नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. शाहू महाराजांच्या विरोधात विद्यमान खासदार संजय मंडलिक अथवा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे अशाच लढतीची चिन्हे आहेत.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT