Karnataka Assembly Election Result 2023 : Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

Karnataka Election Result : बजरंगबली भाजपाच्या मदतीला का नाही आले ?

Karnataka Assembly Election Result 2023 : येडियुरप्पांची नाराजी भोवली का ?

उमेश घोंगडे

कर्नाटकमधल्या विजयाने भारतीय जनता पार्टीला पुरतं जागं केलं असेल. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असलेलं कर्नाटक भाजपाच्या दृष्टीने महत्वाचं राज्य. या राज्यात विजय मिळविण्यासाठी भाजपाने शक्य ते सर्व केलं. मात्र,आलेल्या निकालावरून राज्यातल्या जनतेने भाजपाला पूर्ण नाकारल्याचं दिसत आहे.

भारतीय जनता पार्टीची सारी यंत्रणा या निवडणुकीच्या कामाला लागली होती. केंद्रातले अनेक नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाची देश पातळीवरील तसेच विविध राज्यातील यंत्रणा निवडणुकीत काम करीत होती.अर्थात निवडणूक लढण्याची भाजपाची ही पद्धत सर्वश्रृत आहे. निवडणूक कोणतीही असो पूर्ण तयारीनीशी लढण्याची भाजपाची परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल १९ सभा आणि सहा रोड शो राज्यातल्या विविध भागात केले. मात्र, हे सारं करूनही भाजपाच्या वाट्याला दारूण पराभव आला.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान मिळालेला प्रतिसादच मुळात बोलका होता. त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीच्या निकालात दिसत आहे. भारत जोडो यात्रेच्या काळात सर्वसामान्य माणसाचा चांगला प्रतिसाद राहुल गांधी यांना मिळत होता. गेल्या सात वर्षाच्या सत्तेत भाजपावर कर्नाटकमधील जनता नाराज असल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.

या काळात टोकाचा धार्मिक वाद घालण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला. हिजाबचा विषय मोठा करण्यात आला. त्यातून न्यायालयीन लढाई झाली. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याची घोेषणा केली. शेवटच्या टप्प्यात त्याचाही वापर भाजपाकडून करण्यात आला. मात्र, या साऱ्या प्रयत्नांचा फारसा उपयोग झाल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालावरून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाचा जवळपास ३५ ते ३८ जागांचे भाजपाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

येडियुरप्पांची नाराजी भोवली का ?

येडियुरप्पा हे भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकातील मोठे नेते. जनमाणसात मोठी प्रतिमा असलेला लिंगायत समाजाचा नेता. मात्र, गेल्या काही वर्षात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाढत्या वयाचे कारण देत त्यांना पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री करताना येडियुरप्पांना दूर करण्यात आले. त्यांची नाराजी परवडणारी नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांना पुन्हा महत्व देण्यात आले. मात्र, शेवटी त्याचा फटका बसल्याचे दिसत आहे. कर्नाटकच्या लोकसंख्येत जवळपास २२ टक्के असलेल्या लिंगायत समाजाने कॉंग्रेसला (Congress News) जवळ केल्याचे निकालावरून दिसत आहे. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत ज्या पक्षाला लिंगायतांनी साथ दिला तो पक्ष सत्तेत आल्याचा इतिहास आहे.

दक्षिणेत पाय पसरण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर :

बेराजगारी, महागाई, इंधनाचे वाढते दर ही भाजपाच्या पराभवाची ढोबळ कारणे सांगता येतील. मात्र. त्यापलिकडे जाऊन विचार करावा लागेल. विद्यमान सरकारच्या विरोधातील नाराजी हे भाजपाच्या पराभवाचे खरे कारण आहे. सरकारची कार्यक्षमता आणि भ्रष्टाचारी प्रतिमा लोकांना आवडली नाही. लोकांना रोजच्या जगण्यात भेडसावणाऱ्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून केवळ भावनिक राजकारण लोकांच्या पचनी पडत नाही हे या निकालाने स्पष्ट केले आहे.

भाजपाचे नेत्यांना या निकालातून बोध घ्यावा लागेल. भाजपाच्या दृष्टीने दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेले कर्नाटक त्यांनी गमावले आहे. भाजपाच्या ताब्यात असलेले दक्षिणेतले हे एकमेव राज्य होते तेही गमावले आहे. त्यामुळे दक्षिणेत पाय पसरण्याच्या भाजपाच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला हे निश्‍चित.

(EDIT BY - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT