Rajyasabha Election Sarkarnama
विश्लेषण

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणुकीत उमेदवार विजयी कसे होतात? कसे होते मतदान?

Process of Rajya Sabha Election : राज्यसभा सदस्य हे विधानसभा आमदारांच्या मतांवर निवडून येतात. त्यासाठी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असणे आवश्यक आहे.

Anand Surwase

Rajya Sabha Election : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यसभा निवडणुका पार पडत आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अधिकार अनुक्रमे शिंदे गट आणि अजित पवार गटाला दिल्यानंतर या गटाची विधानसभेतील ताकद वाढली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या या निवडणुकीतही या गटाचाच उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट होते. दरम्यान, राज्यात या वेळी 6 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, प्रत्येक पक्षाने आपापल्या आमदारांचा कोटा लक्षात घेत एकूण 6 च उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

देशभरात एकूण 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुका पार पडत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश असून, त्यातील 5 जागा महायुतीच्या वाट्याला आल्या आहेत. यामध्ये भाजपला 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक आणि, शिवसेना शिंदे गटाला एक, तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली होती. त्यामुळे महायुतीने अथवा आघाडीकडून कोणताही अधिकचा उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, तर महायुतीत भाजपकडून मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे तसेच शिंदे गटाकडून मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि स्थायी सभागृह म्हणून ओळखले जाते. हे सभागृह कधीही बरखास्त होत नाही. या सभागृहातील प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. तसेच सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश सदस्य निवृत्त हाेतात आणि तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. या रिक्त जागांसाठी निवडणुका घेतल्या जातात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या ही 250 आहे. त्यामध्ये 238 सदस्य हे संघराज्यातून येतात, तर 12 सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात. सद्य:स्थितीत राज्यसभेत एकूण 245 सदस्य आहेत. प्रत्येक राज्याची राज्यसभेतील सदस्य संख्या ही राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर ठरलेली असते. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत.

राज्यसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असावा लागतो. संबंधित उमेदवाराला राज्यसभेत जाण्यासाठी ज्या राज्यातून निवडणूक लढवणार आहे, त्या राज्यातील विधानसभेतील विद्यमान सदस्यांचे मतदान (Voting) होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य विधानसभा सदस्यांचे एकल हस्तांतर पद्धतीने मतदान होते. विशेष म्हणजे हे मतदान गुप्त पद्धतीने केले जात नाही. विधानसभा सदस्यांनी मतपत्रिकेत दिलेले पसंती क्रमांक पक्षाकडून तपासले जातात. त्यानंतरच सदस्य आपले मत मतपेटीमध्ये देताे. त्यामुळे निवडणुकीत होणारी क्रॉस व्हाेटिंग टाळली जाते.

कसे होते मतदान?

राज्यसभेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराला निवडणुकीत विजयी होण्यासाठी ठराविक मतं (विधानसभा सदस्यांनी दिलेली पसंती) मिळणे आवश्यक असते. यासाठी मतांची आकडेवारी ही किती जागेसाठी निवडणुका होणार आहेत आणि किती सदस्य मतदानासाठी पात्र आहेत. त्यानुसार ठरत असते. थोडक्यात म्हणजे समजा महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. हे सर्व आमदार राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र ठरतात. राज्यसभेत महाराष्ट्रातून एकूण 19 जागा आहेत. त्यापैकी एक तृतीयांश जागांसाठी दर दोन वर्षांनी मतदान होते. म्हणजेच 6 जागांसाठी निवडणुका होत असतील, तर 288 पैकी विजयी होण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा ठरवण्यासाठी एक विशिष्ट फॉर्म्युला वापरला जातो. त्यासाठी एकूण मतदारांच्या संख्येला निवडणुकीच्या एकूण जागांची संख्या अधिक एक ने भागायचे, त्यानंतर आलेल्या संख्येमध्ये अधिक 1 चा समावेश केल्यानंतर जी संख्या प्राप्त होते. ती संख्या म्हणजे उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेले मतदान होय.

थोडक्यात महाराष्ट्रात 288 विधानसभा आमदार मतदानादासाठी पात्र असतील आणि 6 जागांसाठी मतदान होत असले तर 6+1= 7 ने त्या संख्येस भागायचे. (288/7=41+1 = 42) अशी विजयी मतांची संख्या निश्चित होईल. त्यानंतर हे विधानसभा सदस्य आपले मतदान हे एकल हस्तांतर पद्धतीने करतात. यामध्ये मतदारांना उमेदवारांच्या निवडीसाठी प्राधान्य क्रमांक देणे आवश्यक आहे. सदस्य प्रत्येक उमेदवाराला (1, 2, 3, 4, 5, 6 ) असे प्राधान्य देतात. एकूण मतांपैकी 42 किंवा त्याहून अधिक सदस्यांनी उमेदवाराची पहिली पसंती म्हणून ज्याची निवड केली जाते तो निवडून येतो. समजा एखाद्या उमेदवारास 50 प्रथम क्रमांकाची मते मिळाली, तर तो उमेदवार 42 मते घेऊन विजयी होईल. मात्र, त्यांची उर्वरित 8 मते ही संबंधित मतदारांनी ज्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमाकांची पसंती दिली आहे. त्याच्याकडे हस्तातंरित होतात. म्हणजेच संबंधित पक्षाच्या मतदारांच्या कोट्यातून त्यांचा दुसरा उमेदवारही निवडून येण्यास मदत होते. त्याप्रमाणे विरोधी पक्षातील आमदारही पक्षाने दिलेल्या उमेदवारास आपला पसंती क्रमांक देऊन त्याला विजयी करू शकतात.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT