विश्लेषण

Kolhapur Lok Sabha News : लोकसभेत याराना सेफ ..!

Rahul Gadkar

Kolhapur News : ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, विधानसभा असो वा लोकसभा निवडणूक कोल्हापूर नेहमीच चर्चेत असते. कोल्हापुरचे राजकारण म्हणजे नेत्यांनी घेतलेले तोंडसुख, कार्यकर्त्यांची डोके तापवातापवी आणि मतदारांनी पाहिलेली मज्जा, असेच समीकरण राहिलेली आहे. प्रत्येक निवडणुकीत राजकारणाला मिळालेली कलाटनी आणि त्यातून घसरलेली प्रचाराची पातळी ही नेहमी अनुभवली आहे. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या राजकारणाबाबत वेगळीच चर्चा होत असते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) असो वा माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील किंवा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यात सुरु असलेला राजकीय टोकाचा संघर्ष मागील काळात जनतेने अनुभवाला आहे. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील राजकारणाचा थेट परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर झाला आहे. पण अंगराखून या लोकसभेत आपला दोस्ताना जपला जात आहे हे नक्की. मागील तीन वर्षात महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलेल्या पाटील-मुश्रीफ गटाने सहकारी संस्थावर वर्चस्व ठेवले आहे. याला धक्का न लागता पाटील-मुश्रीफ यांनी एकमेकांवर टीका न करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील दहा वर्षात महापालिका आणि जिल्हापरिषदेसह विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांची जिल्ह्याच्या राजकारणाची गाडी सुसाट आहे. गोकुळ दूध संस्थेत सत्तांतरानंतर या दोघांतील गाडीचे स्पीड आणखी वाढले. मात्र राज्यातील सत्तातरांनंतर मुश्रीफ आणि पाटील यांच्यात निधीवरुन तू-तू मै-मै झाले. लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात सरळ फुट पडली. लोकसभेला मुश्रीफ आणि पाटील एकमेकांच्यां विरोधात आहेत.

पालकमंत्री मुश्रीफ हे महायुतीचे लीडर तर महाविकास आघाडीचे आमदार सतेज पाटील लीडर आहेत. मात्र,संस्थात्मक राजकारणातील एकी आणि भविष्यातील राजकीय जोडण्याच्या निमित्ताने हे दोघे शिलेदार परस्परांवर टीका करण्याचे टाळत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. प्रत्येक निवडणुकीत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे एकमेकांची उणीदुणी काढण्यात पहिल्या क्रमांकावर असतात, मात्र ही लोकसभा निवडणूक यास अपवाद ठरते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोल्हापूर (Kolhapur) शहर दक्षिण मतदार संघातील ३६ गावात राष्ट्रवादीने पर्यायाने हसन मुश्रीफ यांनी लक्ष द्यायचे नाही. याची परतफेड म्हणून कागल व गडहिंग्लज तालुक्यात काँग्रेसची राष्ट्रवादीला कशी साथ मिळेल याचे गणित आमदार सतेज पाटील यांनी मांडायचे, एकूणच आपण दोघेही राज्य करु, तुम्ही तुमचा भाग बघा मी माझा भाग सांभाळतो असच छुपा करार मुश्रीफ व सतेज यांच्यात झाल्याचे मागील काही निवडणुकात स्पष्ट झाले. दोन्ही काँग्रेसमध्ये असलेल्या वर्चस्ववादामुळे कागलकर व बावडेकरांची दोस्ती राजकारणाच्या पटलावर घोड्याची अडीच घरांची चाल ठरत महापालिका निवडणुकीप्रमाणे दे धक्का देणारी होती.

गोकुळ (Gokul) दूध संघाच्या निवडणुकीनंतर दोघांचा राजकीय याराना अधिकच घट्ट झाला. 2019 मध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळावे, यासाठी मनापासून आग्रही असलेल्या हसन मुश्रीफ यांना त्यावेळी पदाने हुलकावणी दिली. पालकमंत्रीपद नसल्याची सल असूनही मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील संबंध तुटेपर्यंत ताणले नाहीत. गोकुळची निवडणूक एकदिलाने लढवली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना दुभंगली तरी दोघांनी मिळून बँकेत सत्तेच्या जोडण्या घातल्या. दरम्यान, राज्यात मागील दोन वर्षात झालेल्या सत्तांतर तसेच ईडी ची पिडा हसन मुश्रीफ यांना सुरू झाल्यानंतरही सतेज पाटील हे मुश्रीफ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर कोल्हापूरच्या या आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये नियोजन मंडळातील निधीवरुन ताणाताणी झाली होती. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ हे भाजप प्रणित आघाडीत आहेत. तर सतेज पाटील महाविकास आघाडीची जिल्ह्याची कमान सांभाळत आहेत. आता हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात कलगीतुरा रंगण्याची शक्यता व्यक्त झाली.

या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकमेकांवर बोलणे कटाक्षाने टाळल्याचे दिसून येते. खासदार मंडलिक यांनी शाहू छत्रपती यांचे दत्तक प्रकरण पुढे आणल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी मंडलिक यांना सबुरीचा सल्ला दिला. संस्थात्मक राजकारणाचा पाया ठिसूळ होवू नये, यासाठीच हे दोन्ही नेते एकमेकांवर थेट बोलणे टाळत तर नाहीत ना? अशी शंका आता उपस्थित होवू लागली आहे.

Edited By : Chaitanya Machale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT