ruturaj patil | satej patil | amal mahadik
ruturaj patil | satej patil | amal mahadik sarkaranama
विश्लेषण

Satej Patil Vs Amal Mahadik : पाटलांच्या होमपिचवर महाडिकांनी 'टेन्शन' वाढवलं; कोल्हापूर दक्षिण भाजपला पोषक

Rahul Gadkar

Kolhapur News, 5 June : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या ( Kolhapur Lok Sabha Election 2024 ) निकालात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचा दणदणीत विजय झाला. खासदार संजय मंडलिक यांचा पराभव करत दीड लाखांचे मताधिक्य घेऊन शाहू महाराज यांनी कोल्हापूरच्या खासदार पदावर आपले नाव कोरले.

छत्रपती शाहू महाराज यांना 'खासदार' करण्यामागे काँग्रेसचे नेते, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil ) यांची भूमिका महत्त्वाची आहे. उमेदवारी आणण्यापासून ते विजयापर्यंत प्रत्येक नियोजनात कोणतीही कसूर न ठेवता, सर्व घटकांचा समतोल राखून एकता निर्माण करून केलेले कष्टाचे फळ विजयातून मिळाले.

मात्र, 'होमपीज' असणाऱ्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात मात्र सतेज पाटील यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. महाडिक बंधूंनी खासदार मंडलिक यांच्या प्रचारात कोणतीही कसर न ठेवल्याने पाटलांचे 'टेन्शन' वाढवण्याचे काम केलं. हेच निकालातून दिसत आहे.

शाहू महाराज हे जवळपास दीड लाखांच्या मतांनी निवडून आले आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघातून जवळपास 71 हजारांचे मताधिक्य, तर राधानगरी मतदारसंघातून जवळपास 66 हजारांची मताधिक्य शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांना मिळाले आहे. वास्तविक पाहता कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसची अधिक भिस्त होती.

कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव, दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील आणि करवीर विधानसभाचे दिवंगत आमदार पी. एन पाटील यांच्या मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना होता. मात्र केवळ करवीर विधानसभा मतदारसंघातच अपेक्षित मताधिक्य मिळाले. राधानगरी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार असताना देखील शाहू महाराजांना यांना राधानगरीने साथ दिली.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील ( Ruturaj Patil ) यांना मागील विधानसभा निवडणुकीत 42 हजार 709 इतके मताधिक्य मिळाले होते. शिवाय अपेक्षेप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अधिकचे मताधिक्य मिळेल, असा अंदाज होता. मात्र, माजी आमदार आणि भाजपचे नेते अमल महाडिक व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघात केलेली बांधणी या लोकसभेला फायद्याची ठरली.

लोकसभा निकालात या मतदारसंघातून 24 फेऱ्या घेण्यात आल्या. बारा फेऱ्यांमध्ये शाहू महाराज आघाडीवर तर बारा फेऱ्यांमध्ये संजय मंडलिक आघाडीवर होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना या विधानसभा मतदारसंघातून केवळ 6 हजार 702 इतकी मताधिक्य मिळाले आहे. कोल्हापूर दक्षिणमधून इतके कमी मताधिक्य पक्षाला मिळेल, याचा अंदाज काँग्रेसच्या नेत्यांना आलेला नाही.

गेल्या पाच वर्षात भाजपकडे गेलेली ही जागा ऋतुराज पाटील यांनी पुन्हा काँग्रेसकडे घेतली. त्यानंतर या मतदारसंघात भाजपचे अस्तित्व कमी पाहायला मिळाले. मात्र, पराभवानंतर माजी आमदार अमल महाडिक यांनी शहराच्या उपनगरात सातत्याने केलेले दौरे, ग्रामीण भागात केलेली कार्यकर्त्यांची पेरणी या लोकसभा निवडणुकीत उपयोगी आली.

शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यश-अपयशाने धडा घेत भाजपने अंतर्गत दुरुस्ती मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून येते. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पोषक वातावरण करण्यास अनुकूलता मिळाली आहे. इतकेच नव्हे तर मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाढलेली मते रोखण्याचे काम या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांनी केले आहे.

कारभाऱ्यांचे दुर्लक्ष, निवडून येण्याच्या अविर्भावात सबकुछ राम भरोसे

कोल्हापूर शहरातील उपनगरात आणि ग्रामीण भागातील कारभाऱ्यांनी शाहू महाराज निवडून आले, याच अविर्भावात दीरंगाई केल्याचं दिसून येते. प्रचार आणि संपर्क ठेवण्यात काही कारभारी मागे पडल्याचे दिसते. नगरातील काही कारभाऱ्यांच्या प्रभागात मंडलिकांना लीड मिळाल्याचं दिसून येते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आणि महापालिकेच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शाहू महाराजांना मिळालेलं लीड

  • फेरी 1 - 1036 (शाहू महाराज)

  • फेरी 2 - 250 (मंडलिक)

  • फेरी 3 - 156 (मंडलिक)

  • फेरी 4 - 203 (शाहू महाराज)

  • फेरी 5 - 839 (मंडलिक)

  • फेरी 6 - 451 (मंडलिक)

  • फेरी 7 - 1627 (शाहू महाराज)

  • फेरी 8 - 1279 (शाहू महाराज)

  • फेरी 9 - 698 (मंडलिक)

  • फेरी 10 - 657 (मंडलिक)

  • फेरी 11 - 1769 (शाहू महाराज)

  • फेरी 12 - 1612 (शाहू महाराज)

  • फेरी 13 - 238 (मंडलिक)

  • फेरी 14 - 265 (मंडलिक)

  • फेरी 15 - 420 (मंडलिक)

  • फेरी 16 - 172 (शाहू महाराज)

  • फेरी 17 - 2605 (मंडलिक)

  • फेरी 18 - 204 (मंडलिक)

  • फेरी 19 - 616 (शाहू महाराज)

  • फेरी 20 - 48 (शाहू महाराज)

  • फेरी 21 -1283 (शाहू महाराज)

  • फेरी 22 - 1867 (शाहू महाराज)

  • फेरी 23 - 1729 (शाहू महाराज)

  • फेरी 24 - 264 (मंडलिक)

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT