What is the Sixth Schedule of the Constitution? : लेह-लडाखमध्ये बुधवारी तरूणाईच्या संतापाचा भडका उडला. लेहमधील भाजपच्या कार्यालयासह एक सरकारी कार्यालयही पेटविण्यात आले. पोलिसांच्या वाहनांना आग लावली. तुफान दगडफेक केली. तरूणांचा एवढा भडका का उडाला? मात्र, ही अचानक घडलेली घटना नाही. मागील काही महिन्यांपासून लडाखमध्ये खदखद आहे.
भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासह राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीने लडाखमध्ये जोर धरला आहे. मागील 15 दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्यासह 15 उपोषणाला बसले होते. पण बुधवारी अचानक शांततामय मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेकडो तरूणांच्या जमावाने तोडफोड, दगडफेक करण्यास सुरूवात केली. संतापलेल्या तरूणांनी भाजपचे कार्यालय पेटविण्यासही मागेपुढे पाहिले नाही. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली. त्यामध्ये चार आंदोलकांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले. यामध्ये सुरक्षा दलातील 40 कर्मचारीही जखमी झाले आहेत.
आगडोंब का उसलळा?
उपोषणाला बसलेल्या आंदोलकांपैकी लेहमधील दोन कार्यकर्त्यांची प्रकृती मंगळवारी अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे कार्यकर्ते लेह एपेक्स बॉडी (एलएबी)चे होते. त्यामुळे एलएलबी यूथ विंगने बुधवारी लेह बंदची घोषणा केली होती. बुधवारी सकाळी शहिदी पार्कमध्ये नेहमीप्रमाणे आंदोलन शांततेत सुरू झाले होते. पण दुपारी तिथे अचानक युवक जमण्यास सुरूवात झाली. युवकांनी घोषणाबाजी करत तोडफोड सुरू केली.
तिथून यूवक इतर ठिकाणी जाऊ लागल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. संतापलेल्या युवकांनी जवानांवर दगडफेक केली. त्यामुळे मग पोलिसांना लाठीमार करावा लागला. यादरम्यान युवकांचा एक जमाव मुख्य रस्त्यालगत्या भाजप प्रदेश कार्यालयाजवळ पोहोचला. कार्यालयावर जोरदार दगडफेक करत आग लावण्यात आली. कार्यालयातील कागदपत्रे आणि फर्निचर पेटविण्यात आले. आतील काही लोक जीव मुठीत धरून तिथून पळाले. त्यानंतर रस्त्यावर सीआरपीएफच्या वाहनासह अन्य काही वाहनांनाही आग लावण्यात आली. लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या लेह कार्यालही पेटवून देण्यात आले. या युवकांना काँग्रेस नेत्यांची फूस असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 लागू झाला. त्यानुसार जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळे करण्यात आले. लडाखला विधिमंडळाशिवाय स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देण्यात आली. नवी दिल्ली आणि पद्दुचेरीसारख्या केंद्रशासित प्रदेशांनाही विधानसभा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागीलवर्षीच विधानसभेची निवडणूक झाली. त्यानंतर आता लडाखमध्येही पूर्ण राज्याच्या मागणीसह सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे.
काय आहे सहावी अनुसूची?
भारतीय राज्यघटनेतील सहाव्या अनुसूचीमध्ये सध्या त्रिपुरा, मेघालय, मिझोराम आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. या अनुसूचीमध्ये सरकार, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे अधिकार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार, न्यायिक तंत्र आणि स्वायत्त परिषदांच्या माध्यमातून वापरण्यात येणाऱ्या आर्थिक अधिकांशी संबधित विशेष तरतुदी आहेत. लडाखलाही याच अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी होत आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, लेह आणि कारगिलला स्वतंत्रपणे लोकसभा मतदारसंघ मिळावेत, सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक लोकांना आरक्षण मिळावे, अशी मागणीही जोरदारपणे केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.