Sindhudurg : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि इतर कारणांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तब्बल तीन वर्ष रखडल्या होत्या. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून पूर्वीच्या आरक्षणानुसारच निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील आठ पंचायत समित्या, तीन नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या मोर्चे बांधणीला वेग आला आहे. जिल्ह्यात तब्बल 13 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असून राजकीय पक्षांसह प्रशासनही तयारीला लागले आहे. तर जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत रंगणार असून महायुतीत उमेदवारांची चढाओढ दिसत आहे. भाजपमध्ये उमेदवारांची रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. पण अनेक इच्छुकांचे भवितव्य हे आरक्षण सोडतीवर अवलंबून असल्याने सध्या इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
गेल्या वेळी 2021 मध्ये कोरोनाच्या वेळी राज्यातील दहा महानगरपालिका आणि नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या मुदती संपल्या होत्या. यात जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या तीन नगरपरिषदांचा समावेश होता. यानंतर जिल्हा परिषदेसह आठ पंचायत समित्यांची मुदत संपली. त्यानंतर कणकवली नगरपंचायतीचीही मुदत संपली असून या सर्व स्थानिकवर गेल्या साडे तीन वर्षांपासून प्रशासक आहे.
गेल्या तीन साडेतीन वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज असल्याने देखील लोकप्रतिनिधींनी आपले हात वर केले होते. खासदार, आमदार आणि पालकमंत्री सोडून येथे कोणाचीच चलती दिसत होती. तर प्रशासक सर्व कारभार हाकत होते. यामुळे प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घ्या, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील स्थानिकबाबत आदेश देताना थेट कालमर्यादाच घालून दिली आहे. तर चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेशच निवडणूक आयोगाला दिले आहेत. यामुळे पुढच्या दोन एक महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊन डिसेंबर 2025 पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी दिसतील.
दरम्यान गेल्या वेळी जिल्हा परिषद, वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपरिषद, कणकवली नगरपंचायतीसह आठ पैकी सर्वाधिक पंचायत समित्यांवर भाजपची सत्ता होती. मालवण नगरपरिषदेवर ठाकरेंच्या शिवसेनेची पकड होती. त्यातच आता शिवसेनेची झालेल्या वाताहत आणि महायुतीत एकनाथ शिंदे यांची सहभागी असणारी शिवसेना यामुळे येथे भाजपचं वर्चस्व राहील, असे राजकीय वातावरण आहे. पूर्वी येथे जिल्ह्याचे खासदार आणि दोन आमदार ठाकरे शिवसेनेचे होते. मात्र लोकसभा पाठोपाठ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत येथील राजकीय समिकरणं बदलली आहेत. येथे भाजपचे खासदार निवडून आले असून दोन आमदार शिंदे शिवसेनेचे आणि एक आमदार भाजपचा निवडून आला आहे.
जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पानिपत झाले असून याचा आगामी स्थानिकवर मोठा परिणाम होणार आहे. तर बदललेली राजकीय गणितांमुळे भाजपला पोषक वातावरण तयार झाले आहे. पण जिल्ह्यात तीन पैकी दोन आमदार शिंदे शिवसेनेचे असल्याने भाजपला समतोल राखावा लागणार आहे. तर जिल्ह्यातील राजकारणातील महत्वाची पदे नसल्यासह नेत्यांनीच साथ सोडल्यामुळे ठाकरेंची शिवसेना सध्या थोडी बॅकफूटवर गेली आहे.
केंद्र आणि राज्यात महायुती सत्तेवर आहे. त्यामुळे साहजिकच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांचा सर्वाधिक ओढा सत्तेतील भाजप आणि शिंदे शिवसेना या पक्षाकडे आहे. भविष्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय घेतला गेला तर या दोन पक्षांकडे उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीतच कुरघोडी होण्याची दाट संभावना आहे.
जिल्ह्यातील देवगड-जामसंडे, वैभववाडी-वाभवे, दोडामार्ग आणि कुडाळ या चार नगरपंचायतीवर सध्या कार्यरत असलेले नगराध्यक्ष निवडून आलेल्या नगरसेवकातून निवडले आहेत. मात्र, विद्यमान राज्य सरकार थेट नगराध्यक्ष निवडीचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या तिन्ही नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत यांचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. यामुळे येथील निवडणुका अधिक रंगतदार होईल.
जिल्ह्यात एक जिल्हा परिषद, आठ पंचायत समित्या, तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत अशा एकूण 13 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. याच निवडणुका खासदार, आमदारासह जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या वर्चस्वाची परीक्षा असते. तर सध्याची स्थिती पाहता जिल्ह्यात महायूती सुसाट असून महाविकास आगाडीची स्थिती केविलवाणी आहे. ठाकरेंची शिवसेना सोडल्यास काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद नसल्यात जमा आहे. पण शिवसेनेचे असलेले कार्यकर्ते पाहता महाविकास आघाडीला आत्तापासूनच जोरदार तयारी करावी लागणार आहे. जर योग्य प्रयत्न केल्यास निवडणुकीत काही अंशी तरी महाविकास आघाडीला यश मिळू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.