लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही महायुतीतील शिवसेना व भाजप तर विरोधातील महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत घमासान होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळच्या व आताच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांत जमीनअस्मानचा फरक आहे.
गेल्या वर्षीच्या दोन मोठ्या निवडणुका, मोठ्या पक्षांतील फूट व मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर कुणाचे वर्चस्व असणार, याकडे लक्ष लागणार आहे. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या नेत्यांच्या अस्तित्वाचा कस लागणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला. स्थापनेपासून वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने सत्तास्थापनेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवले; परंतु मागील तीन-चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) महायुती जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्यास मैदानात उतरणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती होईल की नाही हे अद्याप स्पष्ट नसले, तरी सत्तास्थापनेसाठी मात्र ते एकत्र येतील हे मात्र निश्चित आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. दुसरीकडे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुकीला सामोरे गेले. तर शिवसेनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत जिल्हा परिषदेवर एकहाती भगवा फडकवला. त्यानंतर राज्यपातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत; परंतु ग्रामीण भागातील अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला जिल्हा परिषदेवर एकहाती वर्चस्व राखण्यात यश मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५३ जागांपैकी शिवसेना २६, भाजप १६, राष्ट्रवादी १० आणि काँग्रेसने एक जागा जिंकल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वाधिक जागा जिंकलेली शिवसेना इतिहास घडवेल, असे चित्र निर्माण झाले होते. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या साह्याने भगवा फडकविला. त्यानंतर अवघ्या काही वर्षातच राष्ट्रवादीचे सुभाष पवार यांच्यासह १० सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेतून राष्ट्रवादी हद्दपार झाली.
‘शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून शिवसैनिक पक्षासाठी एक निष्ठेने काम करत आहे. अशातच शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर देखील जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिवसैनिक पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेतील सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले होते.
मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाणे जिल्ह्यासह राज्यात सुरु असलेली विकास कामांची घौडदौड पाहता, जिल्हाप्रमुख (ग्रामीण) प्रकाश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी व सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे यांचा जिल्ह्यावरील वरचष्मा पुन्हा एकदा दिसला. ठाणे जिल्हा परिषदेत भिवंडीपाठोपाठ शहापूर तालुक्यात १४ सदस्य आहेत. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे तालुक्यात वर्चस्व आहे. बरोरा यांनी नुकतेच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत चार सदस्यदेखील भाजपत दाखल झाल्याने भाजपची ताकद वाढणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर भाजपने रायगड जिल्ह्यात तग धरुन असलेल्या शेतकरी कामगार पक्षात फूट पाडण्यात यश आले आहे. त्यामुळे एकेकाळी सत्तेत असणाऱ्या या प्रमुख पक्षांमधील गटा-तटाच्या राजकारणात भाजप मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ताकद दाखवण्यास सज्ज झाला आहे. आठ वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे फक्त तीन सदस्य होते. त्यापूर्वी भाजपचे रायगडच्या राजकारणातील अस्तित्व पनवेल तालुकावगळता कोठेच नव्हते.
हळुहळू भाजपने हे चित्र बदलवले. आता जिल्ह्यात तीन आमदार, एक खासदार आणि गावगावात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. आठ वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादीला हाताशी धरुन सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी पहिल्या अडीच वर्षासाठी आदिती तटकरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या, त्यानंतर शेकापच्या योगिता पारधी यांना संधी देण्यात आली.
पनवेल आणि उरण वगळता जिल्ह्यात राष्ट्रवादी, शिवसेना, शेकापचे वर्चस्व होते. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींमध्ये या तीन पक्षांनी आपले वर्चस्व राखलेले होते. हे वर्चस्व आता इतिहास जमा होत आहे. या तीनही पक्षांमध्ये फूट पडली आहे. बंड करून बाहेर पडलेले नेते भाजपसोबत गेले आहेत. शेकाप, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांत समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्याचवेळी भाजप व मित्रपक्ष इच्छुक उमेदवारांची चाचपणी करू लागले आहेत.
आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदावरुन हटवण्यासाठी आक्रमक झालेल्या शिवसेना आमदारांनी हा कळीचा मुद्दा तुर्तास बाजूला ठेवल्याचे दिसत आहे; परंतु एकदातरी पालकमंत्रिपद मिळवणारच, या ध्येयाने पछाडलेले महाडचे आमदार भरत गोगावले हा विषय विसरलेले नाहीत. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल दिसत असले तरी पालकमंत्रिपदाचा वाद कधीही पेट घेऊ शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा आंदाज आहे.
एकेकाळी काँग्रेस हा पक्ष येथील राजकारणात प्रमुख पक्ष म्हणून गणला जात असे. अनेक संस्था, सहकारी बॅंका या पक्षाच्या ताब्यात होत्या. आजच्या घडीला स्पष्ट बहुमत असलेली एक ग्रामपंचायतही या पक्षाकडे राहिलेली नाही.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मित्र पक्षांना बरोबर घेत हा पक्ष अस्तित्व राखून आहे. मात्र, आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीसमोर हा पक्ष कसा लढत देईल, याबद्दल शंका उपस्थित होत आहेत.
निवडणुका होणाऱ्या संस्थाः जिल्हा परिषद, महापालिका पनवेल, पंचायत समित्याः अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, महाड, पनवेल, उरण, खालापूर, पेण, पाली, माणगाव, पोलादपूर, तळा, म्हसळा, पाली, खालापूर; नगरपालिका : माथेरान, खोपोली, अलिबाग, कर्जत, श्रीवर्धन, महाड, रोहा, मुरुड, पेण, उरण.
पालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांमुळे केंद्र आणि राज्य सरकारचे बारकाईने लक्ष घातले आहे. येत्या निवडणुकीत येथे राजकीय बदलाचे वारे घोंघावणार असून नेमका कोणत्या पक्षाला मतदार किती प्रमाणात कौल देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे; सद्यस्थितीत तरी जिल्ह्यात महायुतीचा दबदबा दिसत आहे.
पालघर जिल्हा परिषदेसह जव्हार, पालघर, डहाणू नगरपरिषद तसेच तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड नगरपंचायत तसेच आठ तालुका पंचायत समितीची निवडणूक होत आहे. ही निवडणूक महायुतीतील घटक पक्ष, महाविकास आघाडी घटक पक्ष, बहुजन विकास आघाडी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत भाजपचे खासदार व तीन आमदार, शिंदेंच्या शिवसेनेचे तीन आमदार व महाविकास आघाडीचा एक आमदार जिल्ह्यात आहेत. हे राजकीय बलाबल पाहता महायुतीला विधानसभेच्या पाच जागा जिंकण्यास यश मिळाले आहे.
वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघरमध्ये आले होते. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेही जिल्ह्यात आल्याने त्यांचा प्रभाव जिल्ह्यात दिसून आला. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थीदेखील मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा प्रभाव येत्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. हेमंत सवरा यांनी बाजी मारली. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीतही झाला. विकासाची कामे करण्यासाठी राज्य आणि केंद्रातून योजना, प्रकल्प येऊ लागले आहेत. या ‘डबल इंजिन’ सरकारमुळे नागरिकांचा कल हा महायुतीकडे दिसू लागला आहे. याचा फायदा हा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या तुलनेत विरोधी महाविकास आघाडीची ताकद नगण्य आहे.
आगामी काळात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. रत्नागिरीत जिल्हा परिषदेच्या ५५ जागा आणि एकूण नऊ पंचायत समितींच्या ११० तर सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या ५० आणि आठ पंचायत समितींच्या १०० जागांसाठी लढत होणार आहे.
गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही लढत नेमकी कशी होईल याबाबत प्रचंड संभ्रमावस्था आहे. याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेकडे ३९, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे १५ तर काँग्रेसकडे एक जागा होती. एकूण नऊपैकी आठ पंचायत समित्या शिवसेनेकडे तर चिपळूणमध्ये एकमेव ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसकडे २७, राष्ट्रवादीकडे एक, शिवसेनेकडे १६ तर भाजपकडे सहा जागा होत्या. आठपैकी बहुसंख्य पंचायत समित्या काँग्रेसकडे होत्या; मात्र त्या काळात नारायण राणे काँग्रेसमध्ये होते. पुढे ते भाजपमध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषदेतील बहुसंख्य सदस्य त्यांच्या बाजूने आले.
पंचायत समित्याही महायुतीच्या ताब्यात आल्या. गेल्या पाच वर्षात जलजीवनसह विविध योजनांचे सुरु असलेले नियंत्रणहीन काम, ग्रामीण भागातील शाळांचे पटसंख्या, रिक्त शिक्षक पदे, नादुरुस्त इमारती अशा प्रश्नांसह प्रशासक कारभारामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत निर्माण झालेली असंवेदनशीलता असे कितीतरी प्रश्न आगामी निवडणूक प्रचारात दिसण्याची शक्यता आहे. राजकीय वर्चस्वाची लढाई कशी असेल, हे सांगणेही कठीण बनले आहे.
रत्नागिरीत नेते संभ्रमात असले तरी ग्रामीण भागात ठाकरे शिवसेनेचा अजूनही प्रभाव आहे. येथे शिंदे शिवसेना बऱ्यापैकी ताकद राखून असली तरी भाजपला मात्र कोकणातील इतर भागांप्रमाणे येथे वर्चस्व मिळवता आलेले नाही. त्यामुळे येथील प्रमुख लढत दोन्ही शिवसेनेमध्ये होण्याची शक्यता आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ताकद या सगळ्या स्पर्धेत उतरेल, अशी शक्यता आहे.
सिंधुदुर्गात ठाकरे शिवसेना अवसान गळाल्याप्रमाणे दिशाहीन झाली आहे. त्यामुळे येथे मुख्य स्पर्धा शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यातच दिसेल. महायुतीकडून लढत झाल्यास जागा वाटपावेळी मोठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. महायुती झाल्यास ठाकरे शिवसेनेशी त्यांची मुख्य स्पर्धा होईल, अशी शक्यता आहे.
(लेखन : राहुल क्षीरसागर, महेंद्र दुसार, प्रसाद जोशी, शिवप्रसाद देसाई, राजेश कळंबटे)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.