
Ratnagiri News : राजेश शेळके
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिकांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. फक्त आदेशच दिले नाहीत तर याबाबत कालमर्यादाही घातली आहे. यामुळे येत्या चार महिन्यात राज्य सरकारसह निवडणूक आयोगाला स्थानिकच्या निवडणूका घ्याव्याच लागणार आहेत. पण सध्याच्या राजकीय गोळा-बेरजा पाहता जिल्ह्यात कोण बाजी मारणार याबाबत खमंग चर्चांना उत आला आहे. तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यास महायुतीचेच पारडे भारी पडणार असा दावाही स्थानिक नेत्यांसह सत्ताधारी करताना दिसत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आदेश दिल्याने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण 3 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीमुळे जिल्ह्याचा राजकीय अंदाज बांधणे सध्या कठीणच झाले आहे. कारण आजवर स्थानिक स्वराज्य संस्थेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. पण आता शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यात बऱ्याच ग्रामपंचायत निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने चमक दाखवली आहे. यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचाच भगवा फडकणार असा दावा अनेकदा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना नेत्यांनी केला आहे.
भाजप केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाची ताकद किंवा चमक पाहायला मिळालेली नाही. त्यातच जिल्ह्यातच महायुती अंतर्गत पक्षांची पक्ष वाढीसाठी कुरघोड्या होताना दिसत आहेत. तरिदेखील राबवलेल्या सदस्य नोंदणी अभियानामुळे भाजप सध्या जिल्ह्यात आगामी स्थानिकसाठी पूर्ण तयार असल्याचेच चित्र आहे.
राज्यात आगामी स्थानिकसाठी कोण कोणाशी युती करणार? की कोण कोणाविरोधात लढणार? यासह महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार या राजकीय गणितांवर स्थानिकची निवडणूक ठरणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने स्वबळाचा नारा दिल्यास मतांचे विभाजन, फोडाफोडी राजकारणाला उत येणार आहे. याचा थेट फटका सर्वच पक्षांना बसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सध्या राजकीय स्थिती पाहता खच्चीकरण झालेली महाविकस आघाडी असून ठाकरे शिवसेनेची अवस्थाही कार्यकर्ते आहेत पण लढणारा सेनापतीच नसल्याची झाली आहे. याच्या उलट येथे महायुती मजबूत स्थितीत असून दोन मंत्री, दोन आमदार आहेत. यामुळे स्थानिकमध्ये महायुतीचेच पारडे जड आहे यात शंकाच नाही.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे जिल्ह्याचे विशेष लक्ष आहे. मागील जिल्हा परिषदेच्या 55 जागांमध्ये शिवसेनेचे 39 तर राष्ट्रवादीच्या 15 जागा होत्या. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या असून मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत. तर शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फुट पडून दोन पक्ष तयार झाले आहेत. यानंतर जिल्ह्यातील काही सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आपसूकच शिवसेनेचे प्राबल्य येथे वाढलेले आहे.
जिल्हापरिषदेतील बलाबल आणि आत्ताचे राजकीय स्थिती पाहता शिवसेना जिल्ह्यात वरचढ ठरताना दिसत असून भाजपला मात्र आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. येथे भाजपचा एकही जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप नेतृत्त्वापुढे मोठे आव्हान उभे असणार आहे. सध्यातरीही तशी कोणतीच चिन्हे नसली तरीही ओबीसी उमेदवारांना संधी देण्यासाठी सवर्च पक्षांना कसरत करावी लागणार आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे जिल्हा परिषदेचे गट 62 तर पंचायत समिती गण 124 होतील. जागाही वाढणार असल्याने उमेदवारांची संख्याही वाढेल. त्यामुळे इच्छुकांच्या वाढणाऱ्या भाऊगर्दीला भाजपला सर्वाधिक तोंड द्यावे लागणार हे स्पष्ट आहे.
गेल्या तीन वर्षे राजकीय परिस्थिती एवढी विचित्र आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच लागलेल्या नाहीत. अनेक कारणे देऊन या निवडणुकी पुढे ढकरण्यात आल्या. यामध्ये कोणत्या पक्षांचा फायदा आहे, हे उलघडुन सांगण्याची गरज नाही. परंतु या सर्व राजकीय खेळ्यांमुळे स्थानिक पातळीवर आपले राजकीय स्थान निर्माण करणारे सर्वच लोकप्रतिनिधी गोत्यात आले आहेत. त्यांना या निवडणुकांना सामोरे जाताना शुन्यातुन सुरवात करावी लागणार आहे.
शिवसेनेच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या म्हणजे 15 जागा मिळाल्या होत्या. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन तुकडे झाल्यामुळे त्यांची ताकदही विभागली गेली आहे. राज्यात सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे महायुती म्हणून सत्तेत आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग मंत्री आणि पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांनी चांगलेच वलय निर्माण केले आहे. त्या तोडीची विकास कामे देखील होत आहेत. त्यात भर म्हणजे दापोलीचे आमदार योगेश कदम यांना देखील गृह राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांची ताकद देखील मंत्री पदामुळे वाढली आहे. माजी आमदार संजय कदम शिवसेनेत आल्यामुळे दापोली, खेड भागात शिवसेना अधिक मजबुत होताना दिसत आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तर जिल्ह्यात विरोधकच संपवत ग्रामपंचायतीपर्यंत शिवसेना मजबूत केली आहे. त्यांनी जिल्ह्यात पाळेमुळे घट्ट असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचयात समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीच हीच नंबर वन असले असे राजकीय अंदाज आहेत. मात्र जिल्ह्यात विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षाच्या बांधणीला गती दिली आहे. विनायर राऊत पायाला भिंगरी बांधून रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरे करत असून भास्कर जाधवही अॅक्टीव्ह मोडवर आले आहेत. त्यामुळे उदय सामंत यांच्यासह योगेश कदम यांना मोठ्या राजकीय कुस्तीसाठी तयार रहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.