Shivsena News : कधीकाळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून एक खासदार, तीन आमदार म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेला यंदाच्या लोकसभेत आपली जागा कशीबशी कायम ठेवता आली. महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना झालेल्या वाटाघाटीमुळे विधानसभा शिवसेनेला पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देता आला नाही. त्याचा परिणाम थेट नगरपालिका आणि पंचायत निवडणुकीवर झालेला दिसत आहे.
शिवसेनेचे सहयोगी सदस्य असलेले राजर्षी शाहू आघाडीचे नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वतंत्र आघाडी करत जयसिंगपूर नगरपालिका निवडणूक लढवण्याचे ठरवल्यानंतर नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या पक्षाचा उमेदवार गायब झाला आहे. इतकेच नव्हे तर काठावर निवडून आलेल्या लोकसभेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या बालेकिल्ल्यात केवळ हातकणंगले, हुपरी वगळता नगरपालिका निवडणुकीत आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवता आलेले नाही.
या उलट आणि तुलनेत लोकसभेला पराभूत झालेल्या माजी खासदार संजय मंडलिक यांनी मात्र शिवसेनेचे अस्तित्व कागल, मुरगूड, गडहिंग्लज, चंदगडमध्ये ठाम दाखवले आहे.
जिल्हात शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण केवळ तीन नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपादासाठी दिसणार आहे. हातकणंगले, कागल या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावर थेट उमेदवार असणार आहे. तर मुरगुड मध्ये भाजपचा उमेदवार हा शिवसेनेच्या चिन्हावर लढत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे माजी खासदार संजय मंडलिक यांनी जागा वाटपात कोणतीही तडजोड केली नसल्याचे दिसून येते.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघात मलकापूर, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, शिरोळ कुरुंदवाड या नगरपालिकांचा समावेश होतो. मात्र केवळ हातकणंगले मध्येच नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर आहे. तसेच पंधराहून अधिक उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर आहेत तर हुपरी नगरपालिकेमध्ये केवळ पाच उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर आहेत. उर्वरित ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण गायब आहे.
दहा नगरपालिकांत 100 हून अधिक उमेदवार त्यांनी दिले असून त्यांच्यापैकी काही उमेदवारांकड़ेच धनुष्यबाणाचे चिन्ह असणार आहे. शिवसेना शिंदे गटाला जिल्ह्यातील नागरिकांनी विधानसभेत मोठ्या प्रमाणात यश दिले. धनुष्यबाण चिन्हावर तीन आमदार झाले. हातकणंगलेतुन लोकसभेसाठी खासदार निवडून आले. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे. सध्या त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री आहेत.
पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या पक्षाकडे स्वतंत्र लढण्याची ताकद होती. सत्ता असल्यामुळे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी उमेदवार देता आले असते. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेने कागलमध्ये 20 उमेदवार आणि 1 नगराध्यक्षपदाचा उमेदवार, मुरगूड नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि 14 उमेदवार, गडिंग्लज मध्ये दोन तर चंदगड मध्ये दोन उमेदवार पक्षाच्या चिन्हावर रिंगणात उतरवले आहेत.
काही ठिकाणे वगळता भाजप, आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाशी, तर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेने युती केली आहे. कागलमध्धये मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांची युती झाली. वास्तविक माजी खासदार संजय मंडलिक यांना काही ठिकाणी एकाकी पाडण्याचा प्रयत्न भाजप आणि राष्ट्रवादीने केलेला आहे. मात्र तरीदेखील शिवसेनेचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न मंडलिक यांचा आहे. त्यांच्या पुढाकारातून त्यांनी कागल येथे नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार दिले आहेत. त्यामुळे शिवसेना स्वतंत्र अस्तित्व दाखवत आहे. मुरगूडमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात युती आहे. तरीही तेथे शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आहे.
हातकणंगलेमध्ये नगराध्यक्षपदासह सर्वजागा शिवसेना लढवत अहे. त्यामुळे जिल्ह्यात तीन ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण नगराध्यक्षपदासाठी दिसणार आहे. उवरित ठिकाणी त्यांनी आघाड़ी केल्यामुळे तेथे वेगवेगळे चिन्ह असणार आहे. मलकापूर, पन्हाळा, पेठवडगाव, शिरोळ, कुरुंदवाड आणि जयसिंगपूर येथे धनुष्यबाण दिसणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.