CM Eknath Shinde and Devendra Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : भाजप आता शिंदे गटाच्या खासदारांसह लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांची झोप उडविणार ?

संपत देवगिरे : सरकारनामा

BJP Mahayuti Politics News: राज्यातील 48 पैकी 23 मतदारसंघांत भाजपचे विद्यमान खासदार आहेत. या सर्व मतदारसंघांच्या उमेदवारीविषयीचे अहवाल गुरुवारी सायंकाळी केंद्रीय समितीला पाठविण्यात आले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या मिशन '42 प्लस'साठी हा पक्ष गेले दोन वर्षे दिवस रात्र इलेक्शन मशीन म्हणून काम करीत आला आहे. त्यासाठी त्यांनी सहा स्तरावर यंत्रणा निर्माण केली आहे. या यंत्रणा सर्व 48 मतदारसंघांत कार्यरत आहेत. त्यात त्यांना किती प्रतिसाद मिळतो, ही बाब वेगळी. मात्र, या यंत्रणेमुळे पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना सर्वच मतदारसंघ आपल्याला हवेत असे वाटू लागले आहे. त्याची प्रचिती येत्या आठवडाभरात भाजपच्या सहकारी पक्षांना येण्यास सुरुवात झाली आहे. (Marathi News )

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील 23 विद्यमान खासदारांबाबत एकाच वेळी निरीक्षक पाठवून आढावा घेण्यात आला. यासाठी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिगत स्तरावर अभिप्राय घेण्यात आला. या अभिप्रायानुसार 23 मतदारसंघांतील 6 ते 7 कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदारांबाबत फेरविचार करण्याचे मत मांडल्याचे बोलले जाते. या सर्व 23 मतदारसंघांचे अहवाल केंद्रीय समितीला काल सायंकाळी पाठविण्यात आले. त्यातून भाजपने पहिली प्रक्रिया पूर्ण केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातील उर्वरित 25 मतदारसंघांचा आढावा घेण्याचे काम गेली दोन आठवडे भाजप करीत आहे. आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ज्या मतदारसंघाचा आग्रह धरला आहे. त्या मतदारसंघात पक्षाकडून निरीक्षक पाठविले जाणार आहेत. या निरीक्षकांची नियुक्ती जाहीर न करता थेट पदाधिकाऱ्यांची संवाद केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या सहकारी पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या खासदारांना त्याची झळ बसण्याची शक्यता आहे.

नाशिक विभागात हेमंत गोडसे (Hemant Godse) (नाशिक) आणि सदाशिवराव लोखंडे (शिर्डी) या दोन्ही मतदारसंघांवर भाजपने दावा केलेला आहे. राजेंद्र गावित (पालघर), भावना गवळी (यवतमाळ), श्रीकांत बारणे (मावळ) या मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत.

याशिवाय सध्या ठाकरे गटाकडे असलेल्या हिंगोली, रत्नागिरी, उस्मानाबाद, ठाणे आणि परभणी या मतदारसंघात भाजप (BJP) आपला उमेदवार निश्चितपणे देईल, अशी आजची स्थिती आहे. येत्या आठवडाभरात मतदारसंघाची देवाण-घेवाण आणि दावा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा काळ असेल. त्यामुळे शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना अलर्टवर राहावे लागण्याची चिन्हे आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT