raju shetti satyajit patil sarudkar dhairysheel mane  sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत जातीय समीकरणेच ठरणार 'गेमचेंजर'; आजी-माजी खासदार की नव्याला मिळणार संधी?

पंडित कोंडेकर

Hatkanangale News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने, सत्यजित पाटील-सरुडकर, राजू शेट्टी, डी. सी. पाटील हे उमेदवार मातब्बर असल्यामुळे तुल्यबळ लढत पाहावयास मिळणार आहे. मतदार आजी-माजी खासदारांना पुन्हा संधी देणार की, नवीन चेहऱ्याला खासदार करणार हे निकालानंतर स्पष्ट होणार असले तरी मतदारसंघातील जातीय समीकरणेच महत्त्वाचा फॅक्टर ठरणार, असेच सध्याचे चित्र आहे.

महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार धैर्यशील माने ( Dhairyasheel Mane ) यांना यावेळेची निवडणूक सोपी नसून मतदारसंघात त्यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे. पाच वर्षांत त्यांचा संपर्क नसल्याचा आरोप होत आहे; मात्र त्यांनी कोरोनाचे कारण देत उर्वरित कालावधीत कोट्यवधींचा निधी आणल्याचे सांगत नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीच्या काळात ते प्रचारात खूपच मागे होते; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या दौऱ्यानंतर त्यांच्या प्रचाराला गती आली. आमदार विनय कोरे ( Vinay Kore ), राजेंद्र पाटील-यड्रावकर ( Rajendra Patil Yadravkar ) यांची यंत्रणा माने यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाली. आमदार प्रकाश आवाडे ( Prakash Awade ) यांनीही माने यांना पाठबळ दिले आहे. दुसरीकडे त्यांची संपूर्ण मदार भाजपवर अवलंबून आहे. त्यानुसार भाजपची यंत्रणा गतीने कामाला लागली असून, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माने यांना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे काही भागांत विशेषतः शहरी भागात मोदी फॅक्टरचा फायदा माने यांना होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीने सत्यजित पाटील-सरुडकर ( Satyajit Patil Sarudkar ) यांना उमेदवारी देत माने यांची एकप्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा प्रचाराचा सूर त्यांच्याकडून आळवला जात आहे. नवीन चेहरा असल्यामुळे मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीची पहिल्या टप्प्यात मोठी हवा निर्माण झाली आहे. ही हवा शेवटपर्यंत टिकवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेची काही हक्काची मते आहेत. त्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटासह अन्य घटक पक्षांची मोठी मदत मिळणार आहे. विशेषतः बहुसंख्य मुस्लिम व दलित मते ही सरुडकरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता दिसत आहे. त्यांना आमदार जयंत पाटील, राजू आवळे, मानसिंगराव नाईक यांची ताकद मिळणार आहे. माजी आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, शिवाजीराव नाईक यांचे बळ मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात सरुडकर यांच्यासाठी मोठी प्रचार यंत्रणा सक्रिय होणार आहे. याशिवाय भाजपसह शिंदे गटातील छुपी ताकद त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान खासदार माने यांच्यासमोर सरुडकर एक तगडे आव्हान निर्माण करू शकतात, असे प्राथमिक चित्र सध्या तरी दिसत आहे.

सध्या माजी खासदार राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांच्यासमोर सर्वाधिक आव्हान आहे. महाआघाडीची उमेदवारी नाकारत स्वबळावर उतरलेल्या शेट्टी यांना या वेळी अगदी प्रचार यंत्रणा राबविण्यापासून कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग हा त्यांचा हक्काचा मतदार आहे. यावेळी शेट्टी यांना त्यांची ताकदीने साथ मिळण्याची आशा आहे. शहरी भागात मात्र त्यांचा प्रभाव कमी आहे. त्यामुळे तेथील मतदान घेताना शेट्टी यांची दमछाक होणार आहे. विशेषतः इचलकरंजीसारख्या शहरात मतदान वाढविण्यासाठी त्यांना मोठी यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे. गेल्यावेळी या शहरात अत्यंत कमी मतदान त्यांना झाले होते. त्यामुळेच त्यांना पराभवाचा झटका बसला होता. या वेळी मात्र त्यांनी सावध भूमिका घेत इचलकरंजी शहरावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. वैयक्तिक भेटीगाठीसह अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या पाणी प्रश्नावर ते आपली नेमकी भूमिका मांडण्यावर भर देत आहेत. कारखानदारांवर हल्लाबोल करीत शेतकऱ्यांची मते खेचण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

गतवेळी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांनी लाखापेक्षा जास्त मते घेत लक्ष वेधले होते. या वेळी डी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. नजीकच्या काळात विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे लोकसभेचा प्रचार करताना विधानसभेची पेरणी केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थानिक पातळीवर या निमित्ताने ईर्ष्येचे राजकारण सुरू झाले आहे. त्याचा फायदाही उमेदवारांना होताना दिसत आहे.

मराठा मतांची विभागणी -

गतवेळी मराठा समाजातील बहुतांशी मते विद्यमान खासदार माने यांना मिळाली होती. जातीय राजकारणाचा फटका राजू शेट्टी यांना बसला होता. या वेळी मात्र मराठा मतांमध्ये विभागणी होणार आहे. माने यांच्यासह सरुडकर यांनाही मराठा मते मिळणार आहेत. त्यामुळे सरुडकर यांच्या उमेदवारीचा माने यांना फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय राजू शेट्टी व डी. सी. पाटील हे दोन्हीही जैन समाजातील आहेत; पण तुलनेने अधिक प्रभाव असलेल्या राजू शेट्टी यांना जैन समाजातील बहुतांशी मते मिळतील, असे सध्याचे चित्र आहे.

परिणामकारक मुद्दे -

  • शहरी भागात मोदी इफेक्ट

  • गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा प्रचार

  • स्थानिक प्रश्नांवर प्रचाराचा भर

  • ‘वंचित’च्या मतांचा फटका

  • जातीय समीकरणाचे गणित

दृष्टिक्षेपात मतदारसंघ -

  • पुरुष मतदार : 9 लाख 25 हजार 951

  • महिला मतदार : 8 लाख 88 हजार 331

  • तृतीयपंथी मतदार : 95

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT