Mallikarjun Kharge, Prakash Ambedkar, Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : आंबेडकरांचे तळ्यात मळ्यात, महाआघाडीचा जीव टांगणीला!

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या 12 जागा मागत असल्याने आघाडीच्या तंबूत खळबळ माजली आहे.

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अजूनही आणि स्वतःहून महाविकास आघाडीत सामील होत असल्याची घोषणा केली नसल्याने महाविकास आघाडीचा जीव टांगणीला लागला आहे. आंबेडकर लोकसभेच्या 48 पैकी 12 जागा मागत असल्याने आघाडीच्या तंबूत खळबळ माजली असून वंचितचे हे वागणे म्हणजे आघाडीला खोडा आणि नेहमीप्रमाणे भाजपचा फायदा असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. (Lok Sabha Election 2024)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या स्वतंत्र उमेदवारांमुळे भाजप आणि शिवसेना युतीला 9 जागांचा फायदा झाला होता. अकोलासह ग्रामीण भागात वंचितला मानणारा एक मोठा वर्ग आहे. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या रिपाइंपेक्षा वंचितला जनाधार आहे. मागच्या वेळी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) वंचितने वेगळी चूल मांडल्याने मोठा फटका बसला. स्वतः आंबडेकर (Prakash Ambedkar) तर पराभूत झालेच, पण अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासह दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसची तर इतकी वाईट अवस्था झाली की फक्त चंद्रपूरच्या एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कशाबशा 4 जागा आल्या खऱ्या, पण त्यांची संख्या सुद्धा कमी झाली.

आंबेडकर यांना याची पूर्ण कल्पना असली तरी पुन्हा एकदा तळ्यात मळ्यात करत आताही ते स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातील, अशी परिस्थिती आहे. वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा त्यांच्यावर आधीही आरोप झाला होता आणि आताही तो होताना दिसतोय, याला एकूणच आंबेडकर यांची निवडणूक कार्यशैली असल्याचे बोलले जाते. एका बाजूला भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर भाषणांमधून जोरदार हल्लाबोल करत वातावरण सत्ताधारी विरोधी करणारे आंबेडकर ऐन निवडणुकीत स्वतंत्र भूमिका का घेतात? हा आता संशोधनाचा विषय ठरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी बहुजन वर्गात आजही मोठा विश्वास आहे. प्रस्थापितांविरोधात रान उठवून ते काहीतरी नवे घडवतील, अशी आशा असताना गेल्या वर्षभरापासून त्यांचे विरोधी पक्षांच्या सोबतीने जायचे की नाही, हे अजून निश्चित झालेले नाही. बीड, अमरावती आणि लातूर या ठिकाणच्या त्यांच्या सभा अभूतपूर्व होत्या. या प्रचंड सभांवरील खर्च पाहता तोंडात बोटे जातील, अशी स्थिती होती. या सभांमधून मोदी यांच्या विरोधात एल्गार करणारे आंबेडकर अजून आघाडीत जायची भूमिका का घेत नाही, या प्रश्नानं शंकेला जागा निर्माण केली आहे.

भाजपवर घणाघाती टीका करणारे आंबेडकर त्याचवेळी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सुद्धा विरोधाचे बाण सोडतात त्यावेळी ते आपल्या हक्काच्या अकोले लोकसभा मतदार संघावर पाणी सोडतात आणि भाजपला त्याचा फायदा होतो. तीच गोष्ट इतर 8 मतदारसंघांची असते. पण, यामधून काहीच मार्ग निघत नाही. आताही 2024 लोकसभा निवडणुकीत वंचित मागचा धडा गिरवण्याच्या मार्गावर असल्याने माहाविकास आघाडीला सध्याच्या थंडीत घाम सुटला आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT