PM Modi Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : भाजपने आत्मविश्वास तर गमावला नाही ना ?

Sachin Deshpande

Loksabha Election 2024 : भाजपने राज्यात आत्मविश्वास गमावल्याचे चित्र निर्माण होताना दिसत आहे. आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हाताशी धरत भाजप राज्यात लोकसभा निवडणुका लढू पाहत आहे. भाजप महाराष्ट्रात 45 पारचा नारा देत असताना इतक्या सर्व पक्षांना सोबत घेण्यामागे भाजपने स्वतःचा आत्मविश्वास गमावला की मोदी नावाची जादू ओसरली, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण होत आहे. भाजपसोबत कधी काळी असलेल्या इतर पक्षांना फोडून भाजप स्वतःची रेष मोठी करू पाहत आहे.

भाजपच्या शहरी मतदारांना राजकारणात हे काय सुरू आहे, असा प्रश्न डोक्यात सतत घोळत आहे. आता भाजपसोबत कोणाला घ्यायचे राहिले ? असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना घेत भाजपने त्यांना राज्यसभेत खासदार केले. प्रत्येक जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदारसंघात भाजप स्वकीय नेत्यांपेक्षा विरोधातील नेत्यांना त्यांच्याकडे आणण्यात पुढाकार घेताना दिसतो. यामुळे भाजपचे स्वकीय नाराज असून, त्यांना मात्र केवळ त्यांचा वापर झाल्याचा भास होत आहे. भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आज मनसेला टाळी देत त्यांनादेखील गळास लावले आहेू. आता महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतक्या पक्षांसोबत भाजपने युती केली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात भाजप अंधारात चाचपड, रांगत असल्याचा भास नक्की होतो.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हेच काय ते दिग्गज नेते आता भाजपच्या गळाला लावणे बाकी राहिले आहेत. कदाचित म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांनी 'भाजप सोबत जाणार नाही' असे निवडणूक पूर्वलिखित आश्वासन महाविकासच्या नेत्यांना मागितले होते. वंचितमध्ये केवळ प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडीला राम राम केला तर त्यांची भमिका ही भाजपच्या मदतीची होते, असा आरोपच थेट काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांच्या मागचा बोलविता धनी कोण आणि त्यांना आंबेडकर हे महाविकास आघाडीत का नकोत, याचा शोध सर्वत्र सुरू आहे. गेल्या वेळी आंबेडकर काँग्रेस सोबत नसल्याचा फटका शिंदे परिवारासह काँग्रेसच्या अनेकांना बसला असताना (भाजप व तत्कालीन शिवसेना युतीला फायदा झाला असताना) प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावरून त्यांचा बोलविता धनी कोण, असा मुद्दा चर्चेत आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक घेणे, हे भारत निवडणूक आयोगाने घोषित केले. पण, हे करताना त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल याची चाचपणी आणि नियोजन होताना दिसत आहे. सत्तापक्षाच्या फायद्यासाठी पाच टप्प्यांत महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच आंबेडकर यांनी टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंदुत्व या विषयावरून भाजपने राम मंदिर निर्माणाचे श्रेय घेतले. त्याविषयी देशात वातावरण निर्मिती केली गेली. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार होते. पण, माशी कुठे शिंकली त्यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतलेच नाही. त्यामुळे राजकारण्यांनी ज्या गोष्टीसाठी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुद्दा उचलला होता. तो तर मागेच पडल्याचे चित्र आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यात केवळ एक आमदार आहे. त्यांना आता लोकसभा निवडणुकीत जवळ करत भाजपने हिंदुत्व या एका मुद्द्यावर राज ठाकरे यांच्यासोबत शेकहँड केल्याचे एकूण चित्र आहे. राज ठाकरे यांच्या ताब्यात एकनाश शिंदे यांची शिवसेना सोपविण्याची तर काही युक्ती, पुढील काळात खेळली जाणार नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'त्यांनी दिल्लीत बोलावले मी आलो' ही दिल्लीतील प्रतिक्रियादेखील बोलकी आहे. दिल्लीतील महाशक्तीने त्यांना चर्चेसाठी बोलावले की, त्यांना दोन जागांवर लढण्याचा आदेश दिला जातोय हे पाहण्यासारखे ठरेल. यापूर्वी महायुतीचा, एनडीएचा घटक म्हणून मनसे कधी समोर आला नाही. सोमवारी अचानक मनसे नेते राज ठाकरे यांना दिल्लीत बोलवित भाजप राष्ट्रीय पातळीवर मनसेला एनडीएचा घटक करण्याची तयारी करत आहे.

या सर्व घडामोडीत भाजपमध्ये स्वबळावर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढण्याची शक्ती कुठे लुप्त झाली, असा प्रश्न निर्माण होतो. भाजपला प्रत्येक मतदारसंघात त्यांच्या मित्रपक्षांची साथ घ्यावी लागत असेल, तर भाजपची स्वतःची ताकद घटली काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही ताकद फोडाफोडीच्या राजकारणाने जनमानसात कमी झाली काय , केंद्रात भाजपची दहा वर्षे सत्ता असताना महाराष्ट्रात भाजप का चाचपडत, रांगत का आहे. भाजपचा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वबळावरचा 370 पार चा नारा, NDA चा 400 पार चा नारा 'अजिंक्य' नाही काय ? असा संशय भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला असावा. त्यामुळेच 'त्यांचे हे घेऊ का ते घेऊ आणि राजकारणातील दुकान उचलून घेऊ काय, ' अशी काय ती स्थिती झाली आहे.

केंद्रातील भाजप नेतृत्वाला केवळ महाराष्ट्रातील नेतृत्वावर स्वबळावर पक्ष जिंकण्याचा विश्वासाचा अभाव यातून दिसत आहे. त्यामुळेच कदाचित सर्वपक्षीय नेत्यांना फोडण्यात आणि महायुती त्याच बरोबर एनडीएसोबत आणण्याचा कदमताल सुरू झाला आहे. देशात इतरत्र कुठे भाजपला लोकसभेत धोक्याचे चित्र दिसत असल्यानेच कदाचित महाराष्ट्रावर फोकस करत भाजप सर्व शक्यता या निवडणुकीत चाचपडून पाहत आहे. भाजप स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात गेन करू शकत नसेल तर गेल्या दहा वर्षांची देशातील सत्ता आणि महाराष्ट्रातील महायुतीची सत्तेने काय दिले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रातील आणि राज्यातील डबल इंजिनची सत्ता महाराष्ट्रातील मतदारांवर प्रभाव टाकू शकत नसेल आणि त्यांना मनसेच्या इंजिनची जोड लागत असेल तर भाजपचा आत्मविश्वासात कुठे तरी कमी होताना दिसतो. त्यामुळेच भाजपने महाराष्ट्राबरोबर देशात तर आत्मविश्वास गमावला नाही ना अशी शंका निश्चितच मनात निर्माण करते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT