Maharashtra, Covid 19
Maharashtra, Covid 19 File Photo
विश्लेषण

महाराष्ट्राला मोठा दिलासा : कोरोना रुग्ण संख्येचा आठ महिन्यांतील नीचांक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ लागली आहे. सोमवारी (ता. 4) राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या आठ महिन्यांतील नीचांक ठरली. सोमवारी 2 हजार 26 रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी दोन फेब्रुवारी रोजी सर्वात कमी 1 हजार 927 रुग्ण आढळले होते. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा सुमारे 65 लाख 62 हजारांवर पोहचला आहे.

राज्यात शनिवार व रविवारी चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याने रुग्णसंख्याही कमी आला आहे. पण राज्यातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाणच कमी होत चालले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हाच ट्रेंड कायम राहून दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण आढळून येतील. सोमवारी मागील 24 तासांत 1 लाख 15 हजार 450 चाचण्या झाल्या असून त्यापैकी केवळ 1.75 टक्के नमूने पॉझिटिव्ह आढळू आले आहेत.

राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 33 हजार 637 पर्यंत खाली आली आहे. सोमवारी 5 हजार 389 जणांना उपचारानंतर सोडण्यात आले. सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांपैकी 69 टक्के रुग्ण पुणे, मुंबई, नगर आणि ठाणे या चार जिल्ह्यांतील आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पुण्यात 8 हजार 839 (26.27 टक्के), मुंबई 6 हजार 198 (18.42 टक्के), नगरमध्ये 4 हजार 162 (12.37 टक्के) आणि ठाण्यात 3 हजार 848 (11.43 टक्के) सक्रीय रुग्ण आहेत.

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.31 टक्क्यांवर पोहचले आहे. त्यामुळे सध्यातरी राज्यातील कोरोनाचा कहर खूप कमी झाल्याचे चित्र आहे. परिणामी, अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम असल्यामुळे राज्य सरकारने मास्कचा वापर करण्याचे बंधन कायम ठेवले आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. पण तिथे सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

पुढील दोन महिने सण-उत्सव असल्यानं गर्दी होण्याची शक्यता आहे. या काळात दक्षता न घेतल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस किंवा नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून तयारी केली जात असून नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT