Atul save vs Imtiaz Jaleel sarkarnama
विश्लेषण

Aurangabad East Constituency : औरंगाबाद पूर्वमध्ये अतुल सावे-इम्तियाज जलील यांच्यात चुरशीचा सामना, मतांचे ध्रुवीकरण ठरवणार निकाल!

Aurangabad East constituency Atul save vs Imtiaz Jaleel : अतुल सावे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही मंत्र्यांनी संभाजीनगरात सभा घेतल्या. तर, इम्तियाज जलील यांच्यासाठी औवेसी बंधू तळ ठोकून आहेत.

Jagdish Pansare

Assembly Election News : भाजप महायुतीचे अतुल सावे विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात औरंगाबाद पूर्व मतदारसंघात थेट लढत होत आहे. अतुल सावे यांनी सलग दोन निवडणुकीत या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे. आधी राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी पूर्व मतदारसंघावर आपली पकड मिळवली असली तरी एमआयएमला लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून लीड मिळाली. या जोरावर एमआयएमने इथे इम्तियाज जलील यांना उमेदवारी देऊन सावेंना आव्हान दिले.

सावे यांनी दहा वर्षात केलेल्या विकासकामांचा मुद्दा प्रामुख्याने प्रचारात वापरला. यात शहरासाठी त्यांच्या राज्यमंत्री पदाच्या काळात मंजुर झालेली 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना, एमआयडीसीमध्ये 50 हजार कोटींची आलेली गुंतवणूक आणि आणखी तितकीच म्हणजे एकूण एक लाख कोटींची गुंतवणूक आणि उद्योग संभाजीनगरसाठी आणल्याचा दावा सावे यांनी प्रचारात केला. आपण स्वतः उद्योजक असल्याने ज्या शहरात लहानाचे मोठे झालो तिथे उद्योग आले पाहिजे, ही आपली तळमळ होती, असे सावे यांनी प्रचारसभांमधून सांगत तिसऱ्यांदा संधी मागितली आहे.

तिकडे इम्तियाज जलील यांनी 'कटेंगे तो बटेंगे'सह शहराला नियमित पाणी न देऊ शकणाऱ्यांना घरी बसवा, असे म्हणत प्रचारात स्थानिक मुद्यांना हात घातला. याशिवाय छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावर टीका करत भाजपने हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण केल्या आरोप करत आपली मुस्लिम वोट बँक अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

'या' नेत्यांनी घेतल्या सभा

अतुल सावे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही मंत्र्यांनी संभाजीनगरात सभा घेतल्या. फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर नामांतर केल्याचे श्रेय घेऊ एमआयएमच्या औवेसी यांना आव्हान दिले होते. तर इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी आठवडाभरापासून संभाजीनगरात तळ ठोकून असलेल्या औवेसी बंधूंनी मराठा आरक्षण, वक्फ बोर्ड विधेयकाच्या मुद्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.

फडवीस ओवीसींवर बोलून हिंदू-मुस्लिम करत आहेत,पण त्यांची मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेण्याची हिंमत नसल्याचे सांगत भाजपवर औवेसींनी पलटवार केला. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार लहू शेवाळे यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी दिली. एम. के. देशमुख यांची आधी जाहीर झालेली उमेदवारी रद्द करत काँग्रेसने आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. पक्षाने आपल्याला उमेदवारीचे सरप्राईज गिफ्ट दिले असे म्हणत लहु शेवाळे यांनी ही निवडणुक फार गांभीर्याने घेतली नसल्याचे चित्र आहे. वंचित आघाडीचे अफसर खान यांच्यासह पूर्वमध्ये 15 मुस्लिम उमेदवार मैदानात असल्याने एमआयएमच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मराठा मतदार कोणाच्या बाजुने?

त्यातच मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमाणी यांनी पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार गफ्फार कादरी यांना पाठिंबा जाहीर केला. या खेळीने मुस्लिम मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट फायदा महायुतीचे अतुल सावे यांना होऊ शकतो. परंतु अद्यापही मतदारसंघातील मराठा मतदार कोणाच्या बाजूने असेल हे स्पष्ट झालेले नाही.

भाजपने मराठा आरक्षणाच्या मुद्याला महत्त्व न देण्याची भूमिका घेत ओबीसी हा आपला पारंपारिक मतदार जपण्याची रणनीती आखली आहे. मराठा मतदार या मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावू शकतो. काँग्रेसने मराठा मतदार आपल्या बाजूने वळावा, यासाठी काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. जरांगे पाटील यांनी पूर्वमध्ये कोणाला पाडायचे आणि कोणाला पाठिंबा द्यायचा हा सस्पेंस अजूनही कायम ठेवला आहे. पूर्वमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट लढत आहे.

गेल्या तीन निवडणुकांतील चित्र

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील 2009 ते 2019 या तीन निवडणुकीतील चित्र पाहिले तर दोन वेळा भाजप तर एकदा काँग्रेसने इथे विजय मिळवला होता. 2014 आणि 2019 अशा दोन निवडणुकीत या मतदारसंघातून एमआयएमच्या डाॅ. गफ्फार कादरी यांनी भाजपच्या अतुल सावे यांना कडवी झुंज दिली होती.

2009 : राजेंद्र दर्डा (काँग्रेस) - 48 हजार 190 मते

डाॅ. भागवत कराड (भाजप) पराभूत- 32,2965 मते

2014 : अतुल सावे (भाजप) विजयी- 64528 मते

डाॅ. गफ्फार कादरी (एमआयएम) पराभूत-60268

2019 : अतुल सावे (भाजप) विजयी-93966 मते

डाॅ. गफ्फार कादरी (एमआयएम) पराभूत-800366 मते

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT