महाराष्ट्रात 2022 मध्ये राजकीय भूकंप झाला अन् एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांना सोबत घेत गुवाहाटी गाठली. नंतर भाजपने मन मोठं करत त्यांना शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकत सत्ता काबीज केली. आता पुन्हा एकदा महायुतीने निवडणुकीत मोठे यश मिळवले. पण अजूनही सत्तास्थापनेचे घोडे अडलेले आहे. सत्तास्थापनेत आपला अडसर नसेल, असे एकनाथ शिंदेंनी जाहीर केले असले तरी त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही.
एकनाथ शिंदे यांची नाराजी, सत्तास्थापनेचा घोळ, मंत्रिपदांवरून सुरू असलेली रस्सीखेच, भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अंतिम करण्यासाठी होत असलेला विलंब अशा अनेक मुद्यांमुळे चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील सत्तेचे गणित जुळवताना भाजपला केंद्रातील सत्तेचाही विचार करावा लागत असल्याची चर्चा आहे. शिंदेंची नाराजी भाजपसाठी फारशी परवडणारी नाही.
केंद्रातील एनडीए सरकारमध्ये छोटे-मोठे अनेक पक्ष आहेत. त्यात सर्वाधिक 240 जागा भाजपच्या आहेत. प्रामुख्याने तेलुगु देसम पक्षाच्या 16 आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे 12 आणि इतर पक्षांच्या खासदारांच्या टेकूवर हे सरकार तरले आहे. या दोन पक्षांनंतर सर्वाधिक सात खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. शिंदे नाराज असल्याचे बोलले जात असले तरी ते थेट केंद्र सरकारला दगाफटका करतील, अशी शक्यता अजिबात नाही.
बिहारमध्ये मात्र याचे पडसाद उमटू शकतात. बिहारमध्ये 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूची आघाडी होती. निवडणुकीआधीच भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे भाजपला ७४ आणि नितीश कुमारांना केवळ 43 जागा मिळूनही तेच मुख्यमंत्री झाले. पण त्यानंतर नितीश कुमारांनी भाजपचा साथ सोडत आरजेडीसोबत सरकर बनवले. पुन्हा लोकसभेच्या तोंडावर एनडीएमध्ये गेले.
बिहारमध्ये पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक आहे. भाजप आणि ते जेडीयू एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. पण यावेळी नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देण्याबाबत भाजप फारसा उत्सुक नसेल, हे स्पष्ट झाले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही महायुतीने शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असे जाहीर केले नव्हते. निवडणुकीनंतर याचा निर्णय होईल, असे युतीतील तिन्ही पक्ष सांगत होते. त्यानुसार भाजपने 132 जागा जिंकत मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला.
महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही पुन्हा एनडीएला बहुमत मिळाल्यास नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदावर दावा सांगू शकतात. सध्याचे राजकीय गणित पाहता भाजपला बिहारमध्ये जास्त जागा मिळू शकतात. असे झाल्यास नितीश कुमारांची ‘पलटीराम’ ही ओळख पाहता भाजप ती रिक्त घेणार नाही. पण केंद्रातील सत्तेचा विचार केल्यास भाजपला एक पाऊल मागेही घ्यावे लागू शकते.
आमच्या नेत्याचा सन्मान राखला जावा अशी भूमिका महाराष्ट्रात सेनेचे नेते मांडत आहेत. बिहारमध्येही हाच पॅटर्न येऊ शकतो. त्यामुळे भाजपची कोंडी आतापासूनच कोंडी झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचे राजकीय पडसाद भविष्यात बिहारमध्येही उमटू शकतात. नितीश कुमारांचा अनुभव भाजपसाठी फारसा चांगला नसल्याने तिथे रिक्त घेता येणार नाही, याची पक्की जाणीव पक्षाला आहे. कारण बिहारमधील राजकीय घडामोडींचा थेट परिणाम केंद्रातील सरकारवर पडू शकतो. भाजप छोट्या पक्षांचा वापर करून त्यांना संपवतो, असे अनेक छोट्या पक्षांकडून सातत्याने बोलले जात आहे. महाराष्ट्रातही तीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप महाराष्ट्रासह बिहारमध्यही ताकही फुंकून पिणार, हे स्पष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.