
Mahayuti News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्री कोण होणार, हे ठरलेले नाही. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही राज्यात निर्माण झालेली ही परिस्थिती अभूतपूर्व अशीच आहे. मुख्यमंत्रिपद, महत्वाची मंत्रिपदे यावरून महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्यात गुंतलेले आहेत. पाच तारखेला सरकारची स्थापना होणार आहे. ऐन मोक्याच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेनेच्या जिव्हारी लागेल, असा वार केला आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी आपली पसंती देवेंद्र फडणवीस यांना आहे,असे कळवून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना बॅकफूटवर ढकलले होते. बाजू आपल्या जमेची दिसत नसल्यामुळे शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. आता गृह खात्यासाठी ते अडून बसले आहेत. मध्यंतरी दोन दिवस शिंदे हे आजारी असल्यामुळे आपल्या मूळ गावी गेले होते. परतल्यानंतर पुन्हा ते आजारी पडले आहेत. अशातच छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राइक रेट शिवसेनेपेक्षा चांगला आहे, असा बॉम्ब टाकला आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जात होते. तिकडे, आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झालेली आहे. या तयारीची पाहणी करण्याकडे शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे काय, असे वाटत होते. दीपक केसरकर यांनी नाराजीही व्यक्त केली होती. मंगळवारी या प्रकरणावर पडदा पडला. शिवसेनेच्या नेत्यांनी आझाद मैदानावर जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. नेमके याच वेळी भुजबळ यांनी स्ट्राइक रेटचा मुद्दा उपस्थित करत मंत्रिमंडळातील महत्वाच्या खात्यांवर अप्रत्यक्षपणे दावा ठोकला.
महायुतीत राष्ट्रवादीचा प्रवेश झाल्यापासून या दोन पक्षांत शीतयुद्ध सुरू आहे. महायुतीत आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससला मंत्रिपदे द्यावी लागली. यातील काही मंत्रिपदांसाठी शिंदेंच्या शिलेदारांनी कोट शिवून तयार ठेवले होते. त्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली. परिणामी, अजितदादा पवार यांची सातत्याने कोंडी करण्याचा प्रयत्न झाला.
लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई या बारामती मतदारसंघातून उभ्या होत्या. त्यावेळी शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करून अजितदादांची दमछाक केली होती.
लोकसभा निवडणुकीतील जागावाटपारूनही महायुतीत मतभेद निर्माण झाले होते. नाशिक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडून बसला होाता. भुजबळ यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवली होती. त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद झाले होते. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेने हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांचा पराभव झाला. काही दिवसांपूर्वीच गोडसे यांनी या पराभवासाठी छगन भुजबळ हे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावरूनही वादंग निर्माण झाले होते.
अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या 55 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 41 जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 81 जागा लढवत 57 जागा जिंकल्या आहेत. या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राइक रेट शिवसेनेपेक्षा चांगला आहे, असे भुजबळ यांना सुचवायचे आहे. नुसते सुचवायचेच नाही तर महत्वाच्या खात्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाही दावा आहे, हे सांगायचे आहे. या दोन्ही पक्षांतील वाद आता पुढच्या पातळीवर जाताना दिसत आहे. सरकारचा शपथविधी दोन दिवसांवर आलेला असताना भुजबळ यांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.