Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Ajit Pawar : अजितदादांच्या गुगलीवर एकनाथ शिंदे बोल्ड, नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपलाही धडा!

Ajit Pawar's political strategy impacts BJP and Shinde leadership: अजितदादा पवार यांच्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसून बाहेर आल्यानंतर मळमळ होते. अजितदादा पवारांना हे सर्व शांतपणे ऐकावे लागले होते. वेळ येताच गुगली टाकत नाकाने कांदे सोलणाऱ्या शिवसेना, भाजपला अजितदादांनी आपले महत्व दाखवून दिले आहे.

अय्यूब कादरी

Mumbai News: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीत झालेल्या कुरबुरी आठवतात का? लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर अजितदादा पवार यांच्यावर फोडण्यात आले होते. आता अजितदादांना सोबत घेऊच नका, अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी जाहीरपणे केली होती.

महायुतीत अजितदादा पवार यांचा प्रवेश शिंदे गटालाही आवडलेला नव्हता. शिंदे गटाने पावलोपावली अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.

विधानसभा निवडणुकीचा निकाल अभूतपूर्व, धक्कादायक असा लागला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. तिन्ही पक्षांच्या विजयी खासदारांची संख्या एकआकडी होती. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता. प्रचारात महाराष्ट्रात रान पेटवलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.

या धक्कादायक पराभवाला अजितदादांचा महायुतीतील प्रवेश जबाबदार आहे, अशी टीका झाली होती. अजितदादांना सोबत घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि अजितदादांनी सर्वांना जमिनीवर आणले.

महायुतीत एकापेक्षा अधिक पक्ष असल्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी ओढाताण होणार, हे ठरलेलेच होते. विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढणार, असे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही जाहीर केले होते. त्यामुळे पुढेही मुख्यमंत्रिपद आपल्यालाच मिळेल, अशी अपेक्षा शिंदे गटाला होती, मात्र धक्कादायक निकाल शिंदेंच्या वाटेत आडवा आला. मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले, असे तूर्तास तरी दिसत आहे.

राजकारणात हिशेब चुकता करण्याची संधी सर्वांना मिळत असते, मात्र त्यासाठी थोडा संयम बाळगावा लागतो. महायुतीत प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांनी अजितदादांची कोंडी केली जाऊ लागली, ती शिंदे गट आणि भाजपकडूनही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर अजितदादांची कोंडी स्पष्टपणे दिसू लागली होती.

अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी उघड भूमिका घेत बारामतीतून निवडणूक लढण्याची भाषा केली होती. शिवतारेंची समजूत काढताना अजितदादांची दमछाक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसले की बाहेर आल्यावर मळमळ होते, असे वादग्रस्त विधान तत्कालीन मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले होते. अजितदादांनी त्याचाही हिशेच चुकता केला आहे.

लोकसभेच्या निकालानंतर भाजपचे दुसऱ्या फळीतील नेते आक्रमक झाले. आता अजितदादा सोबत नकोच, असे ते उघडपणे बोलू लागले. लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे दोन पावले मागे घेत अजितदादांनाही ते सर्व सहन केले. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा आल्या.

विविध सर्वेक्षणांतही अजितदादांना कमी जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अजितदादांना बॅकफूटवर ढकलण्याची तयारी सुरू झाली होती. मात्र निकालांनी सर्वांनाच धक्का बसला.

भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. अजितदादांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर त्यांनी मग मुत्सद्दीपणा काय असतो याची झलक दाखवली. मुख्यमंत्री शिंदेच होणार की देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार, यावर खल सुरू झाला.

अजितदादांनी फडणवीस यांना पाठिंबा देऊन टाकला. त्यांची ही खेळी शिवसेनेच्या जिव्हारी लागणारी ठरली. अजितदादांमुळे ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, असा घोषा लावणाऱ्या भाजपलाही अजितदादांनी एका झटक्यात गार केले. अजितदादांनी मुख्यमंत्रिपदासाठी शिंदेंना पाठिंबा दिला असता तर भाजपला बॅकफूटवर जावे लागले असते.

मुख्यमंत्रिपदाचा पेच वरचेवर वाढतच चालला आहे. अजितदादांच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. ती संपली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांनी एका अर्थाने मोठा धोका पत्करला होता. याचा प्रत्यय त्यांना लोकसभा निवडणुकीत आला.

दुसरीकडे महायुतीतही त्यांची कोंडी केली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसून बाहेर आल्यानंतर मळमळ होते, असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे तत्कालीन मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले होते. वाचाळ सावंत यांच्या या विधानाला अजितदादांनी आता सडेतोड उत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनाही लक्ष्य केले होते. नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांच्यामुळेच आपला पराभव झाला, असा आरोप काही दिवसांपूर्वी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केला होता. चहूबाजूंनी अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. ही परिस्थिती संयमाने हाताळत अजितदादांनी मुत्सद्दीपणा दाखवला होता. संधी मिळताच त्यांनी गुगली टाकली आणि त्यामुळे शिवसेनेला बॅकफूटवर जावे. नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपलाही त्यांनी आपले महत्व दाखवून दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT