Basavraj Patil Sarkarnama
विश्लेषण

Basavraj Patil: काँग्रेसच्या चाकूरकरांचा एकमेव पराभव करणाऱ्या भाजपलाच मानसपुत्र गेले 'शरण'!

अय्यूब कादरी

Latur Political News : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा त्यांच्या राजकीय कारकीर्दीत एकदाच पराभव झाला. 2004 ती लोकसभा निवडणूक होती. त्यावेळी विजयी झाले असते तर चाकूरकर यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली असती, अशी चर्चा होती. मात्र लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रूपाताई पाटील-निलंगेकर यांनी त्यांचा पराभव केला. चाकूरकर यांचे मानसपुत्र समजले जाणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील (मुरुमकर) यांनी आता त्याच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काळाची चक्रे उलटी फिरतात, ती अशी.

बसवराज पाटील यांनी 26 फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 27 फेब्रुवारीला त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. बसवराज पाटील यांचे घराणे परंपरागत काँग्रेसचे. त्यांचे वडील दिवंगत माधवराव पाटील यांचा राजकारणात दबदबा होता. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बसवराज पाटील यांनी राजकारणात जम बसवला.

1999 च्या निवडणुकीत ते पहिल्यांदा उमरगा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर काँग्रसेने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. ते ग्रामविकास राज्यमंत्री झाले. 2004 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये उमरगा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे काँग्रेसने त्यांना औसा (जि. लातूर) विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. 2009 आणि 2014 असे सलग दोनवेळा ते औसा मतदारसंघातून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.

शिवराज पाटील चाकूरकर आणि बसवराज पाटील यांचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध आहेत. शिवराज पाटील चाकूरकर हे 1980 च्या निवडणुकीपासून सलग सातवेळा लातूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी उमरगा तालुक्याचा समावेश लातूर लोकसभा मतदारसंघात होता. प्रत्येक निवडणुकीत उमरगा तालुक्याने चाकूरकर यांना मताधिक्य दिले.

2004 च्या निवडणुकीत मात्र असे झाले नाही. या निवडणुकीत भाजपने रूपाताई पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली होती. रूपाताई यांचे माहेर उमरगा तालुक्यातील मुळज आहे. भाजपचे नेते दिवंगत शिवाजीदादा चालुक्य यांच्या त्या भगिनी आहेत. माहेरवाशिण म्हणून रूपाताई यांना सहानुभूती मिळाली. त्यावेळी उमरगा - लोहारा तालुक्यात काँग्रेसच्या विरोधात उमरगा - लोहारा विकास आघाडी (शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप) होती. या आघाडीच्या नेत्यांनी रूपाताई यांच्यासाठी जोरकसपणे प्रयत्न केले होते. त्यामुळे रूपाताई यांना उमरगा-लोहारा तालुक्यांतून मताधिक्य मिळाले आणि त्या विजयी झाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

1999 मध्ये विजयी झाल्यानंतर बसवराज पाटील यांना मंत्रिपद मिळाले होते. असे असतानाही पाटील यांच्या उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून 2004 च्या निवडणुकीत चाकूरकर यांना मताधिक्य मिळू शकले नव्हते. त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसवराज पाटील यांचाही पराभव झाला होता. याचा अर्थ असा की मंत्रिपदी असतानाही त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या नाराजीचा त्यांच्यासह चाकूरकर यांना फटका बसला होता. 2004 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव चाकूरकर यांच्या राजकीय कारकीर्दीतील एकमेव होता आणि तो पराभव भाजपच्या उमेदवाराने केला होता.

त्यापूर्वी ते कोणत्याही निवडणुकीत पराभूत झाले नव्हते. 1973 मध्ये चाकूरकर यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले असते तर चाकूरकर पंतप्रधान झाले असते, अशी चर्चा त्यावेळी होती. त्यामुळे चाकूरकरांच्या पराभवावर नंतर हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आता त्याच भाजपमध्ये चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील यांनी प्रवेश केला आहे.

2004 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रसने चाकूरकर यांना राज्यसभेवर घेतले. डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये त्यांच्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (26 नोव्हेंबर 2008) चाकूरकर यांना केंद्रीय गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2010 मध्ये काँग्रेसने त्यांची पंजाबच्या राज्यपालपदी नेमणूक केली. 2014 ला केंद्रात भाजपची सत्ता आली. त्यानंतर काँग्रेसने नेमलेले जवळपास सर्व राज्यपाल भाजपने बदलले होते. केवळ शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांनी राज्यपालपदाचा कार्यकाळ पूर्ण केला होता.

उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघात बसवराज पाटील यांचे राजकीय वजन आहे. मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. यासह श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी चांगला जम बसवला आहे. त्यांचे बंधू बापूराव पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांना ही संधी दुसऱ्यांदा मिळाली आहे. असे असतानाही 2009 पासून, म्हणजे उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यापासून काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणे बसवराज पाटील यांना शक्य झालेले नाही. 2004 मध्ये तर त्यांचाच पराभव झाला होता. म्हणजे गेल्या सलग चार टर्मपासून उमरगा-लोहारा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही.

याचदरम्यान 2009 आणि 2014 मध्ये पाटील हे औसा मतदारसंघातून विजयी झाले. बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरळीत सुरू होती. कारखान्याचा नावलौकिक आहे, मात्र गेल्या एक-दोन वर्षांपासून हा कारखाना आर्थिक अडचणीत असल्याची चर्चा आहे. कधी नव्हे ते पहिल्यांदाच गेल्यावर्षी शेतकऱ्यांना उसाची बिले देण्यास विलंब झाला होता.

प्रदेश कार्याध्यक्ष असतानाही बसवराज पाटील यांनी पक्षाच्या बैठका, कार्यक्रमांकडे पाठ फिरवली होती. काही दिवसांपूर्वी लातूर येथे काँग्रेसची विभागीय बैठक झाली होती, त्यालाही ते उपस्थित राहिले नव्हते. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली एखादे मोठे आंदोलन झाल्याचे किंवा जनतेच्या प्रश्नांसाठी ते रस्त्यावर उतरल्याचे लोकांना आठवत नाही. मतदारसंघ राखीव झाल्यानंतर गेल्या तीन पंचवाार्षिक निवडणुकांपासून उमरगा - लोहारा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांमध्ये मरगळ पसरली होती.

एका अर्थाने गेल्या 15 वर्षांत काँग्रेस पक्ष संघटनेला पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यात, विशेषतः उमरगा तालुक्यात फारसा उपयोग झाला नाही, असे चित्र आहे. पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचा कणा मोडला आहे, मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, नव्या नेतृत्वाला, तरुणांना संधीही उपलब्ध झाली आहे. बसवराज पाटील (Basavraj Patil) यांनी पक्ष सोडल्याच्या धक्क्यातून सावरण्यासाठी जिल्ह्यात काँग्रेसला वेळ लागणार आहे, मात्र ही पोकळी भरून काढण्यासाठी तरुण नेतृत्वही समोर येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पराभवात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या नेत्यांसोबत त्यांना आता काम करावे लागणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT