Solapur Lok Sabha Constituency News :
लोकसभा निवडणूक कार्यक्रम काही दिवसांतच जाहीर होईल. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच राजकीय पक्षांकडून आणि इच्छुक उमेदवारांकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. राज्यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपकडून विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा पत्ता कट करून नवीन उमेदवाराला संधी दिली जाणार आहे. भाजपकडून सध्या विविध उमेदवारांची नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये माळशिररस तालुक्यातील पूर्वाश्रमीचे कट्टर भाजप समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांच्याही नावाचा समावेश आहे.
माळशिरस तालुक्याचे राजकारण करणाऱ्या जानकरांनी आता थेट भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपकडूनही जानकर यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर जानकर यांनी मतदारसंघात दौरे गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांची फौजच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे जनमत जाणून घेण्यासाठी कामाला लागली आहे. जानकर यांच्या या पथकाकडून सोलापूर मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन जनमताचा आढावा घेतला जात आहे.
प्रचारासह जनमत जाणून घेणाऱ्या या पथकाकडून नागरिकांना अनेक प्रश्न विचारले जात आहेत? त्यामध्ये गावातील समस्या, भाजपने केलेली विकास कामे, पंतप्रधान मोदींचा प्रभाव, यासह आपण उत्तम जानकर यांच्याशी निगडीत काही प्रश्न, जसे की तुम्ही जानकरांना ओळखता का? ते सोलापूर मतदारसंघातून निवडणुकीस उभारले तर मतदान होईल का? भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास तुम्ही मतदान करणार का? अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. सोमवारी या पथकाने सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या मतदारसंघात भाजपचे सुभाष देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. असे असतानाही या मतदारसंघात नागरिकांकडून भाजप उमेदवारास मतदान करण्याबाबत संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
'आम्ही मालकांचे ऐकणार नाही'
दरम्यान, दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप माने हे सध्या याच मतदारसंघातून आगामी विधानसभा लढवण्याची तयारी करत आहेत. माने यांचा या मतदारसंघातील काही गावांमध्ये चांगला प्रभाव आहे. त्यापैकीच माने यांची कर्मभूमी असलेल्या तिऱ्हे या गावात जानकर यांच्या कार्यकर्त्यांचे पथक आपल्या वाहनांच्या ताफ्यासह पोहोचले. यावेळी पथकाकडून जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी काही मतदारांनी भाजप उमेदवारास मतदान होणार नसल्याची मतं व्यक्त केली. त्यावर सर्वे करणाऱ्या पथकाकडून दिलीप माने यांनी आवाहन केल्यानंतर तर मतदान करतील की नाही? असा एक प्रश्न टाकला. त्यावर उपस्थितांनी आम्ही मालकांचे सुद्धा ऐकणार नाही, अशी उत्तर दिले. त्यामुळे जानकरांचे पथक क्षणभर बुचकाळ्यात पडले आणि आपला जनमताचा कार्यक्रम गुंडाळत पुढे मार्गस्थ झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
परंतु या प्रसंगामुळे आता दक्षिणमधील दिलीप माने यांचा प्रभाव असलेल्या गावांमध्येच मतदारांकडून आम्ही मालकांचेसुद्धा ऐकणार नाही, असे उत्तर येऊ लागल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. यावेळी मतदारांनी आपल्या उत्तरातून नेमके भाजप उमेदवाराला विरोध केला की दिलीप माने यांना? अशी कुजबूज आता सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उत्तम जानकर यांना मात्र भाजप आमदार असलेल्या मतदारसंघातच अशा प्रकारे संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.