Devendra fadnavis & Manoj Jarange Patil Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra government protest : राज्य सरकारचा डाव फसला! एक दिवसाची परवानगी, पण जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम; आता नेमके काय होणार?

Jarange indefinite protest News: राज्य सरकारने एक दिवसाची परवानगी दिली असली तरी जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. यामुळे राज्य सरकारचा कस लागणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील आक्रमकपणे आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे एकीकडे राज्य सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी दोन महिन्यापूर्वीच खासदार, आमदार, मंत्री व मुख्यमंत्र्यांना 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांच्या या मागणीकडे सुरुवातीला राज्य सरकारने दुर्लक्ष केले.

ऐनवेळी ते गणेशउत्सवाचा काळ असल्याने मनोज जरांगे (Manaoj Jaranage) आंदोलनाची वेळ बदलतील, असे गृहीत धरले जात होते. गणेशउत्सवाचा काळ असल्याने परत आंदोलन करण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरण्यात आला. मात्र, जरांगे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यातच कोर्टाकडून जरांगे यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यापासून रोखले होते. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. जरांगे यांनी 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुन्हा मुंबईकडे निघाले आहेत. तर दुसरीकडे जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला बुधवारी पोलिसांनी परवानगी दिली आहे.

ही परवानगी सध्या केवळ एका दिवसासाठी असून त्यामध्ये काही जाचक अटीशर्तीही घालण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने एक दिवसाची परवानगी दिली असली तरी जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. यामुळे राज्य सरकारचा कस लागणार आहे. दुसरीकडे रात्री उशिरा जरांगे यांच्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे शिष्टमंडळ भेट घेणार असून या चर्चेतून काय तोडगा निघणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करण्याच्या निर्णयावर एकीकडे मनोज जरांगे ठाम आहेत. पोलिसांनी त्यांना 29 ऑगस्टला केवळ एक दिवसाचे उपोषण करण्यासाठी परवानगी दिले आहे. त्यासोबतच यावेळी एकूण आठ अटी घालण्यात आल्या आहेत. जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात येणार आहेत. या आंदोलनासाठी जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो मराठा समाजाचे आंदोलक आहेत त्यामुळे या सर्व मंडळींनी मुंबईत प्रवेश केला तर राज्य सरकारसमोरील अडचणी वाढणार आहेत.

जरांगे यांनी गेल्या चार दिवसापासून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरून ते पाठीमागे हटण्यास तयार नाहीत. त्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता राज्य सरकारने त्यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी मुंबईत आलो तर परत माघारी फिरणार नाही. तिथे बेमुदत उपोषण करणार आहे, असे जरांगे यांनी वेळोवेळी सांगितलेले आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता ते मुंबईला निघाले आहेत.

गणेशोत्सवामुळे सध्या मुंबईत लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हीच बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली होती. मात्र, आम्ही आंदोलनावर ठाम असून न्यायालयात दाद मागू असे जरांगे यांनी जाहीर केले होते. त्यांनी मुंबईकडे कूच केल्याने आता राज्य सरकारने त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. हे आंदोलन त्यांना फक्त सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच करता येणार आहे. वेळ संपल्यानंतर जरांगे यांना त्यांचे आंदोलन थांबवावे लागणार आहे.

येत्या काळात नेमके काय होणार?

राज्य सरकारने आंदोलनाला एक दिवसाची परवानगी दिली आहे. पण जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आता येत्या काळात आता नेमके काय होणार? याची उत्सुकता लागली आहे. राज्य सरकार व जरांगे हे दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असले तरी येत्या काळात कोणाला तरी यावरून माघार घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच यावर पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळेच आता येत्या काळात नेमके काय होणार? याची उत्सुकता लागली आहे.

पुढे काय होऊ शकते ?

येत्या काळात जर मनोज जरांगे पाटलांचा दबाव आणि लोकसहभाग वाढल्यास राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. दुसरीकडे राज्य सरकार कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल पण ते कठीण ठरू शकते, कारण आंदोलनाला सामाजिक व राजकीय पाठिंबा मोठा आहे. त्यामुळे कदाचित त्यावर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन होण्याची शक्यता आहे.

प्रसंगी तणाव वाढला, तर राज्यभर आंदोलनाचे पडसाद उमटतील, ज्याचा थेट राजकीय परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय राज्य सरकार व न्यायालयाच्या सहमतीने आंदोलनाला एखाद्या अन्य ठिकाणी हलवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यामुळे सार्वजनिक व्यवस्था व विरोध दोन्ही नियंत्रित राहू शकतात. त्यामुळे आता येत्या काळात नेमका कोणत्या पर्यायाचा वापर केला जाणार याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT