Nagpur Hit And Run case  Sarkarnama
विश्लेषण

Hit & Run Cases : पैशांची गुर्मी अन् सत्तेचा माज; गरीबांना एक, 'बेधुंद' राजपुत्रांना वेगळा नियम!

अय्यूब कादरी

एका मंत्र्याच्या मुलाने अपघात केला, पोलिसांनी त्याला पकडले आणि थेट लॉकअपमध्ये टाकले... आरोपीने स्वतःची ओळख सांगितल्यानंतर तर चिडलेला पोलिस अधिकारी त्याला बुकलून काढत आहे...! होय, हे वाचून तुम्हाला जे वाटले ते खरेच आहे, अशी दृश्ये चित्रपटांतच दिसतात. हल्ली ती दाक्षिणात्य मसाला चित्रपटांत अधिक दिसून येतात. वास्तवात असे घडतच नाही किंवा फार कमी वेळा घ़डते.

पोलिस कायद्याची अंमलबजावणी निपक्षपातीपणे करतात का, याची बहुतांश उत्तरे नकारार्थीच मिळतील. त्यातही प्रश्न गरीबांचा आला तर मात्र सर्व उत्तरे नकारार्थीच मिळतील. कदाचित सरसकट सर्व प्रकरणांत पोलिस असे वागत नसतील, मात्र लोकभावना तशी झाली आहे, याची कल्पना पोलिसांनाही आहे. गुन्हेगारीच्या प्रकरणांत श्रीमंतांची, प्रभावशाली राजकीय नेत्यांची मुले असली तर मात्र पोलिसांचा दुटप्पीपणा हमखास समोर येतो. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या 'हिट अँड रन' प्रकरणांत या बाबी समोर आल्या आहेत.

पुणे, मुंबईनंतर आता नागपूरमध्येही हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. अशा दुर्घटनांमध्ये श्रीमंतांची, राजकीय नेत्यांची मुले असली की साहजिकच त्यांना अधिक प्रसिद्धी मिळते. गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकरणांनी जणू महाराष्ट्राला वेठीसच धरले आहे. ठराविक कालावधीनंतर 'हिट अँड रन'ची प्रकरणे घडत आहेत. पुण्यात भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण, तरुणीला उडवले आणि महाराष्ट्र हादरून गेला. दुचाकीवरील दोघांचा जीव गेला. यापेक्षा खरे धक्के तर पुढे बसत गेले. दारूच्या नशेत पोर्श कार भरधाव पळवणाऱ्या बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आले. श्रीमंत बापाच्या मुलाला वाचवण्यासाठी राजकीय नेते, पोलिसांसह सर्व यंत्रण किती तत्परतेने कामाला लागली होती, हे त्यावेळी देशाने पाहिले .

बड्या बापाच्या या आरोपी अल्पवयीन मुलाची पोलिस ठाण्यात बडदास्त ठेवण्यात आली होती, असेही आरोप झाले. ज्युवेनाइल बोर्डाने त्याला 17 तासांच्या आत जामीन मंजूर केला. पुन्हा असे वागणार नाही, असा निबंध त्याच्याकडून लिहून घेण्यात आला. माध्यमे आणि नागरिकांच्या सजगतेमुळे पैशांच्या ताकदीसमोर यंत्रणेचे लोटांगण घालणे बंद झाले आणि अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात पाठवण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणी यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. अपघातानंतर आरोपीच्या बचावासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची एका आमदाराने दाखवलेली तत्परताही लोकांच्या समोर आली. श्रीमंतांसाठी यंत्रणा कशी वागते, श्रीमंतांसमोर कशी लोटांगण घालते, याचे भीषण वास्तव यानिमित्ताने समोर आले होते. अल्पवयीन आरोपी हा पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे.

पुण्यापाठोपाठ मुंबईत हिट अँड रनचा (Pune Hit And Run Case) प्रकार घडला. वरळी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याला भरधाव कारने उडवले आणि त्यांना फरफटत नेले. यात महिलेचा मृत्यू झाला. हे भयावह दृश्य पाहून अन्य वाहनांच्या चालकांनी या कारचालकाला थांबण्याचा इशारा केला होता, मात्र त्याचा उपयोग झाला नव्हता. शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा मुलगा ही कार चालवत होता. अपघातानंतर तीन दिवस तो फरार होता. अपघातापूर्वी कारचालकाने, म्हणजे नेत्याच्या मुलाने मित्रांसोबत मद्यप्राशन केल्याचे समोर आले होते. कारच्या धडकेने दुचाकीवरील महिला उडून बोनेटवर पडली, मात्र कार थांबवावी, असे त्या बेधुंद राजपुत्राला वाटले नाही. त्याने महिलेला तसेच फरफटत नेले.

यापाठोपाठ आता नागपुरातही एका राजपुत्राने असा प्रकार केला आहे. दारूच्या नशेतील ऑडी कारचालकाने आठ ते दहा वाहनांना धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या कारमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत होता. या अपघातापूर्वी संकेत बावनकुळे याने मित्रांसमवेत मद्यपान केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातही हलगर्जीपणा दाखवलाच. पुणे आणि नागपूर येथील हिट अँड रन प्रकरणांत अरोपींच्या पालकांना अटक करण्यात आली होती. नागपूर येथे मात्र तसे झाले नाही. त्याचे कारण वेगळ्याने सांगायची गरज नसावी. जीवितहानी झाली नाही म्हणून नागपूरच्या 'हिट अँड रन'चे गांभीर्य कमी होते, असे म्हणता येणार नाही.

पुण्यातील अल्पवयीन आरोपीने 12 वी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात मित्रांना पबमध्ये मध्यरात्री पार्टी दिली होती. तिन्ही प्रकरणांमधील आरोपींवर दारूचा अंमल होता. विरोधकांनी या सर्वच प्रकरणांवर आवाज उठवला, सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली. लोकांच्या लक्षात येईल इतपत पोलिस यंत्रणा या प्रकरणांत पक्षपातीपणे वागली. राजकीय दबाव, हे यामागचे कारण असू शकते. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाल्याचे, पोलिस स्वतःहून आपला धाक संपवत असल्याचे या प्रकरणांच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिले.

पैशांच्या बळावर सर्वकाही विकत घेता येते, असा समज समाजात रूढ झाला आहे. तौ बऱ्याच अंशी खरा आहे. 'हिट अँड रन'सारखे प्रकार घडले आणि त्यात श्रीमंत बापांची मुले सामील असतील तर लोकांना जे वाटते त्याची प्रचीती हमखास येते. पुण्यातील प्रकरणानंतर समाजातून पोलिस आणि सरकारवर प्रचंड रोष व्यक्त झाला होता. त्यामुळे भविष्यात आरोपींना वाचवण्याचे प्रकार घडणार नाहीत, असे लोकाना वाटत होते, मात्र ती आशा भाबडी ठरली. वरळी आणि त्यानंतर नागपूर हिट अँड रन प्रकरणातही यंत्रणेचे वागणे लोकांना चीड येईल, असेच होते. त्यामुळे गरीबांना एक आणि श्रीमंतांना वेगळा न्याय, अशी समाजात रूढ झालेली भावना खरीच आहे, असा संदेश यंत्रणाच देत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT