Local Body Election Sarkarnama
विश्लेषण

Mahayuti Local Body Elections 2025: पश्चिम महाराष्ट्रात ताकद टिकविण्याचे महायुतीपुढे आव्हान

Maharashtra 2025 Local Body Elections Strategy: वेगाने वाढणारी शहरे व सहकाराने समृद्ध असलेला ग्रामीण भाग असा दुहेरी संगम असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अनेक मातब्बर नेते आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना संधी देवून नेतृत्वाची मांड पक्की करण्यासाठी स्थानिक निवडणुका महत्त्वाच्या असतात.

धनंजय बिजले

महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. नव्या राजकीय जुळणीमुळे पुणे, सातारा आणि अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यांत सध्या महायुतीचे प्राबल्य वाढले आहे. काही वर्षांत राज्यातील सत्तेच्या चाव्या शहरी मतदारांच्या हाती गेल्या आहेत. या भागातील वाढती ताकद टिकवण्याचे आव्हान महायुतीपुढे असेल, तर महाआघाडीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

वेगाने वाढणारी शहरे व सहकाराने समृद्ध असलेला ग्रामीण भाग असा दुहेरी संगम असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अनेक मातब्बर नेते आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना संधी देवून नेतृत्वाची मांड पक्की करण्यासाठी स्थानिक निवडणुका महत्त्वाच्या असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील हे महायुतीचे या भागातील नेते सध्या राज्यात नेतृत्व करीत आहेत. तर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, रामराजे नाईक निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी मातब्बर नेते येथूनच येतात.

पुणे जिल्ह्यात पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन महापालिका, आठ नगरपालिका, तीन नगरपंचायतीसाठी निवडणुका होतील. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुमारे ५७९ सदस्य आहेत. पुणे व पिंपरीचा शहरीकरणाचा वाढता वेग थक्क करणारा आहे. त्याच्या जोडीने नागरी समस्यांची नवनवी आव्हानेही निर्माण होत आहेत. या दोन्ही शहरांत सध्या हजारो कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. त्यांना वेग द्यायचा असेल तर या ठिकाणी सत्ता मिळवणे महायुतीसाठी आवश्यक आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांनी शेकडो कार्यकर्त्यांना उमेदवारीचे आमिष दाखविले आहे. सध्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. मुंबई वगळता राज्यात महायुतीतील घटक पक्ष निवडणुका स्वतंत्र लढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ही निवडणूक महायुती म्हणून लढविणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पुणे-पिंपरीत समीकरणबदल

पुणे महापालिकेत ४२ प्रभागातून १६६ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. गेल्या वेळी १६४ पैकी एकट्या भाजपचे १०० नगरसेवक होते. त्यांच्याकडे शिवसेनेतून पाच नगरसेवक आले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ३५ नगरसेवक होते. शिवसेनेचे दोन नगरसेवक होते. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकताच शिवसेने प्रवेश केल्याने निवडणुकीत त्याचा पक्षाला लाभ होणार आहे. युती झाली तर नगरसेवकांच्या जागा त्या-त्या पक्षाकडे गेल्यास, उर्वरित जागावाटपासाठी अवघ्या २२ जागा राहणार आहेत. या जागा प्रामुख्याने विरोधी पक्षांच्या असल्याने त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा सांगण्याची शक्यता आहे.

महायुतीतील तिन्ही पक्षांचेच १४२ माजी नगरसेवक असल्याने, नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणे कठीण आहे. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आता उमेदवारीसाठी आतुरले आहेत. महायुती झाल्यास, शिवसेनेला आठ-दहा जागा द्याव्या लागतील, राष्ट्रवादी काँग्रेसही ४० ते ५० जागा मागेल. उमेदवारी न मिळालेली कार्यकर्ते कोणती भूमिका घेणार, याचेच टेन्शन युतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना राहणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणुका लढवतील. या तिन्ही पक्षातील इच्छुकांना उमेदवारी मिळण्यात फारशी अडचण येणार नाही. आघाडीकडे तुलनेने सक्षम उमेदवारांची संख्या कमी आहे. मात्र काही ठिकाणी महायुतीतील बंडखोरांना उमेदवारी देऊन ते मोठे आव्हान निर्माण करण्याची रणनीती आखू शकतात. पक्षाने उमेदवारी नाकारल्यास, काही जण विरोधी पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. महायुतीचे प्रचंड प्राबल्य दिसते. मात्र, भाजप सोडून पाच-सहा माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये गेले होते. त्यांच्यासह मूळ राष्ट्रवादीतील १५-१६ माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत. एकेकाळी पालकमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आता भाजप मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे महायुती झाल्यास जागावाटपासाठी रस्सीखेच होणार आहे. महायुतीला आरपीआय (आठवले गट) यांची साथ आहे. त्यांनी भाजपकडे आठ जागा मागितल्या आहेत. महायुती असो वा महाविकास आघाडी यांनी एकत्र निवडणूक लढविल्यास कोणाला किती जागा मिळतील, याबाबत उत्सुकता आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर, सासवड तसेच जेजुरी नगरपालिका या काँग्रेसच्या पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जात होत्या. मात्र भोरमध्ये काँग्रेसचे मातब्बर नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तसेच सासवडला विधानसभेत काँग्रेसचा पराभव झाल्याने येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहील. इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. हर्षवर्धन पाटील आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. दौंडला भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांची सत्ता होती. येथे विरोधकांचे संख्याबळही मोठे होते. शिरूरला उद्योजक प्रकाश धारिवाल समर्थक आघाडीची सत्ता होती. जुन्नरचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे होते. आळंदीत भाजपची सत्ता होती. आताही तेथे भाजप बळकट मानला जातो. माळेगाव, मंचरला नगर पंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे.

अहिल्यानगरमध्ये ‘सारीपाट’

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूकीसाठी अनेकांनी दंड थोपटले असले तरी प्रभाग रचना, प्रभागातील नगरसेवकांची संख्या यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. अहिल्यानगरला १७ प्रभागातून ६८ नगरसेवक निवडून येतात. गेल्या वेळी त्यात सर्वाधिक २३ नगरसेवक शिवसेना, तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे १९, तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे १५ नगरसेवक निवडून आले होते.

अहिल्यानगर जिल्ह्यात ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिर्डी, शेवगाव, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, नेवासा, पाथर्डी, जामखेड व कर्जत या नगरपरिषदांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आदेश प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. कर्जत, जामखेडमध्ये विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्याच कार्यकर्त्यांत लढत होणार आहे. शेवगाव, पाथर्डीमध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. प्रताप ढाकणे यांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू आहे.

साताऱ्यात आघाड्या

विधानसभेला सातारा जिल्ह्यात सर्व ८ ठिकाणी महायुतीचे आमदार निवडून आले. त्यातील चौघांना मंत्रिपद मिळाले आहे. जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांत चुरशीने निवडणुका होतील. फलटण, कऱ्हाड, मलकापूर व रहिमतपूर येथे सत्तेसाठी महायुतीला महाविकास आघाडीशी संबंधित स्थानिक आघाड्यांशी झगडावे लागणार आहे. सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता होती. आता दोन्ही राजांचे मनोमिलन झाले आहे. त्यामुळे त्यांचे एकत्रित पॅनेल असेल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दीपक पवार हेही पॅनेल उभे करण्याच्या तयारीत आहेत. कऱ्हाड पालिकेत स्थानिक आघाड्यांवर राजकारण चालते. मागील वेळी येथे भाजपने स्वबळावर फक्त पाच जागांवर यश आले. त्यात थेट नगराध्यक्षपदाचाही भाजपचा उमेदवार विजयी झाला. त्यांच्या विरोधात काँग्रेस पुरस्कृत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जनशक्ती आघाडी, माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव यांची यशवंत तर माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांची लोकसेवा आघाडी अशी यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडी असे एकत्रित गट विरोधात होते. त्यांच्या १६ जागा आल्या.

फलटणला रामराजे नाईक-निंबाळकर यांचेच वर्चस्व राहिलेले आहे. या विधानसभा निवडणुकीत रामराजे यांना शह बसला आहे. या बदलाचा नगरपालिका निवडणुकीत किती परिणाम होतो हे पहावे लागणार आहे. रहिमतपूरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांना भाजपच्या चित्रलेखा माने-कदम यांच्या गटाचा विरोध असतो. म्हसवडमध्ये मंत्री जयकुमार गोरे व शेखर गोरे एकत्र आले आहेत. तर, प्रभाकर देशमुख व रासप व काँग्रेसचा गट एकत्र लढण्याची शक्यता आहे.

वाई पालिकेत यावेळी मंत्री मकरंद पाटील यांच्या गटाविरोधात भाजप, शिवसेना काँग्रेस यांची आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता आहे.पाचगणीत लक्ष्मी कऱ्हाडकर व राष्ट्रवादीचे शेखर कासुर्डे यांचे गट पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत. या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच लढत अपेक्षित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT