BJP vs Congress Sarkarnama
विश्लेषण

BJP Vs Congress: काँग्रेसची परीक्षा; महापालिकेवर झेंडा कायम राखण्याचे भाजपसमोर आव्हान

Maharashtra Local Body Elections 2025 Vidarbha Politics:एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, ते स्थान आता भाजपने हिसकावले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या दोन्ही गटांचा प्रभाव प्रत्येक जिल्ह्यातील काही भागांमध्येच जाणवतो.

सरकारनामा ब्यूरो

डॉ. अनंत कोळमकर

विदर्भात शहरी मतदारांवर असलेला प्रभाव येत्या निवडणुकीत कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे असणार आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जनाधारात जी वाढ दिसली, त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर कितपत होतो, याचीही परीक्षा होईल.

सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर विदर्भातील महानगरपालिका, नगरपालिकांचा बिगूल वाजला आहे. येत्या निवडणुकीत कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे असणार आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जनाधारात जी वाढ दिसली, त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर कितपत होते, याचीही परीक्षा होईल.

भाजप व काँग्रेस या दोन पक्षांचा विदर्भात सर्वत्र राजकीय प्रभाव आहे. एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, ते स्थान आता भाजपने हिसकावले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या दोन्ही गटांचा प्रभाव प्रत्येक जिल्ह्यातील काही भागांमध्येच जाणवतो. दुसरीकडे वऱ्हाडातील अकोल, वाशीम व बुलढाणा या तीन जिल्ह्यांत वंचित बहुजन आघाडी हा प्रमुख घटक मजबूत आहे. गेल्या निवडणुकीत अमरावती नगरात व उमरखेडसारख्या छोट्या शहरात ओवेसींच्या ‘एआयएमआय’ने आपली उपस्थिती दर्शवली आहे. या बाबीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

नागपूर जिल्ह्यात चुरस

२०१७च्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १०८ नगरसेवक निवडून आले होते. २९ नगरसेवकांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. तत्कालीन शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक निवडून आला होता. आता केंद्रात आणि राज्यात भाजप महायुतीचे सरकार असल्याने तब्बल चौथ्यांदा १५१ नगरसेवकांच्या या महानगरपालिकेवर झेंडा कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर व सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृहजिल्हा असलेले शहर असल्यामुळे येत्या निवडणुकीत ही मनपा जिंकणे भाजपसाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. त्या तुलनेत काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण, नेत्यांमधील श्रेष्ठत्वाचा संघर्ष हा जगजाहीर आहे.

महाआघाडीतील त्याचे अन्य मित्र शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे अस्तित्व फारसे नाही. अशा स्थितीत काँग्रेस मजबुतीने लढू शकेल का, याबाबत अजूनही साशंकता आहे. नागपूर जिल्ह्यात २६ नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांतही भाजप व काँग्रेस यांच्यातच दोन्ही पक्षांची तुल्यबळ लढत होईल.

अकोल्यात प्रतिष्ठा पणाला

अकोला महापालिकेत सन २०१७ मध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते. आतापर्यंत आठपैकी पाचवेळा महापौरपद भाजपकडे राहिले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) महाआघाडीच्या माध्यमातून भाजपविरोधात एकत्र येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजप-शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती टिकेल की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

आमदार रणधीर सावरकर (भाजप), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी अजित पवार गट) आणि साजिद खान पठाण (काँग्रेस) यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या नगरपालिका व बार्शीटाकळी नगरपंचायतच्या निवडणुका येत्या काळात होतील. २०१५ मध्ये स्थापन झालेल्या बार्शीटाकळी नगरपंचायतची पहिली निवडणूक सन २०१८ मध्ये झाली.

त्यात काँग्रेसच्या हाती सत्ता गेली. येणाऱ्या काळात नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी व भाजपमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येते. तेल्हारा नगरपालिकेत सलग दोन वेळा सत्तेची चावी भाजपच्या हाती असल्याने गत दहा वर्षांपासून भाजपचाच नगराध्यक्ष होता.

वाशीममध्ये समीकरणांंत बदल

वाशीम जिल्ह्यातील वाशीम, मंगरूळपीर, कारंजा व रिसोड या चार नगर परिषदा आणि मालेगांव नगर पंचायतीत निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील वेळी वाशीममध्ये भाजपचे नगरसेवक जास्त निवडून येऊनही शिवसेनेचे अशोक हेडा हे थेट जनतेतून निवडून आले होते. येथेही या दोन पक्षांसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, तसेच वंचित बहुजन आघाडी यांचा जनाधार आहे. कारंजा नगर परिषदेत गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीने वर्चस्व मिळविले होते. दुसरीकडे माजी आमदार स्व. प्रकाश डहाके यांचे प्राबल्य होते.

भाजपाचे केवळ दोन नगरसेवक होते. यावेळी डहाके यांच्या पत्नी सईताई डहाके या भाजपच्या आमदार आहेत. त्यामुळे यावेळी भाजप एक प्रमुख शिलेदार असेल, हे नक्की. रिसोड नगर परिषदेवर मागील वेळी अनंतराव देशमुख गटाचे वर्चस्व होते. आता अनंतराव देशमुख हे भाजपमधे दाखल झाल्याने आता रिसोडमध्ये भाजप लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. आता राज्यातील राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन-दोन गट, काँग्रेस, भाजप हे कसे लढतात, ‘वंचित’ची भूमिका काय राहणार, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील.

बुलडाण्यात काय होणार?

बुलडाणा जिल्ह्यात अकरा नगरपालिका आणि दोन नगरपंचायती मिळून ४८१ सदस्य संख्या आहे. या सर्व शहरांमध्ये त्या-त्या ठिकाणच्या आमदार, खासदारांचा प्रभाव आहे. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड, चिखलीत माजी आमदार राहुल बोंद्रे, आमदार श्वेता महाले, देऊळगाव व सिंदखेड राजात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, काँग्रेस नेते श्याम उमाळकर, लोणारमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर, खामगावात आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, जळगाव जामोद, शेगावात आमदार डॉ. संजय कुटे, मलकापुरात आमदार चैनसुख संचेती, काँग्रेसचे डॉ. अरविंद कोलते, नांदुरात आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार राजेश एकडे यांचा प्रभाव आहे.

अमरावती ‘मविआ’चाही जोर

अमरावती महापालिकेत गेल्या वेळी भाजपची सत्ता होती. महायुतीने एकत्रितपणे निवडणुका लढविल्यास त्यांची शक्ती अधिक वाढणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीसुद्धा तेवढाच जोर लावणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. दुसरीकडे अमरावती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व बडनेरा मतदारसंघात युवा स्वाभिमानचा आमदार आहे. हे दोन्ही पक्ष महायुतीत आहेत. तरीही युतीला येती निवडणूक खूप सोपी राहील, असे नाही. कारण काँग्रेसव्यतिरिक्त एमआयएम, शिवसेना, बसप, रिपाइं यांचेही प्रभाव असलेले भाग शहरात आहे.

जिल्ह्यात एकूण दहा नगरपरिषदा असून, शेंदूरजनाघाट, वरुड, चांदूरबाजार, अंजनगावसुर्जी; तसेच धामणगावरेल्वे या पाच नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता होती. दर्यापूरला काँग्रेसचे अधिक नगरसेवक निवडून आले असले तरी थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. मोर्शीत राष्ट्रवादी काँग्रेस, तर चांदूररेल्वे व चिखलदऱ्यात काँग्रेसची सत्ता होती. वरुड, मोर्शी व शेंदूरजनाघाट या भागात भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा प्रभाव असून, आमदार उमेश यावलकर यांचा जोर राहणार आहे. यासोबतच राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख याठिकाणी प्रभावी आहेत

यवतमाळमध्ये थेट लढत

यवतमाळ जिल्हातील १० नगरपालिकांची निवडणूक होत आहे. सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच थेट लढत होणार आहे. यवतमाळात नगरपालिकेत भाजपची सत्ता होती. पालिकेवर भाजपचे माजी मंत्री मदन येरावार यांचे वर्चस्व राहिले आहे. दारव्हा, दिग्रस व नेर पालिकेवर मंत्री संजय राठोड यांचे वर्चस्व आहे. घाटंजीत स्थानिक आघाडी गतवेळी मजबूत होती. वणीत भाजपची निर्विवाद सत्ता होती. पांढरकवडा व आर्णी पालिकेतही सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

वर्धा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व

वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, पुलगाव, हिंगणघाट, सिंदी आणि आर्वी या सहाही पालिकांवर भाजपची एकहाती सत्ता होती. येथे कोणत्याही पक्षाशी युती आघाडी नव्हती. जिल्ह्यात तत्कालीन खासदार रामदास तडस, सध्याचे आमदार आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे यांचा त्यांच्या शहरातील नगर परिषदांवर पगडा आहे. त्यात आता भर पडून भाजपचे आर्वीत सुमीत वानखेडे आणि देवळीत राजेश बकाने हे दोन आमदार वाढल्याने येत्या काळात त्यांचा प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पडणार आहे.

चंद्रपुरात अटीतटीची लढत

चंद्रपूर जिल्ह्यात निवडणुका अटीतटीच्या आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा आणि स्थानिक नेतृत्व यावर निवडणुकीचे समीकरण अवलंबून असेल. मागील निवडणुकीत चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले होते. मात्र, राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे अनेक नगरसेवकांनी पक्षांतर केले. जिल्ह्यात बल्लारपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, चिमूर, मूल, ब्रह्मपुरी आणि घुग्घुस या आठ नगरपालिका आहेत. या सर्व ठिकाणी स्थानिक नेत्यांचा प्रभाव आणि जाती-जमातींचे समीकरण महत्त्वाचे ठरेल.

गडचिरोलीत इच्छुकांची गर्दी

गडचिरोली जिल्ह्यातील १३ नगर परिषदांपैकी केवळ गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज (वडसा) या तीन नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे. या तिन्ही नगर परिषदांवर भाजपची सत्ता होती. गडचिरोलीतील सत्ता अबाधित राखण्याचे आव्हान आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासमोर राहील. आरमोरीत सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार व प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचा प्रभाव आहे. देसाईगंजात माजी आमदार कृष्णा गजबे व भाजप नेते किसन नागदेवे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

गोंदिया दोघांसाठीही प्रतिष्ठेचे

गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा या दोन नगर परिषदा असून, तेथे येत्या काळात निवडणुका होतील. गोंदिया नगर परिषदेत गतवेळी भाजपने सत्ता स्थापन केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे हे गृहक्षेत्र आहे; तसेच आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार गोपालदास अग्रवाल असे मोठे नेते येथे आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी हे नवीन समीकरण तयार झाले आहे. त्याचा प्रभाव तिरोडा येथेही दिसण्याची शक्यता आहे.

भंडाऱ्याबाबत उत्सुकता

जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या चार नगर परिषदांमध्ये निवडणुका होणार आहेत. भंडारा येथे यापूर्वी भाजपची सत्ता होती. भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर (शिवसेना शिंदे गट) आणि खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा प्रभाव येथे आहे. तुमसर येथेही भाजपची सत्ता होती. तेथे प्रदीप पडोळे (भाजप), माजी आमदार चरण वाघमारे आणि आमदार राजू कारेमोरे यांचा प्रभाव आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT