महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात सभागृहात रमी हा जुगार खेळ मोबाईलवर खेळत असल्याने अडचणीत आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या नोव्हेंबरमध्ये सत्तारुढ झाल्यानंतर जे मंत्री विविध कारणांनी वादग्रस्त ठरले त्यात कोकाटे यांचा वरचा क्रमांक आहे.
तसेच योगायोगाचा भाग म्हणजे कोकाटे यांच्या रुपाने सलग तिसरा कृषिमंत्री वादात सापडला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात अब्दुल सत्तार व धनंजय मुंडे हे याआधीचे कृषिमंत्री अशा वादात अडकले होते. यानिमित्ताने कृषिमंत्री व वाद हे समीकरण दृढ होते की काय, अशी चिंता वाटत आहे.
यंदाचे विधिमंडळ अधिवेशन पुरवणी मागण्या, जनसुरक्षा कायदा, तुकडा बंदी, गणेशोत्सव हा राज्याचा महाउत्सव आदी निर्णयांमुळे ओळखले जात असले तरी तेवढेच ते सत्ताधारी पक्षातील मंत्री व आमदारांच्या कारनाम्यांनीही चर्चेत आले आहे. इतके की सभागृहात झालेली चर्चा व नवसदस्यांची सकारात्मक कामगिरी यावरही या वाईट घटनांनी झाकोळली गेली. या अधिवेशनावर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांच्या मुलाच्या हॉटेलचे व इतर काही प्रकरणांचे सावट होते. नंतर अधिवेशनाच्या काळातच सिरसाट यांचा बेडरुमधील सिगारेट पितानाचा व पैशाची बॅग असल्याच्या प्रकरणाचा व्हिडिओ खा. संजय राऊत यांनी व्हायरल केला.
कोकाटेंची वादळी कारकीर्द कोकाटे यांची तशी आधीपासूनच वादळी व बिनधास्त कार्यशैली राहिली आहे. नाशिकच्या सिन्नर मतदार संघातून ते २०१९ चा अपवाद वगळता १९९९ पासून ते गेल्या २०२४ च्या निवडणुकीपर्यंत सलग पाचवेळा आमदार राहिले आहेत. आधी शिवसेना मग काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा सर्व प्रमुख पक्षांत प्रवास झालेला आहे. २०१९ ची नाशिक लोकसभा निवडणूकही त्यांनी ताकदीने लढवली. ते जिल्ह्याचे नेते कधीही होऊ शकले नाहीत. मात्र सिन्नरवर त्यांचा दबदबा राहिला आहे.
२०२४ ला मराठा-ओबीसी वादाचा पक्षांतर्गत फायदा मिळून कोकाटेंची अजित पवार गटाकडून मंत्रिपदावर वर्णी लागली तर भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर पडावे लागले. पुन्हा काही महिन्यांनंतर भुजबळांची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री झाली. नाशिक जिल्ह्यात महायुतीतील भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिंदेच्या शिवसेनेचे दादा भुसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकाटे यांच्या रूपाने गेले वर्षभर विविध कारणांनी हमरीतुमरी सुरू आहे. ती कधी पालकमंत्रिपदावरून असते तर कधी कुंभमेळा, जिल्हा नियोजन समितीवरून असते. हे कमी की काय म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी अंतर्गतही भुजबळ व कोकाटे यांच्या गटात टोकाचे मतभेद आहेत.
मात्र तरीही वरुन सगळे आलबेल भासवले जाते. कोकाटे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांचे वक्तव्य दुर्दैवी असून ज्या खात्यावर आपण पाच वर्षांत २५ हजार कोटींची गुंतवणूक करतो. त्या खात्याच्या मंत्र्यांनी अशी वक्तव्ये करु नयेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र असे असले तरी कृषि खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीवर कुठलेही भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे ओरखडे अजून तरी उमटलेले नाहीत. उलट इतर खात्यात बदली प्रकरणात ज्या ‘उलाढाली’ चालतात तशा कोकाटेच्या कार्यकाळात झालेल्या नाहीत, असे या खात्यातील वरिष्ठांचे म्हणणे आहे.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे हे आणखी एक वादग्रस्त माजी कृषिमंत्री हेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे. ते परळीतून सलग दोन वेळा आमदार राहिले. तसेच विधानपरिषदेत ते विरोधी पक्षनेतेही होते. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मास्टर माईंड वाल्मिक कराड याला सहकार्य केल्याप्रकरणी मुंडे यांचे मंत्रिपद गेल्या काही महिन्यांपूर्वी गेले. ते वादग्रस्त विधानांनी वादात ओढले गेले नसले तरी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत ते कृषिमंत्री होते. त्यावेळी पाच हजार कोटींचे पिकविमा घोटाळा प्रकरण व शेती अवजारे खरेदी प्रकरणात ते वादग्रस्त ठरले होते.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण २४५ कोटींच्या गैरव्यवहाराचे असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात नुकतेच न्यायालयाने त्यांना शेती अवजारे खरेदी प्रकरणात क्लीन चिट दिली असली तरी पीकविमा प्रकरणी त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे हा आरोप सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार सुरेश धस यांनीच केलेला आहे. हा घोटाळा थेट संसदेच्या सभागृहात पोहोचलेला असून केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देऊन गडबड करणारांना सोडणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
राजीनाम्यानंतर मुंडे राजकीय चर्चेच्या प्रकाशझोताआड गेले असले तरी परवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बीड दौऱ्यात पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी अनेक दिवसांचे मौन सोडून तुफान फटकेबाजी करत विरोधकांना इशारे दिले. "वैर माझ्याशी होते तर मग बीडच्या मातीची बदनामी का,’’ असा प्रश्न करत त्यांनी "तुम्हारी सोच के साचे मे ढल नहीं सकता, जुबान काँट दो लहेजा बदल नही सकता, अरे मुझे मोम का पुतला समज रहे हो क्या? तुम्हारी लौसे लोहा पिघल नहीं सकता," अशी शेरोशायरी करत आपण राजकारणात अजूनही उभारी घेणार असल्याचे स्पष्ट केले.
वाद, घोटाळे आणि शिवराळ भाषा ही विशेषणे ज्यांना चपखल बसतात असे आणखी एक माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हेही मुंडे यांच्या आधी राज्याचे कृषिमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड हा त्यांचा मतदार संघ. विधानपरिषदेत एक वेळा तर विधानसभेत चार वेळा असे तब्बल पाच वेळा आमदार राहिले आहेत. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. वादग्रस्त प्रतिमेमुळेच त्यांची आताच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागू शकली नाही. शिवसेनेतील बंडाच्यावेळी त्यांनी अशी काही वक्तव्ये केली की ते चर्चेत आले.
एक तर मुस्लिम आमदार व तो थेट शिवसेनेत व तोही प्रचंड आक्रमक. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर आक्रमक पद्धतीने बोलणारा मंत्री म्हणून त्यांनी सुरुवातीला शिंदे यांची मर्जी जिंकली पण पुढे हेच त्यांचे ‘कौशल्य’ त्यांच्या प्रगतीत अडचणीचे ठरले. सिल्लोड महोत्सवाला आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली राज्यभरातून कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच १५ कोटींचे उद्दिष्ट देणे, वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीचे प्रकरण, खा.सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य, तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीला शिवीगाळ, शिक्षण पात्रता (टीटीई) परीक्षा निवड यादीत सत्तारांच्या दोन मुलींची नावे, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळी दौऱ्यावर गेले असताना ‘चहा पित नाही तर दारू पिता का’ असा प्रश्न विचारणे आदी प्रकरणांवरून सत्तार वादात अडकले होते.
देशाची व महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही कृषिआधारीत आहे. आजही सर्वाधिक लोकसंख्या शेतीतील उत्पादनांवर अबलंबून आहे. कृषी खाते सर्वसामान्यांशी संबधित असल्यामुळे मंत्रिपदाला विरोधकांकडून लक्ष्य केले जात असावे, अशीही एक शक्यता वर्तविली जाते. या खात्याचा इतिहास फार उज्ज्वल राहिला आहे. देशांचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख हे महाराष्ट्राचे होते. ते तब्बल १० वर्षे या मंत्रिपदावर राहिले. ते कृषिसोबतच चांगले शिक्षणतज्ञही होते. भारतीय कृषिक्रांतीचे जनक असलेल्या देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली.
महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हेही प्रख्यात कृषितज्ञ म्हणून ओळखले जातात.ते प्रगतिशील शेतकरी होते. तसेच सर्वात अधिक काळ राज्याचे मुख्यमंत्री राहिले. हरितक्रांती, पंचायत राज, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना आदींचे जनक म्हणून ते ओळखले जातात. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दूरगामी योजना राबविल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही राज्यात व केंद्रात कृषिमंत्री व मुख्यमंत्री म्हणून शेतीला साह्यभूत ठरतील अशा योजना राबविल्या आजही त्यांची चर्चा होते. यांशिवाय राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कृषिमंत्रिपद भुषविले आहे. आज वादग्रस्त ठरलेल्या कृषिमंत्र्यांच्या काळात या मंत्र्यांची जाणीवपूर्वक आठवण होते.
कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्ये ‘‘पीकविम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून पैसे घेते म्हणजे सरकार भिकारी आहे.’’ ‘‘जिथे पीकच नाही तिथे शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे काय?’’ ‘‘शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली की ते त्या पैशातून लग्न, साखरपुड्याचे कार्यक्रम करतात.’’ ‘‘हे शेतकरी नव्हेत हे तर भिकारी’’ ‘‘माझ्याकडे काहीच अधिकार नाहीत.’
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.