Maharashtra Politics: राजकीय ‘श्रावणमास’! दोन्ही ‘संजय’तगमगत नि परस्परांना सावरती...

Maharashtra political updates: श्रावण सुरू झाला आहे. महान निसर्गकवी बालकवींच्या प्रतिभेला मानाचा मुजरा करून अन् त्यांची माफी मागून ही सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय विडंबन कविता सादर करत आहोत. राज्यातील राजकीय सद्यःस्थिती टिपण्याचा प्रयत्न या विडंबनातून केला आहे...
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

अभय नरहर जोशी

श्रावणमासी खंत मानसी

आरोपफैरी चोहीकडे ।

क्षणात वाटे सुटलो

पण क्षणात घोटाळाच घडे ।।

मंत्रिपदाची इंद्रधनुसम

रंगीत पाटी चमकतसे।

मंगल तोरण नव्हे,

भ्रष्ट कुरण वाटतसे ।।

झाला अधिवेशनास्त,

वाटे अहाहा हे सुटले।

आरोपांच्या जंजाळात

पुन्हा पुन्हा सापडले।।

उठती वरती माध्यमांतुनि

अनंत आरोप पहा ।

त्यांच्या चक्षूंपुढती तरळे

कारागृहाचे रूप महा।।

बलाकमाला उडते तशी

नेते कुठे हे जात असे।

‘ईडी’भयाने स्थलांतराने

परपक्षात ते जात असे।।

डाव ‘रमी’चा उधळला,

कृषिमंत्र्यांची गुंग मती ।

राजीनामा उडवी निद्रा,

मंत्रिपदाविना मंद गती।।

दोन घास नशिबी नसती,

वरण विटकेच मिळे ।

आमदार देता ठोसे,

गदारोळ तो फुका उसळे ।।

अंतःपुरी ‘संजया’ला

खासगीत कुणी टिपले ।

बॅगेमधील ‘लक्ष्मी’दर्शने

डोळे जगाचेच दिपले ।।

दोन्ही ‘संजय’ तगमगती

नि परस्परांना सावरती।

पदमुक्तीच्या धाकाने रोष

अवघा आवरती।।

नेत्यांचे बगलबच्चे घालू

लागले मोठा राडा।

असेंब्ली परिसर झाला

कुस्त्यांचा आखाडा।।

पंत, दादा, भाई तत्परतेने

वाद मिटवितसे।

महाभाग काही करती

महायुतीस वेडेपिसे।।

प्रेमाची हिरवळ दाटे,

बंधुभेट चर्चा चोहीकडे।

हिंदीसक्ती हटवा,

मराठी माणसांस हे साकडे ।।

Maharashtra Politics
Maharashtra Politics Horoscope : भविष्यनामा! फूट, पक्षांतर अन् मोठ्या राजकीय घडामोडींचा काळ...

त्रिभाषा सूत्र मनोमिलनाचा

योग मोठे जुळवते।

दोन्ही बंधू देती श्रेय

‘कारभारी पंता’ एकमते।।

कृषिमंत्र्यांचे ते ‘पत्ते’

‘दादां’ना फोडिती घाम।

खांदेपालट करण्याचे मोठेच अवघड काम।।

कृषिमंत्रिपदी आठवे

जुने ‘वाल्मीक आका’।

दादांसाठी पुनर्नियुक्तीचा

प्रसंग ठरणार बाका।।

‘हनी ट्रॅप’चा धुरळा उडवून

विरोधक मौनात।

‘हनी’ दिसेना, ‘ट्रॅप’ दिसेना

सरकारही चैनीत।।

रक्षाबंधन सणाकडे

लाडक्या बहिणींचे लक्ष।

थकल्या ओवाळणीच्या

आशेने झाल्या त्या दक्ष।।

घेणाऱ्याचे हात हजारो,

तिजोरीत खडखडाट।

खर्चाच्या धाकातून उडे

सरकारी थरथराट।।

भरण्या थकीत हप्ते सरकार

युक्ती लढवतसे।

मद्यावर लावुनि कर,

भले महागडे करीतसे।।

तगमग करून थके मद्यपि

परस्परांना सावरती।

सुवर्णरंगी मदिरा आठवे,

पाणी तोंडचे आवरती।।

अधिवेशन संपता काहींचा

हर्ष माईना हृदयात।

वदनी त्यांच्या रंगू लागले

मोठ्या सुटकेचे गीत।

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com