MNS Goals in Next Five Years:महाराष्ट्र सध्या विस्कटला आहे. कारण त्याचं आत्मभान निसटलं आहे. त्याला आत्मभान येईल तेव्हा तो रागावेल. रागावला की प्रगतीच्या वाटेवर जाईल. त्याला रागवायला, खरोखरचं रागवायला लावणं, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुढचं येत्या पाच वर्षांतले प्रमुख उद्दिष्ट आहे.
समाज जिवंत माणसासारखा असतो. त्याचं एक वय असतं. एक स्वभाव असतो. आवडीनिवडी असतात. त्याला काही इतिहास असतो. त्यातून तो कधी शिकतो, कधी नाही. कधी तो बधीर बनतो तर कधी अतिउत्साही. कधी तो थकतो, कधी उत्साहात असतो. तर कधी पार गोंधळलेला. नेहमी तो तसाच वागेल असं नाही, कारण तो जिवंत आहे. सतराव्या शतकाच्या आरंभी या महाराष्ट्रानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रबोधनाचं आणि समाजसुधारणेचं ध्येय उराशी बाळगलं आणि स्वातंत्र्यानंतर, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर शिक्षित, सुसंस्कृत, उद्यमशील, आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करायला सुरुवात केली.
१९९०-९५ नंतर महाराष्ट्राचं मन फिसकटलं. महाराष्ट्र वारं प्यायल्यासारखा करू लागला. आधीच शिक्षित आणि औद्योगिक प्रगती साधलेल्या महाराष्ट्राला आर्थिक उदारीकरणामुळे प्रगतीची संधी मिळाली. मात्र, श्रीमंत बापाच्या पोरानं व्यवसायात एकदम तेजी पाहिली अन् हातात पैसा खुळखुळायला लागला की होतं तसं झालं. महाराष्ट्राच्या कर्त्या-धर्त्यांना महाराष्ट्राचा म्हणून समग्र विचार करायला पाहिजे आणि जागतिकीकरणाच्या ह्या प्रक्रियेत महाराष्ट्राला एक अत्यंत दुर्मिळ अशी संधी आहे, या दोन गोष्टी लक्षातच आल्या नाहीत. त्यानंतर जे बिघडलं ते बिघडलंच. पुढच्या २०-२५ वर्षांत तर महाराष्ट्राची गाडी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि नैतिक अशा सर्व पातळ्यांवर घसरली ती घसरलीच
जाती-जातीत दुभंगलेला, फाटलेला समाज, विकासाच्या बाबतीतला प्रादेशिक असमतोल, राज्याची रिकामी तिजोरी, अर्थपूर्ण काम आणि कामाप्रमाणे दाम मागणारे लाखो हात, जनतेचा विश्वास, गमावलेली कायदा-सुव्यवस्थेची यंत्रणा, शिक्षण नसलेली शिक्षणव्यवस्था, न परवडणारी आरोग्यसेवा, वाढत चाललेले दुष्काळप्रवण तालुके, बकाल शहरे आणि ह्या सर्व परिस्थितीपासून प्रचंड दूर असलेला इथला ‘अभिजनवर्ग’ अशी महाराष्ट्राची सध्याची अवस्था आहे.
या परिस्थितीत इथला ‘राजकीय वर्ग’ (पोलिटिकल क्लास) एक तर गोंधळलेला किंवा हेलपाटलेला आहे आणि महाराष्ट्राला पुढे कसं घेऊन जायचं, याची पुसटशीही कल्पनाही त्यांना नाही. या परिस्थितीत ज्या पक्षानं दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा महाराष्ट्राला अर्पण केला त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज वाटतंय की महाराष्ट्राला ‘राग’ यावा म्हणून काम करावं.
आपल्याला राग कधी येतो? आपण जर जिवंत असलो, आपल्यामध्ये भावना शिल्लक असल्या तर आपल्याला राग येतो. कुणी आपला स्वाभिमान दुखावला तर आपल्याला राग येतो. अर्थात त्यासाठी आधी स्वाभिमान असावा लागतो. आपलं कुणी काही हिसकावून घेतलं तरी आपल्याला राग येतो. पण त्यासाठी आपलं असं काय आहे त्याचं भान पाहिजे. म्हणून पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राला ‘राग’ यावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करेल. त्यासाठी मराठी माणसाचा स्वाभिमान जागवेल अन् मराठी माणसाच्या न्याय-हक्काचं काय आहे, हे मराठी माणसाच्या पुढ्यात ठेवेल अन् हे करता करता महाराष्ट्रानं एक सामूहिक स्वप्न पहावं म्हणून प्रयत्न करेल.
‘राग’ ही फार स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. ते जिवंतपणाचं लक्षण आहे. राग म्हणजे वायफळ चीडचीड नव्हे. आदळआपट नव्हे. राग म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे. राग ही खोल प्रतिक्रिया आहे. आत्मभानातून आलेली. महाराष्ट्राला आत्मभान देणं, महाराष्ट्र जे स्वत:बाबत विसरला आहे. महाराष्ट्र जे स्वत:चं मराठीपण विसरला आहे, त्याची त्याला आठवण करून देणं हे आमच्यापुढचं पुढील पाच वर्षातलं प्रमुख आणि पहिलं उद्दिष्ट आहे.
या रागाचं रूपांतर विधायक दृष्टीत करणं, महाराष्ट्रानं स्वत:चं असं स्वप्नं पहावं, यासाठी व्यापक पातळीवर सामूहिक प्रयत्न करणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुढचं दुसरं उद्दिष्ट आहे. याचं कारण रागातून जी उर्जा निर्माण होईल त्या उर्जेला विधायक वळण दिल्याशिवाय सकारात्मक बदल होणार नाहीत. नाहीतर, नुसताच राग राग महाराष्ट्राला कुठेच नेणार नाही.
महाराष्ट्राच्या ह्या रागातून जी सकारात्मक उर्जा निर्माण होईल त्याला विधायक वळण द्यायचं तर तिसरी गोष्ट करावी लागेल. ती म्हणजे विधायक दृष्टी असलेली विविध क्षेत्रातील गुणी आणि कर्तबगार माणसं राजकारणाच्या परिघात आणणं. पुढच्या पाच वर्षांत फक्त निवडणुकीच्या राजकारणात नव्हे तर धोरण संशोधन, समाजशिक्षण, प्रशिक्षण अशासारख्या कामांतही समाजातल्या विविध क्षेत्रातली मंडळी कशी जोडली जातील, हे आमच्याकडून अत्यंत आवर्जून पाहिलं जाईल. त्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. उद्योग, शेती, शहरनियोजन, उर्जा, आर्थिक धोरणं, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञमंडळींसह काही विशेष प्रकल्प हातात घेऊन सध्याच्या बनचुक्या राजकारणाला पर्याय देण्याचा गंभीर प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल.
येणारं युग हे महिलांचं असणार आहे. येणारं जग महिला ठरवणार आहेत. आपण आत्तापर्यंत आपल्या जुनाट, पारंपारिक वृत्तीमुळे समाजातला हा एक फार मोठा घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ दिला नाही. राजकारणातला, समाजकारणातला अवकाश (स्पेस) हा महिलांनी अधिकाधिक व्यापावा, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चौथा महत्त्वाचा कार्यक्रम असेल. गाव-खेड्यातली, छोट्या शहरातली मुलगी आज आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द बाळगून आहे. महाराष्ट्रातली ही सध्याची एक सुप्त उर्जा आहे. ती ऊर्जा महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणं, तिला उत्तेजन देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
शिक्षण भविष्य ठरवणार आहे. दर्जेदार शिक्षण हीच ह्या पुढच्या विकासाची किल्ली आहे. ह्या पुढच्या समाजात ज्ञान आणि कौशल्यं सर्वात मूल्यवान असणार आहेत. ज्या समाजाकडे ज्ञान, तंत्र, कौशल्यपूर्ण तरूण, कर्तबगार माणसं तोच समाज यापुढे प्रगती करणार. दुसरे नाहीत. दुसरे समाज फक्त त्यांचे ग्राहक बनणार. त्यामुळे शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करणे, त्यातील विषमता संपवणे यासाठी राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर काम करणे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुढचा पाचवा कार्यक्रम असेल.
जसा महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस, महिला, शिक्षण महत्वाचं, तशीच महाराष्ट्राची मातीही महत्त्वाची. महाराष्ट्राची माती म्हणजे महाराष्ट्राचं पर्यावरण, पाणी, जंगलं, नद्या, पीकं. ह्या महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण, संरक्षण हा पक्षापुढचा सहावा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्याबद्दलची जाणीव-जागृती व्यापक पातळीवर करणं अन् तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय बनवणं हा पक्षापुढचा कार्यक्रम विविध छोट्या छोट्या आंदोलनांमधून आम्ही पुढे नेऊ.
हा विषय आत्तापर्यंत फक्त सामाजिक संस्थांच्या किंवा संशोधनापुरता मर्यादित आहे. तो अधिक मुख्य प्रवाहात आणला पाहिजे. त्या दृष्टीनं महाराष्ट्रापुढचा वेळ हळूहळू कमी होत चालला आहे. आणखी पाच वर्ष गेली तर सगळी परिस्थिती हातातून कायमची निसटून जाईल. एकदा ही माती समुद्राला मिळाली, जंगलं नष्ट झाली, जमिनीच्या पोटातलं पाणी संपलं की मग काही करता येणार नाही ह्याचं पक्कं भान आम्हाला आहे.
महाराष्ट्रात दररोज होत असलेल्या शेतकरी आत्महत्या हा विषय तर कुठल्याही संवेदनशील मनाला चटका लावणारा आहे. त्याबाबत सरकारला आणि मुख्य म्हणजे केंद्र सरकारला योग्य ती धोरणं राबवायला लावणे, हा पक्षापुढचा सातवा प्राधान्याचा विषय आहे. ह्या प्रश्नामागचं खरं कारण फक्त दुष्काळ, पाण्याची टंचाई हे नाही तर यामागे व्यापारी धोरणं आणि शेती ही खुल्या बाजारपेठेला जोडलेली नसणं ही कारणे आहेत. त्याची जाणीव आम्हाला आहे म्हणून शेतकरी आत्महत्या थांबवणे हा आमच्या पुढचा सातवा महत्त्वाचा अन् प्राधान्याचा विषय असेल.
सध्याची राजकीय परिस्थिती अशी आहे, की सामान्य नागरिकाला निवडणुकीत फक्त आपलं मत देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नागरिक धोरणं ठरवण्याच्या, त्यांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत अजिबात नाहीत. मोठ्या शहरात नागरिकांच्या क्षेत्रसभा, ग्रामीण भागात ग्रामसभा अशा उपक्रमातून नागरिकांना विधायक राजकारणात कार्यरत करणं हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुढचा येत्या पाच वर्षातला आठवा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सामान्य नागरिक राजकारणापासून असा अलिप्त रहाणं सध्याच्या राजकारणाला अवघड वाटत असलं तरी नागरिकांचा सहभाग धोरणं ठरवण्यात, प्रशासनावर आणि त्यांच्या कार्यपध्दतीवर लक्ष ठेवण्यात असलाच पाहिजे असं आमचं धोरण आहे. त्या दृष्टीनं पक्ष काम करेल
मराठी माणसाला त्याच्यावर होत असलेला अन्याय दाखवून देऊन, त्यावर त्याला ‘राग’ येण्यासाठी काम करणे.
मराठी माणूस रागवेलही. परंतु रागावल्यावर त्या ऊर्जेचं रूपांतर ‘विधायक शक्तीत’ व्हावं म्हणून विशेष प्रयत्न.
विविध क्षेत्रांतील कर्तबगारांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
राजकारण-समाजकारणातला ‘अवकाश’ महिलांनी व्यापावा यासाठी कार्यक्रम-उपक्रम योजणे.
दर्जेदार शिक्षण
पर्यावरणरक्षण
शेती आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी योग्य धोरणं आखली जावीत म्हणून प्रयत्न करणे.
सामान्य नागरिकाला विधायक राजकारणात सक्रिय करणे.
समाज एकदा ‘खरा’ रागावून त्याचं आत्मभान जागृत झालं की मग तो प्रगतीच्या वाटेला जातोच. महाराष्ट्र आता इतिहासाच्या एका अशा टप्प्यावर आहे की ‘आत्ता नाहीतर कधीच नाही’ अशा अवस्थेला आहे. येणारी पाच वर्षे महाराष्ट्राच्या आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची अन् कसोटी पाहणारी असतील. महाराष्ट्रानं ह्या कसोटीला उतरावं, इतकीच इच्छा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.