Vidhan Bhavan Mumbai, Maharashtra Political Crisis  Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : आधी ठरवू 'मोठा भाऊ'; मग मुख्यमंत्रिपदाचं पाहू..!

Assembly Election 2024 : शरद पवारांनी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली आणि 1999 ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली. त्यामुळं या निवडणुकीत युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली.

Sandeep Chavan

Maharashtra News : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात जेव्हापासून युती-आघाडीची सरकारं सत्तेत येऊ लागली तेव्हापासून (अपवाद 2004 ची निवडणूक) 'ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री' या सूत्रानुसार मुख्यमंत्री ठरत आलाय. आताची परिस्थितीही काही वेगळी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुती काय नि महाविकास आघाडी काय; दोन्ही बाजूंनी विचार केला तर 'आधी ठरवू 'मोठा भाऊ', मग मुख्यमंत्रिपदाचं पाहू,' हेच सूत्र सध्या तरी दिसून येतंय.

युती-आघाडीचं राजकारण केव्हा सुरू झालं?

महाराष्ट्रात 1990 पासून युती तर 1999 पासून आघाडीचं राजकारण सुरू झालं. 1990 मध्ये पहिल्यांदाच शिवसेना-भाजप (BJP) या दोन पक्षांची युती झाली. 1990 आणि 1995 या दोन निवडणुकांमध्ये युती विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली. शरद पवारांनी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली आणि 1999 ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली. त्यामुळं या निवडणुकीत युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली.

1999 च्या निवडणूक निकालानंतर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली. 1999 आणि 2014 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता 2004, 2009 आणि 2019 या तीन निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी सरळ लढत पाहायला मिळाली. महाराष्ट्रात युती-आघाडीच्या राजकारणात आतापर्यंत कोणता पक्ष कोणत्या निवडणुकीत 'मोठा भाऊ' ठरला?

1990 : काँग्रेसचं सरकार, युतीत शिवसेना 'मोठा भाऊ'!

1990 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युती झाली आणि काँग्रेसविरुद्ध उभी ठाकली. मात्र, या निवडणुकीत युतीचा काँग्रेससमोर निभाव लागला नाही. 276 जागा लढून काँग्रेसनं 141 जागा जिंकल्या पण युतीनंही 94 जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली. भाजपनं 104 जागा लढून 42 जागा जिंकल्या तर 183 जागा लढलेली शिवसेना 52 जागा जिंकून युतीत 'मोठा भाऊ' ठरली.

1995 : युतीचं सरकार, शिवसेना 'मोठा भाऊ'

1995 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. या निवडणुकीत 286 जागा लढलेल्या काँग्रेसला (Congress) अवघ्या 80 जागा मिळाल्या आणि तब्बल 35 वर्षांनी काँग्रेसनं आपली एकहाती सत्ता गमावली. युतीनं 138 जागा जिंकल्या आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं.

भाजपनं 116 जागा लढून 65 जागा जिंकल्या तर 169 जागा लढलेली शिवसेना 73 जागा जिंकून युतीत 'मोठा भाऊ' ठरली. शिवसेनेचे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले. पुढं शिवसेनेचे नारायण राणे यांचीही मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली.

1999 : आघाडीत काँग्रेस, युतीत शिवसेना 'मोठा भाऊ'

शरद पवारांनी काँग्रेसचा 'हात' सोडून राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली आणि 'घड्याळ' चिन्हावर निवडणूक लढवली. त्यामुळं या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. युतीनं 125 जागा जिंकल्या. भाजपनं 117 जागा लढून 56 जागा जिंकल्या तर 161 जागा लढलेली शिवसेना 69 जागा जिंकून युतीत 'मोठा भाऊ' ठरली.

पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 223 जागा लढून 58 जागा जिंकल्या तर 249 जागा लढलेल्या काँग्रेसनं 75 जागा मिळवल्या. निवडणुकीपूर्वी वेगळे लढलेल्या या दोन्ही पक्षांनी निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच आघाडी केली आणि राज्यात सत्ता स्थापन केली. 'मोठा भाऊ' या नात्यानं काँग्रेसचे विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री बनले. नंतरच्या काळात काँग्रेसनं सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि मग विजयसिंह मोहिते-पाटील यांना उपमुख्यमंत्री बनवलं.

2004 : आघाडीत राष्ट्रवादी, युतीत शिवसेना 'मोठा भाऊ'

2004 मध्ये शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली. युतीनं 116 जागा जिंकल्या. भाजपनं 111 जागा लढून 54 जागा जिंकल्या तर 163 जागा लढलेली शिवसेना 62 जागा जिंकून युतीत 'मोठा भाऊ' ठरली.

आघाडीनं 140 जागा जिंकल्या. काँग्रेसनं 157 जागा लढून 69 जागा जिंकल्या तर 124 जागा लढलेली राष्ट्रवादी काँग्रेस 71 जागा जिंकून आघाडीत 'मोठा भाऊ' ठरली. मात्र, आघाडीत मोठा भाऊ ठरवूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपदाचा मान काँग्रेसला दिला आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री बनले. नंतरच्या काळात काँग्रेसनं अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवलं.

2009 : आघाडीत काँग्रेस, युतीत भाजप 'मोठा भाऊ'

2009 मध्ये शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली. युतीनं 91 जागा जिंकल्या. शिवसेनेनं 160 जागा लढून 45 जागा जिंकल्या तर 119 जागा लढलेला भाजप 46 जागा जिंकून युतीत पहिल्यांदाच 'मोठा भाऊ' ठरला.

आघाडीनं 144 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीनं 113 जागा लढून 62 जागा जिंकल्या तर 170 जागा लढलेली काँग्रेस 82 जागा जिंकून आघाडीत 'मोठा भाऊ' ठरली. काँग्रेसचे अशोक चव्हाण पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. नंतरच्या काळात काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर राष्ट्रवादीनं अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवलं.

2014 : प्रत्येक 'भाऊ' स्वतंत्र लढला; भाजप सत्तेत आला

महाराष्ट्राच्या राजकारणातलं 2014 हे निवडणूक वर्ष असं होतं, ज्या निवडणुकीत युती-आघाडी तुटली आणि प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला. शिवसेनेनं 282 जागा लढून 63 जागा तर भाजपनं 260 जागा लढून 122 जागा जिंकल्या. काँग्रेसनं 287 जागा लढून 42 तर राष्ट्रवादीनं 278 जागा लढून 41 जागा जिंकल्या. 122 जागा जिंकून नंबर एकचा पक्ष ठरलेला भाजप सत्तेत जाऊन बसला आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. या निवडणुकीत प्रत्येक 'भाऊ' स्वतंत्र लढला आणि भाजप सत्तेत जाऊन बसला.

2019 : युतीत भाजप, आघाडीत राष्ट्रवादी 'मोठा भाऊ'

2014 ला वेगवेगळं लढून पाहिल्यानंतर पुन्हा एकदा युती आणि आघाडी झाली. त्यामुळं 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत पुन्हा पाहायला मिळाली. युतीनं 161 जागा जिंकल्या. शिवसेनेनं 124 जागा लढून 56 जागा जिंकल्या तर 164 जागा लढलेला भाजप 105 जागा जिंकून युतीत 'मोठा भाऊ' ठरला. आघाडीनं 98 जागा जिंकल्या. काँग्रेसनं 147 जागा लढून 44 जागा जिंकल्या तर 121 जागा लढलेली राष्ट्रवादी 54 जागा जिंकून आघाडीत 'मोठा भाऊ' ठरली.

सर्वाधिक 105 जागा जिंकून महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष ठरला खरा पण सत्तेची फळं काही त्याला चाखता आली नाहीत. मुख्यमंत्रिपदाच्या दाव्या-प्रतिदाव्यावरून शिवसेना-भाजप युती पुन्हा एकदा तुटली आणि महाराष्ट्रात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन मुख्य घटक पक्षांची मिळून महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेनेचे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि मागच्या निवडणुकीत सत्तेत असलेला भाजप विरोधी बाकांवर जाऊन बसला. 'मविआ' स्थापन झाल्यानं राज्यातली राजकीय समीकरणं बदलली.

सेना-राष्ट्रवादी पक्षफुटी; भाजपनं चाखली सत्तेची गुटी!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच एक वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना फोडली आणि 'मविआ'चं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून आपल्याकडं उपमुख्यमंत्रिपद ठेवलं आणि सत्ता मिळवली. नंतर अवघ्या एकच वर्षात अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी फोडली आणि सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्रिपद मिळवलं. पक्षफुटीमुळं महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं पुरती विस्कटली आणि भल्या-भल्यांनी वेगवेगळ्या पक्षांत उडी मारली.

युतीत 'मोठा भाऊ' ठरवूनही युतीच तुटल्यानं भाजपला मुख्यमंत्रिपदापासूनच काय सत्तेपासूनही दूर राहावं लागलं तर आघाडीत 'मोठा भाऊ' असूनही 'मविआ'त सामील झालेल्या शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यानं राष्ट्रवादीला छोट्या भावाच्या भूमिकेत जावं लागून उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री बनले.

2024 ची विधानसभा ठरवणार 'मोठा भाऊ' कोण?

पक्षफुटीनंतर महाराष्ट्रात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष ठरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या युती-आघाडीत हे फुटलेले दोन्ही पक्ष विभागले गेले आहेत. 'मविआ'त काँग्रेससोबत ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आहे तर युतीत भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे.

यापूर्वी, युती असो वा आघाडी; केवळ दोन मुख्य पक्षांमध्ये जागावाटप होत असे पण आता युती-आघाडीत प्रत्येकी एक नवा 'भिडू' दाखल झाल्यानं जागावाटप दोन ऐवजी तीन घटक पक्षांत करावं लागणार आहे. 2019 च्या निवडणुकीचा अनुभव पाहाता भाजप आणि काँग्रेसनं सर्वाधिक जागा लढल्या होत्या. त्यामुळं 2024 च्या निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष आपल्या वाट्याला सर्वाधिक जागा कशा सुटतील याचा प्रयत्न करणार.

एकूणच काय तर कुणाच्या वाट्याला किती जागा आल्या यापेक्षा कुणाच्या किती जागा जिंकून आल्या यावर महायुती वा महाविकास आघाडीत 'मोठा भाऊ' ठरणार आणि त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे नक्की! त्यामुळं आधी ठरवू 'मोठा भाऊ', मग मुख्यमंत्रिपदाचं पाहू, हे सूत्र युती-आघाडी या दोघांनाही लागू पडतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT