Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Maha Vikas Aghadi News : काँग्रेस म्हणतंय 80-85, ठाकरे गटाची वाढली काळजी!

Sandeep Chavan

Maharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसकडून नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेमधून काँग्रेस 80 ते 85 जागा जिंकेल, असं सूतोवाच करण्यात आलंय.

यामुळं आधीच मुख्यमंत्रिपदाचं गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या ठाकरे गटाच्या गोटात मात्र काळजीचं वातावरण निर्माण झालंय. या सर्व्हेनुसार, ठाकरे गट 30 ते 35 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. काय सांगतो सर्व्हे? आणि हा अंदाज खरा ठरल्यास कोण असेल काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?

ठाकरे गटाला 'टेन्शन', काँग्रेस 'सातवे आसमान' पर!

काँग्रेसनं नुकत्याच केलेल्या सर्व्हेनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 80 ते 85, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 50 ते 55 तर शिवसेना ठाकरे गटाला 30 ते 35 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेमुळं काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते 'सातवे आसमान' असले तरी तिकडं ठाकरे गटात या सर्व्हेनं 'टेन्शन' वाढवलंय.

सर्व्हेनुसार, आपला पक्ष थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं दाखवण्यात आल्यानं आपले मुख्यमंत्रिपदाचे मनसुबे धुळीस तर मिळणार नाहीत ना, या विचारानं ठाकरे गट बिथरल्याचं दिसून येतंय.

प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी; जल्दी', 'सबुरी', 'मजबुरी!'

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून तिन्ही घटक पक्षांच्या तीन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट म्हणतोय, 'आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा', काँग्रेस(Congress) म्हणतंय, 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीनंतर ठरवू'; तर राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणतोय,'आम्हाला मुख्यमंत्रिपदाच्या भानगडीत पडायचं नाही.'

पण, या सर्व्हेमुळं काँग्रेस खुशीत आणि ठाकरे गट चिंतीत, अशी काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. मुख्यमंत्रिपदावरून तिन्ही पक्षांची भूमिका अगदी थोडक्यात मांडायची झाल्यास ठाकरे गट म्हणतोय 'करो जल्दी', काँग्रेस म्हणतंय, 'रखो सबुरी', तर राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणतोय, 'तुम्हारी मजबुरी!'

आधी सत्तेची बांधू मोळी, मग मुख्यमंत्रिपदाची चाखू पोळी!

'आपण यापूर्वी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद यशस्वीरित्या सांभाळून दाखवलंय त्यामुळं यावेळीही आम्हालाच मुख्यमंत्रिपद मिळालं पाहिजे,' असा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून केला जातोय. राष्ट्रवादी शरद पवार गटानं तर आपल्याला या भानगडीत पडायचं नाही, अशी भूमिका घेत मुख्यमंत्रिपद कुणाला याबाबत हात वर केलेत.

तर तिकडं काँग्रेसनं मात्र सारखं सारखं एकाच पक्षाला मुख्यमंत्रिपद नको, असं म्हणत यंदा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा सूर लावलाय. एकंदरीत, 'मुख्यमंत्री कुणाचा?' या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत निवडणुकीपूर्वीच वाद नको म्हणून मुख्यमंत्रिपदाचं नंतर बघू, अशी भूमिका घेत तिन्ही पक्ष 'आळी मिळी गुपचिळी' या उक्तीला धरून बसलेत.

ज्याच्या जास्त जागा त्याची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची!

'ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री' या सूत्रानुसार विचार केल्यास मुख्यमंत्री होण्यासाठी संबंधित पक्षाला सर्वाधिक जागा निवडून आणाव्या लागतील. अर्थात, सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी आधी जास्तीत जास्त जागा लढाव्या लागतील. 2019 च्या निवडणुकीचा विचार केल्यास युतीत असलेली शिवसेना 124 तर आघाडीत असलेली काँग्रेस 147 जागा लढली होती. राष्ट्रवादीनं 121 जागा लढल्या होत्या.

आताच्या निवडणुकीची परिस्थिती मात्र वेगळी आहे. आता शिवसेनेतला ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतला शरद पवार गट महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) आहे. त्यामुळं कुणी किती जागा लढवायच्या हे ज्यानं-त्यानं मागच्या निवडणुकीत लढलेल्या जागांवरून ठरवायचं की जिंकलेल्या जागांवरून, यात खरी मेख आहे.

शिवसेनेनं 2019 मध्ये 56 जागा जिंकल्या असल्या तरी आताच्या आघाडीतील शिवसेना ठाकरे गटासोबत त्यातले फक्त 14 आमदार त्यांच्या सोबत आहेत शिवाय राष्ट्रवादीनं मागच्या निवडणुकीत 54 जागा जिंकल्या असल्या तरी आताच्या आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत त्यातले फक्त 12 आमदार त्यांच्या सोबत आहेत.

थोडक्यात, महाविकास आघाडीत सध्या तरी काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे कारण काँग्रेसकडं 37 आमदार आहेत. त्यामुळं मागच्या निवडणुकीत लढलेल्या जागांची संख्या आणि सध्या सोबत असलेल्या आमदारांचं संख्याबळ पाहता काँग्रेस महाविकास आघाडीच्या जागावाटपात जास्तीत जास्त जागा मागण्याची शक्यता अधिक आहे.

पटोले, वडेट्टीवार, थोरात? CM पदासाठी कुणाची चर्चा जोरात?

नाना पटोले सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसनं 2024 ची लोकसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली. काँग्रेसनं या निवडणुकीत 17 जागा लढवून 13 जागांवर विजय मिळवला. यापूर्वी ते विधानसभेचे अध्यक्षही राहिले आहेत. 1999 आणि 2004 मध्ये भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर (आताचा साकोली मतदारसंघ) विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर सलग दोनदा विजय मिळवला.

2009 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि साकोली (भंडारा-गोंदिया) विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विजय मिळवून आमदारकीची हॅटट्रिक साधली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर खासदार बनले. त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत साकोली मतदारसंघातून विजय मिळवला. 04 वेळा आमदार आणि 01 वेळा खासदार बनलेल्या नाना पटोलेंनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळवून दिलेल्या यशाबद्दल हायकमांड त्यांना 'रिटर्न गिफ्ट' म्हणून मुख्यमंत्रिपद देणार का, हे आता पाहावं लागेल.

विजय वडेट्टीवार सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. युती सरकारच्या काळात म्हणजे 1996 ते 1998 या काळात राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेलं महाराष्ट्र वन विकास महामंडळाचं अध्यक्षपद भूषवलं. 1998 मध्ये शिवसेनेनं त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं. 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर चिमूर (चंद्रपूर) विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार बनले. 2005 मध्ये मात्र नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि वडेट्टीवार काँग्रेसमध्ये गेले. 2008 मध्ये त्यांना काँग्रेसनं जलसंपदा राज्यमंत्री बनवलं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा चिमूरचे आमदार बनले.

काँग्रेसनं त्यांना पुन्हा एकदा जलसंपदा राज्यमंत्री बनवलं. 2014 मध्ये सत्ता गेली पण वडेट्टीवार ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. सत्ता जाऊनही ते काँग्रेसमध्ये राहिल्यानं त्यांना विधानसभेत पक्षाचं उपनेतेपद देण्यात आलं. पुढं 2019 मध्ये ते पुन्हा एकदा ब्रह्मपुरी मतदारसंघातून आमदार बनले. दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची वर्णी लागली. 4 वेळा आमदार, राज्यमंत्री, पक्षाशी एकनिष्ठ आणि ओबीसींचे नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस मुख्यमंत्रिपदी बसवणार का, हे पाहावं लागेल.

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. नगर जिल्ह्यातील एकाच मतदारसंघातून म्हणजे संगमनेरमधून त्यांनी आमदारकीची सलग 'डबल हॅटट्रिक' साधली आहे. 1985 ला अपक्ष तर काँग्रेसकडून 1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे एकूण 08 वेळा ते आमदार राहिले आहेत.

विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे या पाच-पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषिमंत्री, पशुसंवर्धन मंत्री, महसूलमंत्री आदी विविध महत्त्वाची मंत्रिपदं भूषवली आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाचे निष्ठावान नेते म्हणून काँग्रेस यंदा तरी थोरात यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवणार का, हेही पाहावं लागेल.

एकूणच काय तर, भले नाना पटोले हा आमचा अधिकृत सर्व्हे नाही, असं म्हणत असले तरी या सर्व्हेमुळं महाविकास आघाडीत 'कहीं खुशी कहीं गम' पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT