Mumbai News: राजकारण अनिश्चित असते, राजकारणात काहीही होऊ शकते. राज्यात सध्या अशीच परिस्थिती आहे. गेली अडीच वर्षे ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात रान पेटवले होते, त्यांच्या प्रत्येक कृतीला, प्रत्येक कामाला विरोध केला होता, तेच आता त्यांचे कौतुक करत आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांमध्ये फडणवीस यांचे कौतुक करण्याची चढाओढ लागल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले. यात काँग्रेसचे नेते अपवाद राहिले आहेत.
राज्यातील विरोधी पक्ष कमकुवत झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 288 पैकी केवळ 46 जागा मिळाल्या. सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का होता. विरोधक सक्षम नसले की काय होते, हे आता दिसून येऊ लागले आहे.
मुख्यमंत्र्यांवर टीकाच केली पाहिजे, विरोधक म्हणून त्यांचे कौतुक करायलाच नको, असे नाही. मात्र गेल्या अडीच वर्षांत फडणवीस यांनी एकही चांगले काम केले नव्हते का, आताच त्यांचे कौतुक का केले जात आहे, असे प्रश्न लोकांना पडले आहेत.
राज्यात विरोधकांची पोकळी निर्माण झाली आहे, हे ठळकपणे दिसत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला ही पोकळी भरून काढण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी काँग्रेसला जमिनीवर उतरून पुढची पाच वर्षे संघर्ष करावा लागणार आहे.
केवळ तोंड चालवणाऱ्या काँग्रेस नेत्यांची जमिनीवर उतरून संघर्ष करण्याची तयारी आहे का, हाही मोठा प्रश्न आहे. सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात... काँग्रेसकडे अशा तरुण आणि प्रभावी नेत्यांची फळी आहे. लोकसभा निवडणुकीत या फळीने कमाल केली होती.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी हे आधी भाजपमध्ये होते, तेलुगू देसम पक्षात होते. काही वर्षांपूर्वी ते काँग्रेसमध्ये आले. पक्षाने विश्वास टाकून त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. त्या संधीचे त्यांनी सोने केले. केवळ घरात बसून, माध्यमांसमोर जाऊन त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली नाही. जमिनीवर उतरून त्यांनी लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. राज्यभरात यात्रा काढली. त्यामुळे लोकांसह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क वाढला. या तिन्ही घटकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढला. त्यामुळे डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली आणि रेड्डी मुख्यमंत्री झाले.
खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले आहे. कारणे वेगवेगळी आहेत, मात्र उद्देश एकच आहे, तो म्हणजे. फडणवीसांचे कौतुक करत असताना एकेकाळी आपलेच असलेल्या नेत्यांना टोला मारणे. राऊत, अंधारे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचायचे होते. सध्या मुख्यमंत्री फडणवीस एकटेच अॅक्टिव्ह मोडमध्ये आहेत, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांना चिमटा काढला. फडणवीस यांनी जिरोटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला, याबद्दल कोल्हे यांना त्यांचे कौतुक वाटले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीचा दौरा केला. त्यावरून 'सामना' या मुखपत्रातून त्यांचे कौतुक करण्यात आले. चांगले काम करत असतील तर त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे राऊत म्हणाले. राजकारण म्हणजे हातात तलवारी, भाले घेऊनच उभे राहिले पाहिजे, असे काही नसते, असे अंधारे म्हणाल्या, गेली अडीच वर्षे त्यांना हे सुचले नव्हते. त्यानांच काय सर्वच राजकीय नेत्यांना सुचले नव्हते. गेली अडीच वर्षे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. पूर्वी ते गडचिरोलीचे पालकमंत्री होते, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. राजकारण हे आपल्या सोयीसाठी असते, लोकांच्या प्रश्नांशी काहीही देणेघणे नसते, असा समज त्यामुळे लोकांमध्ये निर्माण होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला मोठी संधी आहे. अट एकच आहे, ती म्हणजे जमिनीवर उतरून संघर्ष करावा लागेल. काँग्रेसचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरी सांगावी लागेल. मागे वळून पाहिले तर सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे करू शकतील का, याबाबत शंका आहे. चेहरा नवा हवा, तरुण आणि संघर्ष करण्याची तयारी असलेला हवा.
महायुतीच्या सरकारमध्ये भाजप वरचढ आहे. कितीही कुरघोड्या झाल्या तरी भाजपसोबत जाण्याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यासमोर पर्यायच राहिला नव्हता, कारण भाजपला 132 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे या दोघा नेत्यांना अनेक तडजोडी स्वीकाराव्या लागल्या आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात घडलेल्या काही घटनांमुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे पुढची पाच वर्षे लोकांनाही आणि विरोधकांनाही कोणत्याही प्रकारची हालचाल करता येणार नाही.
पुढची पाच वर्षे काँग्रेससाठी महत्वाची आहेत. पण काँग्रेस हे लक्षात घेणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांचा सध्याचा मूड पाहिल्यास महाविकास आघाडीचे भवितव्य अनिश्चित असे दिसत आहे. काँग्रेस संकटात आहेच. या पक्षाकडे सध्यातरी गमावण्यासारखे फार काही राहिलेले नाही. त्यामुळे पुढची पाच वर्षे काँग्रेसने रस्त्यावर उतरून संघर्ष केला, केंद्र, राज्य सरकारची चुकीची धोरणे मांडली तर लोकांमध्ये या पक्षाबाबत विश्वास निर्माण होईल, 2029 ची निवडणूक काँग्रेससाठी आशादायी ठरेल.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.