Dr. Vijaykumar Gavit Sarkarnama
विश्लेषण

Mahayuti discontent: : महायुतीमध्ये असंतोषाची ठिणगी! गावितांचा स्वबळाचा नारा देत मित्रपक्षालाच इशारा

Gavit political statement News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने वेगळी भूमिका घेतली आहे.

सरकारनामा ब्युरो

Nandurbar News : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला नंदुरबार जिल्हयात महायुतीमध्ये निवडणूक लढल्यामुळे बॅकफूटवर जावे लागले आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजपने ताकही फुंकून प्यायचे ठरवले आहे. त्यामुळेच आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात महायुती होणार की नाही यावरून चर्चा रंगली आहे. त्यातच माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत देत भाजपची भूमिका स्पष्ट करताना महायुतीमधील मित्रपक्षाला इशारा दिला आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दोन वेळा खासदार असलेल्या माजी मंत्री गावित यांच्या कन्या हिना गावित यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने त्यांचे काम केले नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळेच कन्येचा पराभव गावित यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीमध्ये निवडणूक लढविण्याची गावित यांची इच्छा नाही. त्यामुळे येत्या काळात नंदुरबार येथील निवडणुका गावित स्वबळावर लढणार का ? याची उत्सुकता लागली आहे.

गेल्या काही निवडणुकातील महायुतीबाबतचा आमचा अनुभव चांगला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्यावर आमची ठाम भुमिका असल्याचे मत माजी मंत्री आणि भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले आहे. आमची भूमिका सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे आणि वरिष्ठांना माहित आहे. आम्ही नंदुरबार जिल्हयात स्वबळावर निवडणूक लढणार आहोत. त्यामध्ये महायुतीला दूर ठेवणार असल्याचे सांगत भूमिका स्पष्ट केली आहे.

महायुतीमध्ये राहून महायुतीतील काही मित्र पक्ष काँग्रेससोबत हात मिळवणी करतात, हे पक्षाचे वरिष्ठांना चालणार आहे का? ते लोक आमचे कालही विरोधक होते आणि आजही विरोधक आहेत. त्यामुळे पुढील निवडणुका आम्ही कशा लढणार आमचे ठरले आहे, असे संकेत त्यांना शिवसेनेला दिले. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात महायुतीबद्दल डॉ. विजयकुमार गावितांनी भूमिका स्पष्ट करताना भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राज्यातील वाटातावरण आतापासूनच तापण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यानच्या काळात डॉ. विजयकुमार गावित यांनी अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे धडगाव तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी, अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे धडगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्याच मुळे नंदुरबार जिल्ह्यात महायुतीला दूर करीत स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

धडगाव तालुक्यातील विविध गावांमधील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि विकासकामांच्या अभावामुळे नाराज होते. डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात भाजपकडील इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT