
Amravati Politics : बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या राजकारणाला लोकसभा निवडणुकीनंतर काहीसा धक्का बसला आहे. नवनीत राणा यांचा पराभव, रवी राणा यांना निवडून आल्यानंतरही मुख्य वर्तुळात, मंत्रिमंडळात न मिळाले स्थान यामुळे राणा दाम्पत्य बॅकफूट गेले असल्याचे दिसून येते. अशातच रवी राणा यांच्याविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फास आवळला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अमरावतीमध्ये राणांची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून येते.
नवनीत राणा खासदार आणि रवी राणा आमदार असे चित्र पाच वर्षांपूर्वी येथे होते. नवनीत राणा अपक्ष लढल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना समर्थन जाहीर केले होते. अखेरच्या टप्प्यात त्यांनी भाजपचा भगवा हाती घेतला. त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपच्या झाडून सर्वच स्थानिक नेत्यांनी उघड विरोध दर्शवला होता. बंडखोरीचेही हत्यार उपसले होते. याचा फायदा काँग्रेसने उचलला. बळवंत वानखडे लोकसभेची निवडणूक जिंकले. त्यामुळे राणा दाम्पत्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते.
विधानसभा निवडणुकीवेळी रवी राणा यांच्याही नावाला भाजपमधून सुरुवातीला विरोध झाला. पण फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातील संबंध राणा यांच्या कामी आले. भाजपने बडनेरा मतदारसंघाची जागा युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडली. तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार म्हणून प्रीती बंड यांनी तयारी सुरु केली होती. मात्र त्यांच्याऐवजी जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी मिळाली. येथेच राणांनी पहिली लढाई जिंकली. सुनील खराटे यांचे डिपॉझिट जप्त झाले.
आता याच खराटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खरंतर खराटे यांचा भाजप प्रवेश रवी राणा यांनीच घडवून आणला आहे. आजही बंड यांना डावलून खराटे यांना दिलेल्या उमेदवारी मागे राणा यांचेच डावपेच असल्याचे बोलले जाते. खराटे पराभूत होताच वर्षभरात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झला. त्यामुळे ही शंका अधिकच गहिरी झाली आहे. आगामी काळात त्यांचे महापालिका किंवा इतर ठिकाणी पुनर्वसन होईलही. पण रवी राणा यांच्यासाठी प्रीती बंड यांचा शिवसेनेत झालेला पक्षप्रवेश खरी डोकेदुखी ठरू शकते.
प्रीती बंड यांनी विधानसभा निवडणुकीत लढण्याचा बाणा दाखवला होता. त्यांनी थेट ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. राणा यांच्यासोबत असलेले वैर बघून बच्चू कडू यांनीही बंड यांच्यासाठी जोर लावला होता. त्यांची त्यावेळची सभा चांगलीच गाजली होती. राणा यांचे खरे नाही असेच चित्र त्यावेळी निर्माण झाले होते. मात्र राणा यांचा ‘किराणा‘ त्यांच्या कामी आला. बंड अवघ्या दहा हजार मतांनी पराभूत झाल्या. पण 68 हजार मते घेऊन त्यांनी आपला दावा कसा योग्य होता हे दाखवून दिले.
आता एकनाथ शिंदे यांनी याच प्रीती बंड यांना शिवसेनेत घेतले आहे. शिवाय बडनेराचेच दोनवेळा आमदार राहिलेल्या ज्ञानेश्वर धाने पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्या महायुती तुटल्यास प्रीती बंड यांचेच त्यांच्या समोर आव्हान राहणार आहे. बंड यांना आतापासूनच आर्थिक रसद आणि संघटनात्मक ताकद दिल्यास त्या राणा यांच्यासमोर आव्हान उभ्या करू शकतात. शिवाय रवी राणा यांना होणारा विरोध लक्षात घेता भाजपमधील नाराजही बंड यांना अंतर्गत मदत करू शकतात.
तिकडे सुलभा खोडके-संजय खोडके आणि नवनीत राणा-रवी राणा यांच्यातील पारंपारिक वादही टोकाला गेला आहे. लोकसभा निवडणुकीत खोडके यांनी उघडपणे राणा विरोधी भूमिका घेत आपला बाणा दाखवून दिला होता. अशात अजित पवार यांनी संजय खोडके यांनाही आमदार केले. त्यामुळे अमरावतीच्या राजकारणात खोडके यांचे वजन आणखी वाढले आहे. आता नुकतेच संजय खोडके यांनी रवी राणा महायुतीत असतील तर आपण स्वतंत्र लढू अशी भूमिका घेतली आहे.
शिवाय संजय खोडके यांनी त्यांचे लक्ष पुन्हा एकदा बडनेराकडे वळवले आहे. आपण बडनेरामध्येही लक्ष घालणार असल्याचे सांगत निधीही देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे खोडके विरुद्ध राणा पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. वास्तवित खोडके आणि राणा यांचा मतदारसंघ आज घडीला वेगळा आहे. पण बडनेरा खोडके यांच्यासाठी नवीन नाही. याच बडनेरा मतदरासंघातून सुलभा खोडके पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या. त्यानंतर रवी राणा यांनी त्यांना दोनवेळा पराभूत केले.
आता प्रीती बंड, ज्ञानेश्वर धाने पाटील संजय खोडके, सुलभा खोडके या राणा विरोधी गटाला ताकद शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून ताकद मिळाली आहे. या ताकदीचा उपयोग आता हे नेते रवी राणा यांची ताकद कमी करण्यासाठी करणार का? खोडके दाम्पत्य राणा दाम्पत्याला कसे थांबवणार राणा आणि खोडके यांच्या वर्चस्वाच्या लढाईत कोण वरचढ ठरणार? हे पुढच्या काळात दिसून येईलच.
पण राणा यांना थांबवणे वाटते तिकते नक्कीच सोपे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ वर्तुळाती नेत्यांशी त्यांची असलेली त्यांची जवळीक ही राणा यांची प्रमुख ताकद आहे. शिवाय धन, धान्य आणि वैयक्तिक संबंध याही त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रीती बंड यांना याच चार गोष्टींचा जास्त धसका होता. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मदतीने त्या रणनीती आखत होत्या. पण ऐनवेळी पक्षाकडूनच धक्का मिळाल्याने बंड यांची रणनीती पाण्यात गेली होती. आता त्या पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलेल्या दिसून येतील. यावेळी त्यांच्या जोडीला खोडके दाम्पत्यही असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.