Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

Shiv Sena News : भाजप सावध, शिंदेंच्या शिवसेनेला कधी कळणार? पुन्हा नको ते 'उद्योग' सुरू…

Mahayuti BJP Maharashtra Politics Eknath Shinde Uday Samant : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळूनही सत्ताधारी शिवसेनेचे नेते पुन्हा आमदार, खासदारांच्या फोडाफोडीची भाषा करू लागले आहेत. ध्रुवीकरणाच्या आगीवर आपली पोळी भाजली जाते, हे लक्षात आल्यामुळेच शिवसेनेकडून नको ते उद्योग सुरू करण्यात आले आहेत.

अय्यूब कादरी

मतदार एखाद्या पक्षाला, आघाडीला किंवा युतीला सत्ता कशासाठी देतात? सध्याची राज्यातील परिस्थिती पाहिली की या प्रश्नाचे उत्तर देताना कुणीही गोंधळून जाऊ शकतो. राजकीय पक्ष निवडणुकीत जाहिरनामे प्रसिद्ध करत असतात. लोकांना विविध आश्वासने देत असतात. विकासाची स्वप्ने दाखवत असतात. आश्वासने पूर्ण व्हावीत, विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी मतदार राजकीय पक्षांना सत्ता देत असतात. मात्र फोडाफोडी करण्यासाठी, एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठी सत्ता मिळाली आहे, असे चित्र सध्या दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि गेल्या पाच वर्षांत ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या, त्याचाही एकदा निकाल लागला आहे, हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या लक्षात आलेले नाही का, असा प्रश्न आहे. सरकार स्थापन झाले आहे, ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, रोजगार वाढवण्यासाठी, राज्यात सलोखा टिकवण्यासाठी. पक्षांची फोडाफोडी करण्यासाठी नाही. पक्षांची फोडाफोडी केली की काय होते, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या लक्षात आले होते, मात्र त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे त्याचा विसर पडला असावा.

राज्यासाठी 2019 ते 2024 ही पाच वर्षे राजकीय गोंधळाची राहिली. लोकांना नेत्यांच्या तोंडून नको ते ऐकावे लागले. नको त्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रिपदासाठी भाजप-शिवेसेनेची 25 वर्षांची युती तुटली. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. त्याच काळात कोरोनाचा शिरकाव झाला. या महामारीच्या काळातही काही नेत्यांच्या तोंडाला लगाम नव्हता, हे महाराष्ट्राने पाहिले आहे.

अडीच वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले, ते शिवसेनेत पडलेल्या ऐतिहासिक फुटीमुळे. भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत मग चिखलफेक सुरू झाली. ती सध्याही कायम आहे. खरेतर, निवडणूक संपली की सर्वकाही विसरून कामाला लागायचे असते, याचा विसर शिंदेंच्या काही नेत्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का का बसला होता, याचाही विसर त्यांना पडला आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेले मोठे यश त्याला कारणीभूत ठरले आहे.

मतदारांना फोडाफोडी आवडली आहे, असा अर्थ शिवसेनेच्या काही नेत्यांना, विशेषतः उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काढला आहे. ते पुन्हा फोडाफोडीची भाषा करू लागले आहेत. ध्रुवीकरणाच्या आगीवर आपली पोळी भाजली जाते, याची खात्री पटली की मग असे नको ते उद्योग सुरू होतात. मतदार याचा विचार करणार नाहीत, असे मंत्री सामंत यांना वाटत असणार. त्यामुळेच ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार, खासदार फुटणार असल्याचे सांगत आहेत. प्रचंड बहुमतामुळे सरकार सुरक्षित आहे, म्हणून असे उद्योग करण्याची मुभा नसते, हे सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला हवे.

भाजप याबाबतीत सावधगिरी बाळगत असल्याचे दिसत आहे. इनकमिंगला ब्रेक लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. इनकमिंगमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची जाणीव भाजपला झालेली आहे. त्यामुळे यापुढे भाजपने मंजुरी दिल्याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश द्यायचा नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी दावोसमध्ये जाऊनही फोडाफोडीकडेच अधिक लक्ष असलेल्या सामंत यांनी बावनकुळे काय म्हणताहेत, याकडे गांभीर्याने पाहायला हवे.

शेतमालाला भाव नसणे, हमीभावाची व्यवस्थित अंमलबजावणी न होणे, खते, कीटकनाशकांच्या वाढत्या दरामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. तरुणांना रोजगार हवा आहे. नागरिकांना सुविधा हव्या आहेत. बीड, परभणीतील दुर्दैवी घटनांमुळे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी नेत्यांना पुन्हा फोडाफोडीची स्वप्ने कशी पडू शकतात? महायुतीकडे 288 पैकी 232 आमदार आहेत. त्यांना आणखी किती आमदार हवेत, राज्यात विरोधी पक्ष राहूच नये, असे सत्ताधाऱ्यांना वाटत आहे का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT