Maratha Reservation : Sarkarnama
विश्लेषण

Maratha Reservation Blog : भले शाब्बास मराठ्यांनो ! अजस्त्र सरकार, अहंकारी नेत्यांना जमिनीवर आणले...!

Maharashtra Politics : मराठा समाजातील सर्वच नागरिक श्रीमंत आहेत, असे चुकीचे चित्र उभे केले जाते.

अय्यूब कादरी

Maratha Reservation : एक दिवस असा येईल, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना जनता पळता भुई थोडी करून ठेवेल... असे काही वर्षांपूर्वी एक वरिष्ठ अधिकारी खासगीत बोलताना म्हणाले होते. त्यामागे संदर्भ होता भ्रष्टाचार आणि दप्तरदिरंगाईचा. आज तशीच परिस्थिती राज्यात दिसून येते आहे. मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. जरांगे पाटील या कफल्लक माणसाच्या पाठीमागे अवघा मराठा समाज खंबीरपणे उभा राहिला आहे.

काही ठिकाणचे अनुचित प्रकार वगळता सर्वत्र शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाने अजस्त्र ताकदीचे सरकार आणि अहंकारी नेत्यांचे विमान जमिनीवर आणले. लोकप्रतिनिधी, नेत्यांना कार्यक्रम घेण्यासाठी आंदोलकांची परवानगी घ्यावी लागत आहे. नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अनेक बड्या नेत्यांना आपले कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाला सर्व समाजांकडून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे सरकार आणि नेते अभूतपूर्व संकटात सापडले आहेत. जिल्ह्याजिल्ह्यांत लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेली सर्वपक्षीय इच्छुकांची स्पर्धा या आंदोलनामुळे मागे पडली आहे.

नेत्यांच्या तोंडावर नाराजी व्यक्त करू शकत नाही

अमिताभ बच्चन यांचे जुने सिनेमे आठवतात का? अमिताभ गुंडांची धुलाई करायला लागला की प्रेक्षक चित्रपटगृह डोक्यावर घ्यायचे, प्रेक्षकांच्या अंगात रक्त सळसळायला लागायचे... कारण अन्यायाची चीड सर्वांनाच असते. मात्र, सर्वच जण त्याविरोधात लढा देऊ शकत नाहीत. आपल्याला शक्य नसलेली आपल्या मनातली गोष्ट कुणीतरी करत आहे, अन्यायाविरोधात लढत आहे.

वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर त्याला अशा लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळतो. सरकार, नेत्यांच्याबाबतीतही आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे असेच झाले आहे. सरकार, नेत्यांविरुद्ध नाराजीची सुप्त लाट कायम असते. त्याला वाट करून देणारा कुणी मिळत नाही. विविध कारणांमुळे लोक नेत्यांच्या तोंडावर आपली नाराजीही व्यक्त करू शकत नाहीत. मराठा समाजाला आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून खेळवले जात आहे. आरक्षण दिले तरी ते न्यायालयात टिकत नाही.

नेत्यांकडून वेळकाढूपणा

मराठा समाजातील सर्वच नागरिक श्रीमंत आहेत, असे चुकीचे चित्र उभे केले जाते. वास्तविक, मराठा समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. आता शेतीची विभागणी झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला फार शेती आहे, असे नाही. शेतमालाला भाव न मिळणे नि्त्याचेच झाले आहे. गेल्या काही वर्षांत खते, कीटकनाशकांचे भाव प्रचंड वाढले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईतही प्रचंड वाढ झाली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना श्रीमंत मानले जाते, मात्र उसाच्या लागवडीपासून तो कारखान्याला जाईपर्यंत जीवघेणी कसरत करावी लागते. भाव किती मिळणार, रक्कम कधी मिळणार याचाही ताळमेळ नसतो. कोरडवाहू शेतकऱ्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत जीवघेण्या महागाईला तोंड देत शेतकरी किती कठीण परिस्थितीत जगत आहेत, हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणार नाही. या सर्व बाबींमुळे मराठ्यांकडून आरक्षणाची मागणी होत आहे. अनेक निर्णय धडाक्यात घेणारे, अमुक सरकारमध्ये निर्णय घेतले जात नव्हते, असे म्हणत तमुक सरकारमध्ये सामील झालेल्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत मात्र वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे.

मराठा समाजाच्या या भावनेला वाट मोकळी करून देणारे खंबीर नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने मिळाले आहे. एक महिन्यात आरक्षणाचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन सरकारने दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू केलेले उपोषण मागे घेतले होते. त्यांनी सरकारला आणखी दहा दिवस वाढवून दिले. या ४० दिवसांत सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

निर्णय घेणे शक्य नसताना सरकारने एक महिन्याची मुदत कोणत्या आधारावर दिली, असा प्रश्न मराठा समाजाकडून उपस्थित केला जात आहे. सरकार केवळ आपल्या खेळवत आहे, अशी भावना यामुळे निर्माण झाली आहे. आरक्षणाचा प्रश्न केवळ जरांगे पाटील यांच्यामुळे सुटू शकतो, अशी भावना त्यांच्या प्रामाणिकपणामुळे मराठा समाजात निर्माण झाली आहे. जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून गावोगावी साखळी उपोषण सुरू आहे. त्या ठिकाणी लोकप्रितनिधींना येण्यास मनाई करण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन आंदोलकांनी नेत्यांना केले आहे.

कार्यक्रम घेतलाच तर त्याला विरोध केला जात आहे. गावोगावी नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बड्या नेत्यांना आपले कार्यक्रम, दौरे रद्द करावे लागले आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय मंत्री, खासदार, आमदारांना गावात येऊ देणार नाही, असे फलक गावोगावी लावण्यात आले आहेत. नेत्यांचे पोस्टर फाडून टाकणे, त्याला काळे फासणे हे आता नित्याचेच झाले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT