Medha Kulkarni, BJP Sarkarnama
विश्लेषण

Medha Kulkarni : 'खासदारकी' तर मिळवली; पण कुलकर्णींची खरी अग्निपरीक्षा आता सुरू होणार!

Political News : कुणाच्या मनीध्यानी नसताना गेल्या साडेचार वर्षांत काहीसं साइडलाइन झालेलं नाव पुढं आलं अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ते नाव होतं माजी आमदार मेधा कुलकर्णींचं.

Sachin Waghmare

Pune News : राज्यसभेच्या उमेदवारीकडे नजरा लावून बसलेल्यांची संख्या भाजपमध्ये कमी नव्हती. पुण्यातील काही जणांनी एकीकडे लोकसभेच्या उमेदवारीसाठी 'देव' जवळ केले असतानाच राज्यसभेच्या 'खासदारकी'साठीही बऱ्याच जणांनी मोठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जोरदार फिल्डिंग लावली होती. पण कुणाच्या मनीध्यानी नसताना गेल्या साडेचार वर्षांत काहीसं साइडलाइन झालेलं नाव पुढं आलं अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ते नाव होतं माजी आमदार मेधा कुलकर्णींचं. राज्यसभेसाठी कुलकर्णी यांचा चेहरा पुढे आणत पक्षनेतृत्वाने शहर भाजपला एकप्रकारे कडक इशाराच दिला आहे, पण खासदारकी मिळवली असली तरी कुलकर्णी यांची खरी अग्निपरीक्षा यापुढे असणार आहे.

विधानसभेला तिकीट कापण्यात आल्यानंतर मेधा कुलकर्णी यांना पुणे भाजपमध्ये डावलण्यात आल्याची चर्चा होती. एवढंच काही चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनापासूनही त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. महत्वाची बाब म्हणजे कुलकर्णी यांच्या आमदारकीच्या काळातच या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते, पण आता खासदारकीची माळ गळ्यात पडलेल्या मेधाताईंचं पुण्याच्या राजकारणात जोरदार कमबॅक झालं आहे. त्यांच्या पुन्हा अॅक्टिव्ह होण्याने पक्षामधील 'हितचिंतकां'ची निश्चितपणे झोप उडाली आहे.

आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला सामोरे जावे लागणार आहे. या निवडणुकीत मागील यश कायम राखण्याचे आव्हान पक्षासमोर असणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपला स्वीकारावा लागलेला पराभव जिव्हारी लागलेला आहे.

पक्ष वाढला की कार्यकर्ते वाढतात, साहजिकच त्यांच्या अपेक्षाही वाढतात. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेतृत्वाचा कस लागतो. नव्याने खासदार झालेल्या मेधा कुलकर्णी यांचा येत्या काळात कस लागणार आहे. मोठ्या आशा-अपेक्षा घेऊन पक्षात आलेले नवे कार्यकर्ते आणि पक्ष शून्यात असताना तो भरभराटीपर्यंत पोहाेचेपर्यंत योगदान दिलेले ज्येष्ठ नेते-कार्यकर्ते यांची योग्य सांगड घालून पक्षाची आगामी घोडदौड त्यांना कायम ठेवावी लागणार आहे.

भाजपने कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी करताना मेधा कुलकर्णी यांना आमदारकीचा त्याग करावा लागला होता. त्यामुळे भाजपने मेधा कुलकर्णी व ब्राह्मण समाजाची नाराजी ओढावून घेतली होती. कसबा पोटनिवडणुकीत मोठा धक्का बसल्याने भाजपने आता ताकही फुंकून पित वेळीच चूक सुधारली आहे. गेली साडेचार वर्षे राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेधा कुलकर्णी यांचे भाजपने राज्यसभा उमेदवारी देत पुनर्वसना केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेधा कुलकर्णींना संधी देत भाजपने सामाजिक आणि राजकीय संतुलन साधले आहे. पुण्याबाहेरचा उमेदवार लादल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाल्याने कुलकर्णींना संधी देत समतोल साधला आहे. खासदार गिरीश बापट यांचे मागीलवर्षी निधन झाले. परंतु साधारण वर्षभराचा कालावधी शिल्लक असतानाही पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक झालेली नाही. भाजपने आतापर्यंत पुणे लोकसभा, राज्यसभा अथवा विधानसभा, विधान परिषदेमध्ये ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघाच्या आमदार प्रा. कुलकर्णी यांचा पत्ता कट करून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी दिली.

कसबा मतदारसंघामध्ये तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांना संधी दिली. दुर्देवाने टिळक यांचेही निधन झाले. या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये राज्यात महायुतीचे सरकार असतानाही कॉंग्रेसने भाजपचा पराभव झाला होता.

मेधा कुलकर्णी या कोथरूड विधानसभेतून आमदार राहिल्या आहेत. मात्र, 2019 ला त्यांना डावलून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर ब्राह्मण उमेदवार नसल्याच्या चर्चा रंगल्या. त्यांना थेट राज्यसभेची उमेदवारी आहे. मेधा कुलकर्णी या प्राध्यापिका आहे. उच्चविद्याविभूषित असलेला चेहरा संसदीय राजकारणामध्ये भाजपला उपयोगी ठरू शकतो.

स्पष्टवक्तेपणा कामी येणार

मेधा कुलकर्णी यांचे कार्य आणि त्यांनी आतापर्यंत मांडलेल्या भूमिका पाहिल्या तर त्या स्पष्टवक्ता आहेत. त्यासोबतच त्या आक्रमक भूमिक घेण्यासाठी ओळखल्या जातात. राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडताना त्या कायम तत्पर असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, त्यांच्या आक्रमकपणासाठी त्या ओळखल्या जातात. कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी ब्राह्मण उमेदवार नसल्याचं ब्राह्मण समाज नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, मेधा कुलकर्णींना उमेदवारी देऊन भाजपने (Bjp) ब्राह्मण उमेदवाराचादेखील डाव साधला आहे.

अनुभवाचा होणार फायदा

मेधा कुलकर्णी यांना महापालिका आणि विधानसभा अशा दोन्ही ठिकाणचा अनुभव आहे. त्यांनी काही काळ नगरसेवक व २०१४ मध्ये कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा चांगला संच देखील आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघांत त्यांचा प्रभाव आहे. त्याचा फायदा निश्‍चितच भाजपला येत्या निवडणुकीत होणार आहे. येत्या काळात महापालिकेतील यंत्रणा अधिक वेगवान करण्याची गरज आहे. राज्य, केंद्र सरकार आणि पक्षसंघटना अशी सांगड घालून प्रश्‍न सोडविण्यावर भर त्यांना द्यावा लागेल.

काय असणार आव्हान ?

पुढील काळात खासदार म्हणून जबाबदारी सांभाळताना पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न तसेच विमानतळाचा प्रश्न आणि इतर नागरी समस्यांचा निराकरण करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराची मालिन होणारी प्रतिमा जपावी लागणार आहे. ड्रग्ज माफिया आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची गरज आहे. त्यासोबतच येत्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत कशी राहील, यासाठी प्राधान्य देण्याची गरज आहे.

पुण्याचे प्रश्न-समस्या मांडाव्या लागणार

पुणे आणि परिसरातील वाढते नागरीकरण, वाढती लोकसंख्या, उद्योग-सेवा व्यवसायांचे निर्माण होणारे जाळे यामुळे नागरिकांमधून निवडून जाणाऱ्या लोकसभेच्या खासदारांप्रमाणे एखाद्या शहराचे, परिसराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यसभेच्या खासदारांकडून स्थानिक विकासकामे आणि प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा-प्राधान्य देण्याची गरज आहे. राज्यसभेवर पुण्यातील दोन खासदारांनी सलग १२ वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. आता मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्या निवडीमुळे लोकसभेतील जिल्ह्याच्या चार खासदारांसह पुण्याचा आणखी एक खासदार संसदेत पुण्याचे प्रश्न-समस्या मांडू शकणार आहेत.

रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची अपेक्षा

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर आणि पुणे जिल्ह्याची जवळपास एक ते सव्वा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वच खासदारांनी एकत्रितपणे शहराच्या विकासाकरिता योगदान देणे महत्त्वाचे आहे. देशाच्या अनेक भागांत अनेक प्रकल्प गतीने पुढे सरकत असताना पुणे परिसरात अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज आहे. त्यासाठी, दूरदृष्टी ठेवून पुण्याच्या विविध प्रकल्पांना केंद्रीय स्तरावरून चालना देण्याचे काम करणारा खासदार हीच पुण्याची गरज आहे. ही गरज ओळखून त्यांनी येत्या सहा वर्षांच्या काळात सर्वसामान्यांचा आवाज संसदेत उठविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.

R

SCROLL FOR NEXT