Asaduddin Owaisi, Imtiaz Jaleel, Prakash Ambedkar Sarkarnama
विश्लेषण

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना पाडण्यासाठी 'MIM' ची एन्ट्री ?

Sachin Deshpande

Lok Sabha Election : गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला. त्यामुळे वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचा अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. या वेळी वंचितसोबत जुळवून घेण्याचे आदेश काँग्रेस हायकमांडने दिल्याने यंदा महाविकास आघाडीसोबत वंचित बसण्याची चिन्हं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची आघाडी होती, पण ही आघाडी असताना एमआयएमचे नेते अकोल्यात प्रचारासाठी आले नाहीत, पण यंदा आघाडी नसताना एमआयएमने अकोल्यात उमेदवार देण्याची चाचपणी तर केलीच, त्याचबरोबर विदर्भात दोन उमेदवार देणार असल्याचे घोषित करत वंचितला ट्रप करण्याचे सुरू केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मदतीने एमआयएमचा खासदार राज्यात जिंकला. यंदा मात्र वंचित आणि एमआयएमची आघाडी नसल्याने एमआयएम अकोल्यात वंचितला जागा दाखविण्याची शक्यता आहे. वंचितला पाडण्यासाठीच एमआयएम अकोल्यात मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी करत असून, यामुळे नवा संघर्ष अकोल्यात दिसून येईल. एमआयएमला अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाडण्यासाठी कोणी उभे राहण्याचे संकेत दिले, हादेखील संशोधनाचा विषय आहे.

वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचे बेछूट आरोप आणि रोज भाजपवरचे नवनवे हल्ले आता भाजपच्या पचनी पडत नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या वर्षापासून वंचित नेत्यांनी कंबर कसली असून, यंदा आंबेडकर यांच्या विजयासाठी एकत्र काम सुरू केले आहे. असे असताना भाजपच्या ताब्यातील ही जागा प्रकाश आंबेडकर घेऊ शकतात, असा संशय बळावल्याने एमआयएमने अकोल्यात अचानक मुसंडी मारली आहे. एमआयएम यंदा वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांना पाडण्यासाठी मुस्लिम उमेदवार देण्याचे संकेत आहे. 2014, 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे हिदायत पटेल या मुस्लिम उमेदवारामुळे वंचितचे लोकसभा उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा मात्र महाविकास आघाडीचे घटक असलेले आंबेडकर यांचा पराभव करणे तूर्तास शक्य नसल्याने एमआयएमला अकोल्याच्या रिंगणात उतरविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात वास्तविकता दिसून येत आहे. ज्या वेळी वंचित व एमआयएमची आघाडी होती तेव्हा आंबेडकर यांच्या प्रचाराला एमआयएमचे नेते अकोल्यात आले नाहीत, आता मात्र एमआयएमच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी अकोल्यात जाहीर सभा घेत आंबेडकरांना शह देण्याची तयारी सुरू केली आहे. एमआयएम मते खाण्यासाठी येथे उमेदवार उभा करणार असून, त्याचा फायदा हा निश्चित भाजपला होईल. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर हे खासदार होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे अकोल्यात वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीत पडणार असे चित्र निर्माण केले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी व प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी रविवारी अकोल्यात येत जाहीर सभा घेतली. अकोल्यात चाचपणी करणे एमआयएमने सुरू केली आहे. अकोल्यात एमआयएमचा तसा मोठा प्रभाव नाही. पण, लोकसभेत मुस्लिमांची मते विभाजित करण्याचा हेतू यातून दिसत आहे. वंचितनेदेखील मुस्लिम वस्त्या आणि नेते यांच्यासोबत संपर्क वाढविला आहे. पण, मुस्लिमांची मते वंचितला मिळूच नयेत, यासाठी एमआयएमला अकोल्याच्या राजकारणात आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एमआयएमला अकोल्यात कोण आणण्यास इच्छुक आहे. त्याचबरोबर वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे लोकसभेत जाऊ नयेत, यासाठी पडद्यामागे कोणाच्या हालचाली वेगाने सुरू आहेत, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. 2019 च्या तुलनेत यंदा वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांची बाजू अकोल्यात भक्कम आहे. भाजपलादेखील अकोल्यात विजयाची शक्यता धुसर वाटत आहे. असे असताना अचानक एमआयएमने अकोल्यात थेट ओवेसी, जलील यांच्या नेतृत्वात सभांना सुरुवात करणे हे आंबेडकर यांच्या पराभवाच्या रणनीतीचा भाग मानला जात आहे.

2019 च्या अकोला लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार संजय धोत्रे यांना 5,54,444 मिळाली होती. त्या खालोखाल वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांना 2,78,848 तर काँग्रेस नेते हिदायत पटेल यांना 2,54,370 मते मिळाली होती. 2019 शिवसेना आणि भाजप यांची युती होती. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाच्या सहकार क्षेत्राचे वर्चस्व आहे. त्यांनी ठरविले तर प्रकाश आंबेडकर यांचा विजय सुनिश्चित होऊ शकतो. महाविकास आघाडी सोबत वंचितची आघाडी झाली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा लाभ आंबेडकरांना होऊ शकतो. हे गणित पाहता यंदा थेट एमआयएमची चाचपणी सुरू झाल्याने दुसरीकडे आंबेडकरांना पाडण्याची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. एमआयएमने कोणाचा तरी हात धरत वंचितला पाडण्याचे ठरविले असेल तर राज्यात एमआयएमबरोबर हात धरणाऱ्यांचा पराभव करण्याची रणनीती वंचितची असूच शकते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT