Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray and Mahayuti : 'बिनशर्त' पाठिंबा दिला म्हणून कायर्कर्त्यांना मानसन्मान नाही?

MNS Latur News : लातूर येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्याचे निमंत्रण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेले नाही. बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळणार नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

अय्यूब कादरी

Loksabha Election 2024 : नेत्याने वारंवार भूमिका बदलल्या की कार्यकर्त्यांची कोंडी होते. पक्षाचा विस्तार दूरच राहिला, या भूमिकांशी जुळवून घेण्यासाठीच कार्यकर्त्यांना कसरत करावी लागते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची अवस्था सध्या अशीच झाली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीली बिनशर्त पाठिंबा दिला आहे. असे असतानाही महायुतीकडून मनसे कार्यकर्त्यांचा मानसन्मान केला जात नसल्याचे प्रकार समोर येत आहेत.

राज ठाकरे(Raj Thackeray ) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात रान उठवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकारणाच्या पटलावरून नाहीसे झाले पाहिजेत, असे ते म्हणत असल्याचे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांत प्रचंड व्हायरल होत आहेत. गेल्या निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांनी भाजपची लक्तरे वेशीवर टांगली होती.

मनसेने त्यावेळीही लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती, मात्र राज्यभरात सभा घेतल्या होत्या. आपल्या वक्तृत्वशैलीच्या बळावर सभांना गर्दी खेचणारे राज ठाकरे हे सध्या राज्यातील एकमेव नेते आहेत. त्यामुळे अर्थातच गेल्या निवडणुकीत त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे. मात्र मतदानावर त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे पानिपत झाले होते. शिवसेना-भाजप युतीचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाच वर्षांनंतर राज ठाकरे यांनी आता यू टर्न घेतला आहे. त्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. मोदी, शाह यांना राजकीय पटलावरून दूर सारा, असे त्यावेळी म्हणणारे राज ठाकरे आता नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना पंतप्रधान करा असे म्हणत आहेत. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला, असे ते सांगत आहेत.

राज ठाकरे यांच्या या सततच्या भूमिका बदलण्याच्या प्रकाराला कंटाळून त्यांच्या काही महत्वाच्या शिलेदारांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जे मनसेत आहेत, त्यांच्याकडे महायुतीकडून दुर्लक्ष केले जात आहे. लातूर येथे असा प्रकार घडला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात सुधाकर श्रृंगारे हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी 16 एप्रिल रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून मनसेला या मेळाव्याचे निमंत्रण देणे आवश्यक होते, मात्र तसे झालेले नाही. या मेळाव्यासाठी मनसेला निमंत्रण देण्यात आलेले नाही.

...की त्याची विश्वासार्हता संपुष्टात येते -

महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणारे राज ठाकरे त्यांच्या उमेदवारांसाठी प्रचार सभाही घेणार आहेत. विशेष म्हणजे, याही लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार रिंगणात उतरलेला नाही. राज ठाकरे हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मात्र महायुतीकडून दुर्लक्ष केले जात आहे.

नेत्याने वारंवार भूमिका बदलली की त्याची विश्वासार्हता संपुष्टात येते, पर्यायाने त्याचा धाकही संपुष्टात येतो. त्याचा फटका कार्यकर्त्यांना सहन करावा लागतो. लातूर येथे घडलेले प्रकरण याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांनी राज ठाकरे यांच्या प्रेमापोटी त्यांची साथ सोडलेली नाही, पक्षही बदललेला नाही. आपण ज्यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे, त्या पक्षाकडून अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला जातोय किंवा नाही, याची काळजी राज ठाकरे यांना करायला हवी.

ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडे राज ठाकरे यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते, असे आरोप सतत होत असतात. काही वर्षांपूर्वी नागरी समस्यांवर मनसेचे कार्यकर्ते अभिनव पद्धतीने आंदोलन करून लोकांचे लक्ष वेधून घेत असत. मात्र मनसेचा गाडा याच्यापुढे गेलाच नाही. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना बळ देण्यात पक्ष कमी पडला. त्यामुळे पक्षाची वाढ खुंटली. असे असले तरीही अनेक कार्यकर्ते आजही प्रामाणिकपणे मनसे(MNS)सोबत उभे आहेत. त्यांना राज ठाकरे यांच्याकडून बळ मिळण्याची गरज आहे. असे असताना कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा येत आहे. लातूर येथील प्रकरणाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी महायुतीला खडे बोल सुनावण्याची गरज आहे, तरच कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT