Raj Thackeray Politics : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यामुळे छोट्या पक्षांची वाताहात झाली. विशेष म्हणजे मनसेच्य स्थापनेनंतर पहिल्यांदाच विधानसभेत मनसेचा एकही आमदार असणार नाही. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील माहिम मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला.
विधानसभेतील झालेल्या पराभवानंतर सावरत राज ठाकरे पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत मनसे आपली ताकद पणाला लावणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
राज ठाकरे यांनी पराभवानंतर पहिला दौरा नाशिकचा केला. नाशिक महापालिकेमध्ये राज ठाकरेंच्या मनसेची सत्ता देखील होती. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा पाठींबा मिळाला. मात्र, भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीपुढे मनसेला सत्ता टिकवता आली नाही. मनसेला पालिकेतील सत्तेतून बाहेर जावे लागले. त्यानंतर मनसेची नाशिकमध्ये मोठी पिछेहाट झाली.
राज यांनी नाशिकचा दौरा करत पुन्हा कार्यकर्त्यांमध्यो जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांशी वन टू वन बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी राज ठाकरेंनी केली असल्याचे दिसते आहे.
2019 च्या नंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेनी आपले अस्तित्व दाखवून दिले होते. पुणे महापालिकेत विरोधीपक्ष नेते पद तर नाशिकमध्ये सत्ता मिळवली. मुंबईत देखील नगरसेवक विजयी झाले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी स्वच्छ प्रशासन, विकास या मुद्द्यांवर भर दिला होता. मात्र, यावेळी मुंबई महापालिकेत हिंदुत्वाच्या मुद्यासोबत मनसे मराठीच्या मुद्यावर भर देणार असल्याचे दिसते आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मुलाखातीमध्ये पालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेणार असल्याचे संकेत दिले होते. मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे. त्यामुळे ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मनसे आणि एकनाथ शिंदेंची साथ भाजपला हवी आहे. त्यामुळे मनसे भाजपला साथ देणार की स्वबळावर लढणार हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, सत्तेच्या जवळ राहण्यासाठी महायुतीमध्ये आपण असलेल पाहिजे असा काहीसा सूर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे. त्यात भाजप नेत्यांसोबत राज यांचे असलेले संबंध पाहता ते सन्मानजनक जागा मिळाल्या तर पालिका निवडणुकीत भाजपला साथ देतील, अशी शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्यामुळे मुंबई क्षेत्रात एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागल्याचे बोलले जात आहे. तर, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने माघार घेतली नाही त्यामुळे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपसोबत जरी मनसे गेली तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच मनसेची मुख्य विरोधक असण्याची शक्यता आहे. मनसेमुळे आपला सत्तेतील वाटा कमी होईल, अशी भीती एकनाथ शिंदेंना असणार आहे त्यामुळे मनसेला मोठे व्होवू न देण्याचे धोरण शिंदे निश्चित राबवतील. त्यामुळे मनसेसाठी महापालिका निवडणूक ही आव्हानात्मक असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.