
Guardian Minidter News : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. सोलापूरला त्या सरकारमध्येही मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे अर्थातच बाहेरचा पालकमंत्री (Guardian Minister) मिळणार, हे निश्चित होते. सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत एक, दोन नव्हे तर तब्बल तीन पालकमंत्री सोलापूरला मिळाले होते. त्यामुळे 'मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया' अशी अवस्था काही पालकमंत्र्यांची झाली होती. आता धाराशिवसह अन्य काही जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
धाराशिवला या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे पालकमंत्री बाहरेचेच मिळणार हे निश्चित होते. सोलापूर जिल्ह्याचेही असेच झाले आहे. वाशीम, हिंगोली, नंदुरबार, आदी जिल्ह्यांनाही बाहेरचे पालकमंत्री मिळाले आहेत. बाहेरच्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील प्रश्न कळणार का, कळले तरी ते सोडवण्यासाठी ते आत्मीयता दाखवणार का, कार्यकर्त्यांना जवळ करणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले, मात्र ते सोलापूरला एकदाही आले नाहीत. त्यानंतर ही जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आली होती. ते एकदा येऊन गेले ते परत आलेच नाही. आव्हाड यांच्यानंतर दत्तात्रेय भरणे सोलापूरचे पालकमंत्री बनले. कोरोनाकाळात भरणे यांनी सोलापुरात थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवले होते.
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आता शिवसेनेचे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना मिळाले आहे. सरनाईक यांचा धाराशिवशी यापूर्वी फारसा संबंध आलेला नाही. धाराशिव जिल्ह्यात भूम-परंडा मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत, कळंब-धाराशिव मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास पाटील, तुळजापूर येथे भाजपचे राणाजगजितसिंह पाटील, उमरगा-लोहारा मतदारसंघात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी हे आमदार आहेत.
यापूर्वी तानाजी सावंत हे पालकमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शंकरराव गडाख यांच्याकडे ही जबाबदारी होती. त्यापूर्वी देवेंद्प फडणवीस मुख्यमंत्री असतानाही तानाजी सावंत हे काही वर्षे पालकमंत्री होते. सावंत आणि गडाख यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी काय केले, हा मोठा प्रश्न आहे. सावंत भूम-परंड्याचे आमदार असल्यामुळे ते जिल्ह्यात सतत असायचे, गडाख मात्र काही विशिष्ट प्रसंगीच जिल्ह्यात येत असत.
तानाजी सावंत हे आपल्या पालकमंत्रिपदाच्या दोन्ही कार्यकाळात उमरगा-लोहारा तालुक्याला एकदाही आले नाहीत. ते पालकमंत्री असूनही जिल्ह्यात शिवसेनेची एक जागा या निवडणुकीत घटली आहे. उमरगा मतदारसंघातून शिवेसेनेचे ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला. ते यापूर्वी सलग तीनवेळा निवडून आले होते. जिल्ह्यातील पालकमंत्री असूनही शिवसेनेला त्याचा काहीही फायदा झाला नाही, असे दिसत आहे.
मंत्रिपद न मिळाल्यामुळे सावंत हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आपली महत्वाची भूमिका होती, अशी गर्जना करणारे सावंत आता काहीही करू शकत नाहीत, कारण महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे. पालकमंत्री असताना सावंत यांनी भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येकवेळी पाटील यांनी त्यांच्यावर मात केली.
लोकसभा निवडणुकीतील सावंत यांच्या भूमिकेवर त्यांच्याच एका विधानामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार पाटील यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती. सावंत आपल्या पुतण्याला उमेदवारीसाठी आग्रही होते. अर्चनाताई यांचा पराभव झाला. आपल्याला उमेदवार पटला नव्हता, त्यामुळे मी मते मागायला आलो नाही, असे सावंत म्हणत असल्याचा एक व्हिडीओ त्यानंतर व्हायरल झाला होता.
विधानसभा निवडणुकीत सावंत यांचा निसटता विजय झाला. उमरग्यात ज्ञानराज चौगुले यांच्या विजयासाठीही त्यांचा हातभार लागला नाही, असे सांगितले जाते. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची पाळेमुळे जिल्ह्यात नाही म्हटले तरी घट्ट रुजलेली आहेत. अशा परिस्थिती आमदार पाटील यांच्याशी वितुष्ट आणि वाचाळपणा सावंत यांना महागात पडला, परिणामी, त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.
आता पालकमंत्री सरनाईक यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते उमरग्याला येतील का, याची प्रतीक्षा लोकांना आहे. सरनाईक यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू झालेली आहे. डॉ. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय. आमदार पाटील यांची राजकीय कारकीर्दही राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू झाली आहे. पाटील आणि सरनाईक यांचा परिचय जुनाच आहे.
सावंत यांच्यासाठी ही बाब डोकेदुखी ठरू शकते. एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचे संकेत सावंत यांनी वारंवार दिले आहेत. त्यामुळे सरनाईक हे सावंत यांच्याबाबतीत कशी भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल. आमदार पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. जिल्ह्यात सध्या ते सर्वाधिक शक्तिशाली आमदार आहेत. फडणवीस यांच्याशी थेट संबंध असल्यामुळे पालकमंत्री कुणीही झाले तरी त्यांना काही फरक पडणार नाही, अशी स्थिती आहे.
अशा परिस्थितीत पालकमंत्री सरनाईक आणि आमदार पाटील यांच्यात सख्य राहणार, अशी शक्यता आहे. पालकमंत्रिपद शोभेचे नाही, हे दाखवून देण्याचे आव्हान सरनाईक यांच्यासमोर आहे. वाळूच्या गाड्या चालू द्या, ते आपलेच लोक आहेत, अशी सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती, असे विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच केले आहे. महायुती सरकारमध्ये विखे पाटील सोलापूरचे पालकमंत्री होते. असे उपदव्याप करायलाच पालकमंत्रिपदी हवे का, असा समज लोकांमध्ये त्यामुळे बळावला आहे. ही धारणा बदलण्याचे आव्हानही सरनाईक यांच्यासमोर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.