Raj Thackeray Leave Shivsena 20 Years Ago Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray: वीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडल्यानंतर काय म्हणाले होते राज ठाकरे...

Why Did Raj Thackeray Leave Shiv Sena: माझा वाद हा विठ्ठलाशी नसून त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे. तरीही आजपर्यंत मी या बडव्यांच्या मधून माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेत आलो. आतलं मंदिर हे विठ्ठलाचं आहे. बडव्याचं नाही.....

Mangesh Mahale

Raj Thackeray Leave Shivsena 20 Years Ago: वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेचा 'जय महाराष्ट्र'करीत आपली वेगळी चूल मांडली. आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनीही काही अटी-शर्ती घालत त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

शिवसेना सोडल्यावर भावुक झालेल्या राज ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून केलेल्या भाषणांची आठवण आज अनेकांना आहे. राज यांचा शिवसेना सोडण्याचा तो निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. ही घटना ऐतिहासिक आहे. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते, हे जाणून घेऊया!

माझा वाद हा विठ्ठलाशी नसून त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे. तरीही आजपर्यंत मी या बडव्यांच्या मधून माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेत आलो. आतलं मंदिर हे विठ्ठलाचं आहे. बडव्याचं नाही. हे आपलं मंदिर असल्याचे बडवे समजत आहेत," अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या तत्कालीन परिस्थितीबाबत भाष्य केलं होते. हे बोलत असताना ते भावुक झाले होते.

"महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांना दीड-दमडीचं राजकारण कळत नाही, त्या लोकांसाठी मी शिवसेना नेते पदाचा राजीनामा देत आहे. मी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा देत आहे. एवढी मोठी शिवसेना संघटना ती संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या पापाचा भागीदार मी होऊ इच्छित नाही. मी घेतलेला निर्णय या पूर्ण विचार करुन घेतलेला निर्णय आहे," असे राज ठाकरे म्हणाले होते.

शिवसेना ही या महाराष्ट्राची, देशाची गरज आहे. शिवसेना संपवावी, मोडावी, तिचं काहीही होवो, अशी माझी कधीच इच्छा नव्हती यापुढेही नसणार. शिवसेना प्रमुखांनी उभी केलेली एवढी मोठी बलाढ्य संघटना आता चार कारकून सांभाळणार असतील तर ते मला कधीही मान्य होणार नाही. त्यांनी चुका करायच्या, वाटेल ते निर्णय घ्यायचे, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना वाटेल ते सांगायचं हे आजपर्य़ंत घडत आलं. मी शिवसेनाप्रमुखांकडे पाहून मी कुठलीही गोष्ट मागितली नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.

"मी घेतलेला हा निर्णय कुणालाही कोंडीत पकडण्यासाठी घेतलेला निर्णय नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी तर नाहीच, तेवढी माझी लायकी नाही. माझी जी कोंडी झाली होती. तिचा हा उद्रेक झाला. महाराष्ट्राचं भलं हे माझ्या डोळ्यासमोरुन कधीही दूर जाऊ शकत नाही," असे शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे म्हणाले होते.

27 नोव्हेंबर 2005

27 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांनी शिवसेना सोडली होती. आता वीस वर्षांनंतर ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून बॅनरबाजी सुरु झाली आहे.

मनसेतील काही दोन-तीन नेते या युतीसाठी नाराज असले तरी दोन्ही पक्षातील बहुसंख्य मुळचे शिवसैनिक असलेल्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत, ते आल्यानंतर पुन्हा राजकीय घडामोडींना वेग येईल, दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येणार का? की ही केवळ चर्चा ठरणार, हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT