Aparnam Yadav with Mulayam Singh Yadav Sarkarnama
विश्लेषण

मुलायमसिंहांच्या सूनबाईंचा प्रवास समाजकारण ते राजकारण

उत्तर प्रदेशातील राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (UP Election 2022) मोठ्या घडामोडी घडत आहेत.

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर उत्तर प्रदेशातील राजकारणाने वेग पकडला असून आज मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपमध्ये फाटाफूट करणाऱ्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना त्यांच्या घरातूनच धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकही निवडणूक जिंकण्याचा अनुभव नसलेल्या अपर्णा यादव भाजपला कितपत फायद्याच्या ठरतात, हे पाहावे लागेल.

अपर्णा यादव यांनी 2017 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. लखनौ कॅन्टोन्मेंटमधून त्या मैदानात उतरल्या होत्या. काँग्रेसच्या रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. आता याच रिटा बहुगुणा भाजपमध्ये आहेत. अपर्णा यादव यांचा राजकीय प्रभाव फारसा नसला तरी त्या समाजकारणात खूप आधीपासून सक्रिय आहेत. त्या 'बीअवेअर' नावाची सामाजिक संस्था चालवतात. ही संस्था निराधार महिलांसाठी काम करते. याचबरोबर ही संस्था लखनौमध्ये गोशाळा चालवते.

मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने अपर्णा यांची राजकीय इनिंग सुरूच झाली नव्हती. आता त्या थेट भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. पुन्हा एकदा त्या राजकीय इनिंग सुरू करीत आहेत. राज्यात भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशी थेट लढत असताना अपर्णा यांच्या पक्षांतरामुळे खळबळ उडाली आहे. अखिलेश यादव यावर काय भूमिका घेतात आणि अपर्णा यांची राजकीय इनिंग यशस्वी ठरते की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

मुलायमसिंह यांच्याऐवजी आता त्यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाची (Samajwadi Party) धुरा सांभाळत आहेत. मुलायमसिंह यांचे दुसरे पुत्र प्रतिक यांच्या अपर्णा या पत्नी आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यानंतर परत मुलायमसिंह आणि अखिलेश यांची स्तुती करून अपर्णा यांनी कुटुंबासोबतच असल्याचे दाखवले होते.

आज अपर्णा यांनी सगळ्यांनाच धक्का देत आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. मागील काही दिवसांत समाजवादी पक्षाने भाजपचे तीन मंत्री आणि आठ आमदार फोडल्याने प्रत्युत्तर देण्याची भाजपने तयारी चालवली होती. आता अखिलेश यांच्या भावाच्या पत्नीला फोडून भाजपने मोठा धक्का दिला आहे. अपर्णा यांनी लखनौ कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Aparna Yadav joins BJP)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT