सोलापूर : कोट्यवधींचा गंडा घालणारा विशाल फटे (Vishal Phate) हा सध्या पोलीस (Police) कोठडीची हवा खात आहे. बार्शीचा हर्षद मेहता (Harshad Mehta) अशी ओळख असलेल्या फटेबाबत अनेक सुरस कथा समोर येऊ लागल्या आहे. जगप्रसिद्ध ड्रग्ज तस्कर पाब्लो एस्कोबारसारखे (Pablo Escobar) त्याला श्रीमंत व्हायचे होते, असे तो मित्रांना सांगत असे.
पाब्लो एस्कोबार हा मूळचा कोलंबियातील जगप्रसिद्ध ड्रग्ज तस्कर होता. जागतिक पातळीवर त्याच्या नावाची अजूनही चर्चा सुरू असते. जगातील सर्वांत धोकादायक अशी तस्करांची संघटना त्याने बनवली होती. त्याने ड्रग्जचा व्यापार प्रामुख्याने अमेरिका आणि इतर देशांसोबत केला होता. अतिशय क्रूरकर्मा अशी त्याची ओळख होती. त्याने अफाट पैसा मिळवला होता त्या जोरावर तो कोलंबियाच्या सरकारलाही आव्हान देत होता. तो अतिशय शक्तिशाली गँगस्टर मानला जात होता. त्याच्या आयुष्यावर अनेक चित्रपटही आले आहेत. याच एस्कोबारप्रमाणे व्हायचे आहे, असे फटे मित्रांना सांगत होता.
मागील काही दिवसांपासून फरार विशाल फटे हा काल (ता.17) यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आला होता. त्याने पोलिसांपुढे हजर राहणार असल्याचे जाहीर केले होते. फटे हा कर्नाटकात पळून गेला होता. तेथून तो एसटी बसने सोलापुरात आला. सोलापूर बस स्थानकावरून तो काल रात्री आठच्या सुमारास रिक्षातून पोलिस अधीक्षक कार्यालयात पोचला. तेथील पोलिसांनी त्याला ओळखले नाही. यावर त्यानेच विशाल फटे अशी ओळख सांगितली. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली. आज त्याला बार्शी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
विशाल फटे याने बार्शीतीलच (Barshi Scam) नव्हे तर राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. आज चौथ्या दिवशीही फटेविरोधात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढत आहे. आतापर्यंत सुमारे 81 तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून, फसवणुकीचा आकडा 25 कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. मात्र, अनेकांच्या तक्रारी अजून आलेल्या नाहीत. त्यामुळे आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.
या प्रकरणी फिर्यादी दिपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याचे वडील व भावाला अटक केल्यानंतर तो पोलिसांना शरण आला. फरार झाल्यानंतर तो कर्नाटकात वास्तव्यास होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.