शिवप्रसाद देसाई
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या अठराव्या निवडणुकीचा निकाल येत्या मंगळवारी (ता.४) दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात प्रामुख्याने भाजपचे नारायण राणे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात चुरस होईल असा अंदाज आहे; मात्र या निवडणूकीचा थेट परिणाम आगामी विधानसभेच्या गणितावर पडणार आहे.
लोकसभेचा हा निकाल विधानसभेच्या इच्छुक उमेदवार पक्ष यांच्यासाठी गाईडलाईनचे काम करणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येणार्या सहाही विधानसभेच्या जागांवर याचा काय प्रभाव पडू शकतो, याचे अंदाजानुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच उमेदवारीसाठी चुरस निर्माण होईल.
या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर करतात. गेल्या
विधानसभा निवडणूकीत ते शिवसेनेतर्फे लढत निवडून आले होते. त्यावेळी भाजपच्या पाठिंब्यावर लढलेल्या राजन तेली यांनी त्यांना तगडी झुंज दिली होती. त्यावेळची लढत विचारात घेता हे दोन्हीही नेते आज महायुतीत म्हणजे एकाच राजकीय आघाडीत आहेत. त्यामुळे राणे किंवा राऊत या पैकी कोणीही जिंकले तरी उमेदवारीसाठी या दोघांमध्ये प्रमुख स्पर्धा दिसून येईल.
संजू परब, विशाल परब यांची नावेही इच्छूकांच्या यादीत असल्याची चर्चा आहे. या पक्षांची प्रमुख लढत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) किंवा शिवसेनेचा ठाकरे गट यांच्यात आहे. येथे ठाकरे शिवसेनेला मानणार्या आणि आपोआप पडणार्या मतांची संख्या पूर्वीपासून बर्यापैकी आहे. ही मते टिकून आहेत की कसे हे लोकसभेच्या निकालावर ठरणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे सध्यातरी सक्रिय उमेदवार नाही. शैलेश परब यांनी
पूर्वी येथे मोर्चेबांधणी केली होती. त्यांचे नाव ऐनवेळी पुढे येवू शकते.दुसरीकडे राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) अर्चना घारे-परब यांनी गेल्या दोन टर्म विधानसभेसाठी मोर्चेबांधणी केली. त्यांनी जनसंपर्कही वाढवला आहे. संघटना वाढीसाठी
प्रयत्न केले; मात्र राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेच्या ठाकरे गटाला मतदारांमध्ये असलेली सहानुभुती लक्षात घेता एकाकडे उमेदवार आहे तर दुसर्या पक्षाकडे भाजप किंवा महायुतीला शह देण्याची राजकीय ताकद अशी विचित्र राजकीय अवस्था महाविकास आघाडीकडे आहे.
या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेच्या ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहीलेल्या वैभव नाईकयांच्याकडे आहे. येथे प्रामुख्याने राणे आणि त्यांचे समर्थक विरूध्द ठाकरे-शिवसेना असे राजकीय गणित दिर्घकाळ पहायला मिळाले. भाजपला स्वतंत्रपणे या ठिकाणी आपली ताकद उभी करण्यात फारसे यश आले नव्हते. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या ठाकरे गटाला अर्थात वैभव नाईक यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. येथून
भाजप विधानसभेसाठी दावा करण्याची दाट शक्यता आहे. माजी खासदार डॉ. निलेश राणे यांचे नाव या मतदारसंघात आगामी उमेदवार म्हणून चर्चेला आहे. कुडाळ आणि मालवण अशा दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात दोन्ही गटांमध्ये तुल्यबळ ताकद आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल आगामी विधानसभेच्या राजकीय मनोधैर्यावर मोठाप्रभाव टाकू शकतो.
विधानसभेचे प्रतिनिधीत्व गेल्यावेळी भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार नीतेश राणे Nitesh Rane हे करतात.युतीच्या जागावाटपात या मतदारसंघातील देवगडकडचा भाग भाजपच्या वाट्याला येत असल्याने त्यांचाही येथे प्रभाव होता. राणेंच्या भाजप प्रवेशानंतर या दोघांचेही राजकीय बळ एकत्र आले. या मतदारसंघाचे राणेंना सर्वाधिक मताधिक्य मिळेल
अशी शक्यता वर्तवली जात आहे. येथे भाजपची मुख्य लढत ठाकरे शिवसेनेशी आहे. येथे राणेंना किती मताधिक्य मिळते त्यावर ठाकरे शिवसेनेचे मनोधैर्य किती प्रमाणात टिकणार हे ठरणार आहे. येथून शिवसेनेचा विधानसभेचा संभाव्य उमेदवारीसाठी सतिश सावंत, संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांच्यात स्पर्धा आहे.
लोकसभेचा निकाल कसाही लागला तरी राजापूरमध्ये महाविकास आघाडीची जागा कोणाला जाणार यावरून खरी स्पर्धा असणार आहे. या मतदारसंघात भाजपला आतापर्यंत हवेतसे संघटनात्मक बळ उभे करता आलेले नाही. येथील विधानसभेच्या स्पर्धेत काँग्रेस Congress आणि ठाकरे शिवसेना ही पारंपारिक स्पर्धक राहिली आहे. आता हे दोन्ही पक्ष आणि त्यांच्याकडे असलेले तुल्यबळ इच्छूक उमेदवार महाविकास आघाडीत आहेत. येथे ठाकरे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले राजन
साळवी सध्या आमदार आहेत. राणेंचा लोकसभेच्या स्पर्धेत विजय झाल्यास येथे भाजपचे मनोधैर्य वाढणार आहे; मात्र त्यांचे येथील संघटनात्मक बळ तुलनेत कमी आहे. याठिकाणी विधानसभेत ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवींची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गेल्यावेळी साळवींना काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी विधानसभेत तगडे आव्हान दिले होते. यावेळी काँग्रेसतर्फे जागा वाटपात लाड यांच्यासाठी राजापूरच्या जागेचा आग्रह धरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महायुतीतही भाजपतर्फे उल्का विश्वासराव या दिर्घकाळ मोर्चेबांधणी करत आल्या आहेत. याचवेळी राणे समर्थक म्हणून ओळख असलेल्या रवींद्र नागरेकर यांचेही नाव भाजपकडून पुढे येण्याची शक्यता आहे.
असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडेही अजित यशवंतराव यांच्या रूपाने तगडा उमेदवार आहे. त्यांचा जनसंपर्क लक्षात घेता महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडून या जागेवर दावा केला जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठे नाव म्हणून पुढे आलेले उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचीही या मतदारसंघात ताकद आहे. त्यांनी स्वतः किंवा त्यांची मुलगी अपुर्वा हिच्यासाठी या मतदारसंघात राजकीय मोर्चेबांधणी बर्याच आधीपासून सुरू केली आहे. महायुतीच्या जागावाटपात किरण सामंत यांनी राजापूरसाठी आग्रह धरल्यास येथील
राजकीय गणिते बदल्याची शक्यता आहे. एकूण स्थिती पाहता येथे इच्छूकांची संख्या जास्त आहे. यातच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला उमेदवार निश्चितीसाठी बरीच ताकद खर्च करावी लागण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघात विद्यमान आमदार उदय सामंत यांची राजकीय ताकद चांगली आहे. येथेसामंत राष्ट्रवादीत असताना ते विरूध्द भाजप अशी पारंपारीक लढत असायची. आता शिंदे गटात असलेले सामंत आणि भाजपतर्फे या भागाचे नेतृत्व करणारे बाळ माने असे दोघेही एकाच महायुतीत आहेत. त्यामुळे जागा वाटपात ही जागा उदय सामंत यांना सहजगत्या सुटेल की भाजप दावा करेल हे येथून लोकसभेत राणेंना किती मते मिळतात यावर अवलंबून
असणार आहे. येथील लोकसभेची बरीचशी मदार सामंत यांच्यावरच होती. यातच किरण सामंत यांनी लोकसभा लढवण्यासाठी केलेले प्रयत्न, ऐन मतदानादिवशी त्यांचे चर्चेत राहीलेले ‘नॉट रिचेबल' नाट्य या सगळ्याचा प्रभाव येथील लोकसभेच्या एकुण मतदानावर किती दिसतो हेही औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजप रत्नागिरीच्या आपल्या पारंपारीक
मतदारसंघावर दावा करणार की उदय सामंत यांच्यासाठी शिंदे शिवसेनेला ही जागा देणार हे येणारा काळ ठरवणार आहे. येथून ठाकरे शिवसेनेतर्फे बंड्या साळवी, उदय बने अशी नावे चर्चेत येवू शकतात. राजापूरमधील महाविकास आघाडीतील
जागेसाठीची स्पर्धा लक्षात घेता ही जागा काँग्रेसला सोडल्यास राजन साळवींना रत्नागिरीतून उमेदवारी देण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर असू शकतो. साळवी हे मुळचे रत्नागिरीचे असल्याने या मतदारासंघावरही त्यांचा प्रभाव आहे.
येथे पारंपारीक लढत शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशी राहीली आहे. या ठिकाणी अजित पवारगटाचे शेखर निकम आमदार आहेत. राणेंचा विजय झाल्यास येथील भाजपच्या संघटनात्मक वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होवू शकते. अशावेळी भाजप महायुतीच्या जागा वाटपात दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथे भाजपतर्फे सूर्यकांत साळुंखे, सुरेखा खेराडे, शिंदे शिवसेनेतर्फे माजी आमदार सदानंद चव्हाण यांची नावे इच्छूकांच्या यादीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तिकीट खेचून आणण्यासाठी शेखर निकम यांना ताकद लावावी लागणार आहे. दुसरीकडे
महाविकास आघाडीच्या प्रचारात मशाल चिन्ह मतदारासंघात पोहोचवण्यात ठाकरे शिवसेनेला यश आले. त्यामुळे येथील विधानसभेच्या जागेवर त्यांचा दावाही पक्का झाला आहे. सुभाष बने यांचे पुत्र रोहन बने यांच्यासह गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव हे येथून शिवसेनेतर्फे उमेदवारीसाठी दावा करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रशांत यादव हेही येथील तगडे उमेदवार मानले जातात. विद्यमान आमदार निकम यांना सर्वच पातळीवर तोडीस तोड अशी त्यांची ओळख आहे. शरद पवार गटात असलेले रमेश कदम यांचीही पडद्यामागची भुमिका येथे महत्त्वाची ठरू शकते.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.