NCP Party Symbol : शहाण्याने पोलिस ठाण्याची आणि कोर्टाची पायरी चढू नये, असे आजच नव्हे, तर जुन्या काळापासून म्हटले जाते. गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडींनंतर याची प्रचिती पदोपदी येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र या प्रकरणांत तारीख पे तारीख, असाच प्रकार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटून एक वर्ष होऊन गेले आहे. पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेवरील सुनावणी आतापर्यंत चार वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत न्यायालयात प्रकरण सुरू आहे. आता यावर 12 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार आहे. तोपर्यंत विद्यमान आमदारांचा कार्यकाळ संपेल. त्यामुळे निर्णय कधी होणार, 12 नोव्हेंबरला तरी सुनावणी होणार की पुन्हा तारीख वाढवून मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना अपात्र करावे, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावरही तारीख पे तारीख सुरू असल्याचा अनुभव येत आहे. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काही सभांमध्ये, आपल्याला येत्या 50-60 वर्षांत न्याय मिळेल, अशी उपरोधिक टिपण्णी करताना दिसत आहेत.
अजितदादा पवार हे 40 आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) बाहेर पडून महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर वाद सुरू झाला. निवडणूक आयोगाने अजितदादांच्या बाजूने निर्णय देत पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह काही अटी घालून त्यांना दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, असे नाव मिळाले आहे. पक्षाचे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचेल की नाही, अशी शंका होती, मात्र ते अल्पावधीत तळागाळापर्यंत पोहोचले आणि पक्षाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागांवर उमेदवार विजयी झाले.
लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये पिपाणी हे चिन्हही होते. याचा फटका आम्हाला सातारा आणि नाशिकमध्ये बसला, असे शरद पवार मागे एकदा म्हणाले होते. घड्याळ या चिन्हाशी संबंधित प्रश्न उपस्थित करणार नाही, मात्र तुतारी आणि पिपाणी यावर तोडगा काढायला हवा, असेही ते म्हणाले होते. लोकसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 8 विजयी झाले. अल्पावधीत त्यांच्या पक्षाचे तुतारी हे चिन्ह राज्यभरात पोहोचले आहे. इतके मोठे यश मिळवून देणारे चिन्ह सोडून आता शरद पवार पुन्हा घड्याळ हे चिन्ह घेणार नाहीत, असे जाणकारही सांगत आहे. घड्याळ चिन्हाबाबात पक्षातही फारशी उत्सुकता राहिलेली नाही, असे दिसत आहे. मूळ नाव परत मिळावे, हा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाचे नाव आणि चिन्ह अजितदादा पवार यांच्या गटाला देण्याच्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर पहिल्यांदा 19 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाने दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव वापरण्यास शरद पवार गटाचा अधिकार कायम राहील, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यानंतर मात्र तारीख पे तारीख सुरू झाली आहे. 14 मे ही तारीख देण्यात आली, त्या दिवशीही सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर उन्हाळी सुट्या सुरू झाल्या आणि दोन महिन्यांनंतर म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातील 16 ही तारीख मिळाली. त्या तारखेलाही सुनावणी होऊ शकली नाही.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्याती सुनावणी न झाल्यामुळे ऑगस्ट महिन्यातील 6 तारीख देण्यात आली होती. त्या तारखेलाही सुनावणी होऊ शकली नाही. आता थेट विधानसभा निवडणुकीच्या काळातील 12 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. त्या तारखेला तरी सुनावणी, निर्णय होईल का, हे निश्चितपणे सांगता येत नाही. आतापर्यंत चार सुनावण्या झाल्या आहेत, मात्र त्यातून फार काही निष्पन्न झालेले नाही. पाच, सहा सुनावण्या झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागू शकेल, असे मत 16 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले होते. सर्वसामान्यांना येणारा तारीख पे तारीखचा अनुभव आता राजकीय पक्षांनाही येऊ लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.