Prime Minister Narendra Modi’s strategic move for Vice President elections sparks debate over CP Radhakrishnan and INDIA Alliance unity. Sarkarnama
विश्लेषण

Vice President elections : राधाकृष्णन यांच्याविरोधात उमेदवार दिल्यास ‘इंडिया आघाडी’त फूट? मोदींनी असा मारलाय सिक्सर...

CP Radhakrishnan vs INDIA Alliance: Rising Political Tensions : डीएमकेचे राज्यसभा आणि लोकसभेत 32 खासदार आहेत. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत या पक्षाची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या निवडीमागे दक्षिण भारतातील राजकारण साधण्याची मोदींची रणनीती असल्याचे मानले जात आहे.

  2. इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण राधाकृष्णन यांच्या विरोधात उमेदवार दिल्यास डीएमकेसह काही पक्ष अडचणीत येऊ शकतात.

  3. इतिहास पाहता, राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकांमध्ये अनेकदा विरोधी पक्षातील काही पक्षांनी विरोधात मतदान केलेली उदाहरणे आहेत, त्यामुळे या निवडणुकीतही तशी शक्यता आहे.

INDIA Alliance Rift Speculation : उपराष्ट्रपतीपदासाठी ‘एनडीए’कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. एनडीएकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून फोनाफोनी सुरू करण्यात आली आहे. पण विरोधक त्यांचे ऐकणार का, नाही ऐकले तर उमेदवार कोण असणार, इंडिया आघाडी एकजूट राहणार, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

एनडीएने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उमेदवार निवडीचे संपूर्ण अधिकार दिले होते. त्यानंतर काल झालेल्या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राधाकृष्णन यांचे नाव निश्चित करण्यामागे अनेक राजकीय गणिते असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. विरोधकांना कात्रीत पकडण्यासाठी मोदींनी सिक्सर मारल्याची चर्चाही राजकीय वर्तूळात आहे.

मुख्यमंत्रिपदाची निवड असो की इतर कोणत्याही संविधानिक पदाची, पंतप्रधान मोदींकडून निश्चित करण्यात आलेल्या नावामागे काही ना काही राजकारण दडलेले असते. ते अनेकदा सिध्द झाले आहे. राधाकृष्णन यांच्या नावामागेही तशीच रणनीती दिसते. राधाकृष्णन हे मुळचे तमिळनाडूचे असून सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

राधाकृष्णन यांना उमेदवारी देत भाजपने तमिळनाडूतील अस्मिता आणि भाषेच्या राजकारणाला टार्गेट केल्याचे दिसते. त्यामुळे डीएमके आणि एआयडीएमकेची मते त्यांना मिळू शकतात, अशी रणनीती दिसते. तमिळनाडचे मुख्यमंत्री व डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी राधाकृष्णन यांच्याविरोधात भूमिका घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना फटका बसू शकतो, असे तर्क लढविले जात आहेत. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदी विराजमान होणारे पहिले तमिळनाडूतील राजकीय नेते ठरणार आहेत. त्यामुळे स्टॅलिन यांची कोंडी होणार आहे. अशा स्थितीत इंडिया आघाडीतून उमेदवार दिल्यास डीएमकेची मते फुटण्याची भीती आहे.

डीएमकेचे राज्यसभा आणि लोकसभेत 32 खासदार आहेत. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत या पक्षाची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही राधाकृष्णन यांच्या बाजूने भूमिका घेण्याबाबत सकारात्मक असू शकते. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी रात्री दिलेली सूचक प्रतिक्रिया त्याचेच संकेत आहेत. राधाकृष्णन हे चांगले व्यक्त आहेत. कोणत्याही वादात नाहीत. त्यांच्याकडे अनुभव आहे, असे राऊत म्हणाले होते. त्यामुळे ठाकरेंच्या भूमिकेवरही इंडिया आघाडीची एकजुटता अवलंबून असणार आहे.

निवडणुकीचा असाही इतिहास

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यापूर्वी एनडीएसह यूपीएतील पक्षांनीही विरोधात मतदान केल्याचा इतिहास आहे. 2007 च्या निवडणुकीत यूपीएने प्रतिभाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भैरोसिंह शेखावत एनडीएचे उमेदवार होते. त्यावेळी शिवसेना एनडीएमध्ये असताना पाटील या महाराष्ट्राच्या असल्याने त्यांनाच मतदान केले होते. 2012 च्या निवडणुकीतही असेच घडले. शिवसेनेने यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. जेडीयूने मुखर्जी यांना मतदान केले होते.

2017 ची निवडणूकही अपवाद ठरली नाही. या निवडणुकीत एनडीएने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी जेडीयू यूपीएमध्ये होती. पण कोविंद हे त्यावेळी बिहारचे राज्यपाल असल्याने जेडीयूने त्यांना पाठिंबा दिला होता. 2022 च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएने पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली होती. तृणमूल काँग्रेस आणि धनखड यांचा त्यावेळी 36 चा आकडा होता. पण तृणमूलने या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा न देता मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी का निवडले गेले?
A: दक्षिण भारतातील तमिळनाडूच्या राजकारणावर प्रभाव साधण्यासाठी आणि व्यापक समर्थन मिळवण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली.

Q2: इंडिया आघाडीत फूट का पडू शकते?
A: कारण राधाकृष्णन यांच्या विरोधात उमेदवार दिल्यास डीएमके आणि शिवसेना यांसारख्या पक्षांची भूमिका बदलू शकते.

Q3: या निवडणुकीत डीएमकेची भूमिका का महत्वाची आहे?
A: डीएमकेकडे राज्यसभा व लोकसभेत 32 खासदार आहेत, ज्यांचा मतदानावर मोठा परिणाम होऊ शकतो.

Q4: यापूर्वी अशा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी सत्ता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता का?
A: होय, 2007, 2012 आणि 2017 च्या निवडणुकांमध्ये असे उदाहरणे दिसून आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT