
थोडक्यात महत्वाचे :
राहुल गांधींच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस खासदार सैय्यद नासीर हुसैन यांनी सांगितले की, गरज पडल्यास नियमांनुसार महाभियोग प्रस्ताव आणला जाऊ शकतो, मात्र अद्याप पक्षांतर्गत चर्चा झालेली नाही.
राहुल गांधींच्या ‘मत चोरी’ विरोधी मोहिमेमुळे बिहारसह अनेक राज्यांमध्ये हा मुद्दा राजकीय वादळ निर्माण करत आहे.
Congress impeachment motion : काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांकडून मत चोरीच्या मुद्द्यावरून भारतीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहेत. देशभरातून अनेक मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील कथित घोळाची प्रकरणे विरोधकांकडून बाहेर काढली जात आहेत. प्रामुख्याने काँग्रेस नेते राहुल गांधी सर्वाधिक आक्रमक असून ते सातत्याने आयोगावर निशाणा साधत आहे. आयोगानेही रविवारी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनीच पत्रकार परिषदेत राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील सात दिवसांत शपथपत्र सादर करा, अन्यथा देशाची माफी मागा, असे आव्हानही त्यांनी राहुल यांना दिले आहे. त्यानंतर आता विरोधक अधिकच आक्रमक झाले असून थेट ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केल्याचे समजते.
बिहारमधील मतदारयाद्यांची पुनर्पडताळणीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून संसद दणाणून सोडली जात आहे. त्यातच आता महाभियोगाचा मुद्दाही चर्चेला आला आहे. काँग्रेसचे खासदार सैय्यद नासीर हुसैन यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याबाबतच्या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली आहे.
हुसैन यांनी म्हटले की, या विषयावर अद्याप पक्षांतर्गत कुठलीही चर्चा झालेली नाही. पण गरज पडल्यास नियमांनुसार काँग्रेसकडून महाभियोग प्रस्ताव आणला जाऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानामुळे या चर्चेला आता जोर आला आहे. सध्या संसदेत न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधींकडून करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपावर भाष्य केले. ते म्हणाले, आयोगावरील लावण्यात आलेल्या मत चोरीचे खोटे आरोपांमुळे आयोग आणि मतदारही घाबरत नाहीत. मत चोरी हा शब्द म्हणजे संविधानाचा अपमान आहे. आयोगाकडून पक्षभेद केला जात नाही. सर्व पक्ष एकसारखेच असल्याचे ज्ञानेश कुमार म्हणाले होते.
दुसरीकडे राहुल गांधी यांनीही बिहारमध्ये आयोगावर यावरूनच गंभीर आरोप केले. मतदार अधिकार यात्रामध्ये बोलताना त्यांनी आयोग केवळ मलाच टार्गेट करत असल्याचा आरोप केला. भाजप नेत्यांना आयोग शपथपत्र सादर करायला सांगत नाही, असे राहुल म्हणाले. बिहारमध्ये सुरू करण्यात आलेल्या या यात्रेच्या माध्यमातून जवळपास २० जिल्ह्यांमध्ये जाऊन मत चोरीच्या मुद्दा मांडला जाणार आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाची मागणी का होत आहे?
A: राहुल गांधींच्या आरोपांवर दिलेल्या प्रत्युत्तरानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
Q2: काँग्रेसने महाभियोग प्रस्ताव आणण्याबाबत निर्णय घेतला आहे का?
A: अद्याप औपचारिक चर्चा झालेली नाही, पण शक्यता नाकारलेली नाही.
Q3: राहुल गांधी काय म्हणत आहेत?
A: ते आयोग केवळ त्यांनाच टार्गेट करत असल्याचा आणि भाजप नेत्यांना सूट देत असल्याचा आरोप करत आहेत.
Q4: बिहारमध्ये काय सुरू आहे?
A: राहुल गांधींची "मतदार अधिकार यात्रा" सुरू असून सुमारे २० जिल्ह्यांत मत चोरीचा मुद्दा मांडला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.