Narendra Modi, Pahalgam terror attack Sarkarnama
विश्लेषण

Pahalgam Terrorist Attack : ‘नया भारत’ फक्त मिरवण्यासाठी नको, 10 वर्षांत 2 हजारांहून अधिक जणांचा गेलाय जीव!

Civilian Casualties in Terror Attacks Over the Last Decade : पहलगाममध्ये एकाचवेळी 28 जणांचा जीव गेलाय. जिथे दहशतवादी हल्ला झाला, तिथे सुरक्षा यंत्रणांचा एकही जवान नव्हता, असेही पर्यटकांकडून सांगितले जात आहे.

Rajanand More

India’s Counter-Terrorism Strategy : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने भारतासह संपूर्ण जगाला मोठा हादरा बसला आहे. मागील काही वर्षांत भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये सातत्याने घट होत असली तरी असा एखादा हल्ला केलेल्या संगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरतो. एकदा सर्जिकल स्ट्राइक, नंतर एअर स्ट्राइक करूनही दहशतवाद थांबलेला नाही. पाकिस्तानातून त्याला खतपाणी घातलं जातंय, हे वारंवार समोर आलंय. स्ट्राइक करून आणि डोळे वटारूनही ‘नया भारत’ हे हल्ले थांबवू शकलेला नाही. कमी झालेले हल्ले, मृतांचे आकडे सांगून मिरवणे आता बंद करावे. पहलगाममध्ये नेमकी काय चूक झाली, हेही शोधून कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पहलगाममध्ये एकाचवेळी 28 जणांचा जीव गेलाय. जिथे दहशतवादी हल्ला झाला, तिथे सुरक्षा यंत्रणांचा एकही जवान नव्हता, असेही पर्यटकांकडून सांगितले जात आहे. सात ते आठ दहशतवादी येऊन धाडधाड गोळ्या झाडतात. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून बेछुट गोळीबार करतात आणि तिथून सुरक्षितपणे निघूनही जातात. पण सुरक्षायंत्रणांना याचा मागमूसही लागत नाही, हे आश्चर्यकारक आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या आणि संपूर्ण काश्मीरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू आहे. आपले जवान त्यांचा खात्मा करतीलही. पण 28 निष्पापांच्या बलिदानाचे काय?

देशाचे गृह मंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच दिलेल्या माहितीनुसार, देशात 2004 ते 2014 या कालावधीत एकूण 7,217 दहशतवादी हल्ले झाले होते. 2014 ते 2024 दरम्यान हा आकडा 2 हजार 242 पर्यंत खाली आला. 2024 मध्ये एकूण 85 दहशतवादी हल्ले झाले. यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू तर 31 जवान शहीद झाले. मृतांचा आकडा 70 टक्क्यांनी कमी झाला आहे. यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण 81 टक्क्यांनी कमी झाले आहे. स्टोन पेल्टिंगच्या घटनाही पूर्णपणे थांबल्या आहेत.

शहांनी सांगितलेले हे आकडे पाहून सरकारने दहशतवाद थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न नाकारता येणार नाहीत. मागील काही वर्षांत काश्मीरमधील पर्यटनाला चालना मिळू लागली होती. उद्योग-व्यवसाय वाढीसाठी पुरक वातावरण तयार होऊ लागले होते. त्यासाठी रेल्वे, रस्त्यांचे जाळे वाढवले जात आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी वाढल्याचा दावा सरकारकडून केला जात होता. विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. नवे सरकार आले. काश्मीरच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून नेटाने प्रयत्न केले जात होते. आता पृथ्वीवरला स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या जम्मू आणि काश्मीरला विकासापासून कुणीही रोखू शकणार नाही, असे वातावरण तयार झाले होते. पण एका हल्ल्याने या सगळ्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

मागील दहा वर्षांतील दहशतवादी हल्ल्यात 2 हजारांहून अधिक बळी गेले आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि जवानांचाही समावेश आहे. 2016 आणि 2019 चा जवानांवरील हल्ला कुणीही विसरू शकत नाही. या दोन हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांना अद्दल घडवली. पण आता दोन दिवसांपूर्वी पहलगामध्ये झालेला हल्लाही भारताच्या सुरक्षा यंत्रणांसाठी आव्हान देणारा आहे. 2019 नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला ठरला आहे. एकाचवेळी 28 पर्यटकांचा बळी गेल्याने दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाच्या मनावरच घाव केला आहे. तशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.

आता पाकिस्तानला अद्दल घडवा, पाकिस्तानमध्ये घुसून बदला घ्या, असे आवाहन सर्व स्तरातून होत आहे. त्याची सुरूवातही मोदी सरकारने केली आहे. राजकीय पातळीवर बुधवारी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पाकिस्तानवर दबाव वाढविण्याचा हा पहिला प्रयत्न असावा. वरिष्ठ पातळीवरच नक्कीच काहीतरी प्लॅन तयार केला जात असावा. पाकिस्तानातील दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी आता भारताने एक घाव तोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. ‘ये नया भारत है, झुकेगा नाही’ हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे.   

जम्मू आणि काश्मीरमध्ये 2014 पासून झालेले दहशतवादी हल्ले –

2014 – यावर्षी एकूण 222 घटना घडल्या होत्या. त्यामध्ये 28 नागरिकांचा मृत्यू आणि 47 जवान शहीद झाले होते. तर त्याचवर्षी 110 दहशतवादी मारले गेले होते.

2015 – एकूण 208 हल्ले आणि त्यामध्ये 17 नागरिक व 39 जवान शहीद. 108 दहशतवाद्यांचा खात्मा.

2016 – 322 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 15 नागरिक आणि 82 जवान शहीद. तर 150 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

2017 – एकूण 342 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 80 जवान शहीद झाले. तर 40 नागरिकांचा मृत्यू. 213 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

2018 – 228 हल्ल्यांमध्ये 40 निष्पाप नागरिक मारले गेले. तर 91 जवान शहीद. 257 दहशतवाद्यांचा मारण्यात आले.

2019 - 153 घटनांमध्ये 39 नागरिकांचा मृत्यू तर 80 जवान शहीद झाले.

2020 – एकूण 244 घटनांमध्ये 37 नागरिकांचा मृत्यू तर 62 जवान शहीद.

2021 – यावर्षी दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद तर 41 नागरिकांचा मृत्यू. एकूण 229 हल्ले झाले.

2022 – 125 हल्ल्यांमध्ये 32 जवान शहीद झाले. तर 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.  

2023 – 46 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 30 जवान शहीद झालले तर 14 नागरिकांचा बळी गेला.

2024 (जुलैअखेरपर्यंत) – 85 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 26 जवान शहीद आणि 31 नागरिकांचा मृत्यू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT