Pimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व होते. मात्र, 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवत सत्ता काबीज केली. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून आता याठिकाणचे चित्र बदलले आहे. येत्या काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत वर्चस्वासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. दुसरीकडे मात्र, महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दिवाळीनंतर महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारीला वेग आला आहे. महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना (Shivsena), रिपाइं हे चार पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत अनिश्चितता आहे. पिंपरी-चिंचवड शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडचा दौरा करीत कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मात्र शांतता दिसत आहे.
तीन टर्म खासदार असलेले श्रीरंग बारणे सध्या सक्रिय नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी शिवसेनेने सुरु केल्याचे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसापासून पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना निष्प्रभ झाली आहे. यामुळेच शहरातील महायुतीतही ती बेदखल झाल्याचे दिसत आहे. महापालिकेवरील वर्चस्वासाठी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच दिसत आहे, मात्र शिवसेना कुठेच दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मावळ मतदारसंघाचे खासदार असलेले श्रीरंग बारणे यांचे संघटनेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे पक्ष निष्प्रभ झाला आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार कच्चा निघाल्याने त्यांचे फावले. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी ते रायगडमधील पनवेल-उरणपर्यंत पसरलेल्या लोकसभा मतदारसंघात त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते हाताच्या बोटावर मोजूनही सापडणार नाहीत. त्यांनी शिवसैनिकांना बळ दिले नसल्यामुळे पक्षवाढ झाली नाही.
भाजप- राष्ट्रवादीच्या तुलनेमध्ये शिवसेनेत इतर पक्षातून होत असलेल्या इनकमिंगची संख्या कमीच आहे. एकनाथ शिंदे सत्तेत असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत शहर आणि परिसरातील एकही जागा त्यांच्या वाट्याला आली नाही. शिंदे यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद जाऊन ते उपमुख्यमंत्र्यांच्या आसनावर येताच पक्षाकडे येणाऱ्यांचा ओघ कमी झाला आहे.
2017 मधील महापालिका निवडणुकीत नगरसेवकांच्या 128 जागा होत्या. मात्र शिवसेना एकसंध असतानाही केवळ नऊ जागा निवडून आल्या होत्या. खासदार बारणे यांची मर्यादा उघड झाली होती. आता शिवसेना फुटली आहे. त्यामुळे आधीच कमकुवत असलेल्या शिंदेसेनेला येत्या काळात भाजप-राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जावे लागणार आहे. त्यातच भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीकडे आशेने डोळे लावून बसलेल्या शिंदेसेनेच्या पदरात काय पडणार? याची उत्सुकता लागली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील भाजपमधील जगताप गट मजबूत आहे. हा गट बारणेंचा पारंपरिक विरोधक आहे. मात्र मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बारणे आणि जगताप गटातील राजकीय वैर वरवर तरी कमी झाले आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत जगताप गटाला पर्यायाने भाजपलाही स्वबळ तपासून पाहण्याची संधी आली आहे. स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण चालते. बारणे यांचा थोडाफार प्रभाव असलेल्या प्रभागात जगताप गटही प्रबळ आहे. त्यामुळे शिंदेसेनेला महायुतीत जाऊन पदरात पडतील तेवढ्या जागा घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
खासदार बारणे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे फारसे पटत नाही. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत बारणे यांनी पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांचे जमत नाही. त्याशिवाय शहरात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करून महापालिका पुन्हा ताब्यात घ्यायचे इरादे अजित पवारांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेला सोबत घेणार का, हा प्रश्न सतावत आहे.
येत्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार बारणे यांची अडचण होणार आहे. त्यामुळेच पिंपरी चिंचवडमध्ये येत्या निवडणुकीसाठी शिवसेना अर्धा लिंबू ठरण्याची शक्यता असून बलाढ्य असलेल्या भाजप अन् राष्ट्रवादीपुढे निभाव कसा लागणार ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.