Chandrakant Patil-NCP
Chandrakant Patil-NCP Sarkarnama
विश्लेषण

चंद्रकांतदादा...पियूष गोयलांनी त्यावेळी राज्याकडून प्रवाशांची यादी मागितली होती : राष्ट्रवादीचे उत्तर

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसच्या लोकांनी मुंबईतून देशभर कोरोना पसरवला’ असा आरोप केला. त्यावरून राज्यभरात मोठा गदरोळ उठला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उत्तर देताना ‘केंद्राने पाठवलेल्या ट्रेन तुम्ही रिकाम्या जाऊ द्यायच्या होत्या,’ असे विधान केले आहे, त्याचा राष्ट्रवादीकडून (ncp) समाचार घेण्यात आला आहे. (Piyush Goyal had asked for a list of passengers from maharashtra that time : ncp)

राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या उत्तरात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. ७ फेब्रुवारी) लोकसभेत महाराष्ट्राची केलेली बदनामी राज्यातील जनतेला सहन झालेली नाही. सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्यावर चौफेर टीका सुरू आहे. या टीकेने सैरभैर होऊन भाजप नेते आता वाटेल ते बरळू लागले आहेत का, अशी शंका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यामुळे येऊ लागली आहे.

पंतप्रधान मोदींनी अचानक लादलेल्या लॉकडाऊननंतर स्थलांतरीत मजूर आपापल्या राज्यात निघाले होते. त्यानंतर राज्यांनी मागणी केली; म्हणून श्रमिक ट्रेन सुरू करण्याची घोषणा केंद्राने केली. त्यावेळी महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनला प्रवासी नसल्यामुळे श्रमिक ट्रेन रद्द करावी लागली होती. त्याबाबतची टीकाही तत्कालीन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रवाशांची यादी पाठवण्यास राज्याला सांगितले होते, असे असताना चंद्रकांत पाटील हे केंद्राने ट्रेन पाठविल्या तरी त्या रिकाम्या पाठविणे तुमची जबाबदारी होती, असे सल्ले राज्य सरकारला देत आहेत. त्यांचे हे विधान निव्वळ हास्यास्पद आहे, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांना वर्षभरापूर्वी काय झाले होते, याचीही बहुधा माहिती नसावी. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील जनता विरोधात गेली आहे, त्यामुळे कशाचाच पायपोस न ठेवता त्यांनी अशी विधाने केली आहेत. महाराष्ट्राच्या बदनामीचा एककलमी कार्यक्रम चालवणाऱ्या भाजपचे बिंग आता संसदेतच फुटले आहे. चंद्रकांत पाटील यांची अशी हास्यास्पद विधाने भाजपच्या नाचक्कीत भरच घालणार आहेत, असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

परप्रांतीय कामगारांना राज्य सरकारने विश्वास दिला असता तर कामगार आपल्या राज्यात परतले नसते. ते तिकडे परतल्यामुळे तिकडे कोरोना वाढला. रेल्वे जरी केंद्राने पाठविल्या तरी त्या मोकळ्या जाऊन द्यायच्या होत्या. तुमच्या दबावामुळे त्या पाठवाव्या लागल्या, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

पाटील म्हणाले की, आत्ता टीका करणारे बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, संजय राऊत कुठे होते. ते कोरोना काळात लपून बसले होते. फक्त भाजप रस्त्यावर होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नऊ हजार कोटींचा धनादेश लस विकत घेऊ म्हणून फडकविला. कुठे गेला तो धनादेश. लस तर मोदींनीच दिल्या. या पुढेही सर्व लसीकरण मोदीच करतील. चांगल्यांना थोपाटणे हा मोदींचा गुण आहे. म्हणून त्यांनी शरद पवार यांची स्तुती केली असेल. मोदींचा हा गुण तुम्ही घेतला पाहिजे. सर्व काही मोदीच देत आहेत. राज्य सरकारने काय दिले, त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी, असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडीच्या नेत्यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT